अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा पोलिस दलात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) महत्वाची मानली जाते. गुन्हे उघडकीस आणणे (ड़िटेक्शन) व त्यातील आरोपींच्या शो
अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा पोलिस दलात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) महत्वाची मानली जाते. गुन्हे उघडकीस आणणे (ड़िटेक्शन) व त्यातील आरोपींच्या शोधात बहुमोल कामगिरी बजावणारी ही शाखा पोलिसी अर्थकारणाने बरीचशी बदनामही असते व त्यामुळेच या शाखेत नियुक्ती होण्यासाठी पोलिसांची जास्त धडपड असते. या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी धाडसी निर्णय घेत त्यांच्या परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत ज्यांना नियुक्ती हवी आहे, त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. गुन्हेशोध कसब यावर आधारित या परीक्षेत यश मिळवणारांनाच यापुढे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत नियुक्ती देण्याचे त्यांचे नियोजन आहे. नाशिक परिक्षेत्रातील नाशिक ग्रामीण, धुळे, जळगाव, नंदूरबार व अहमदनगर या पाच जिल्ह्यांत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत (एलसीबी) पोलिस अंमलदारांच्या मंजूर संख्याबळापेक्षा जास्त प्रमाणात पोलिस अंमलदारांची त्यांना गुन्हे तपासाचा कोणताही अनुभव नसताना किंवा पोलिस खात्यात पुरेशी सेवा झालेली नसताना नेमणूक केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने यासंदर्भात विशेष पोलिस महानिरीक्षक शेखर पाटील यांनी नाशिक परिक्षेत्राकरिता पत्रक काढून प्रशासकीय अटी-शर्ती पूर्ण करणार्यांना तसेच परीक्षेत यश मिळवणारांनाच यापुढे एलसीबीत अंमलदाराची नेमणूक देण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात नियुक्ती हवी असणारांची गुन्हेशोधावर 75 गुणांची चाचणी घ्यावी. त्यात 40 गुण वैकल्पिक (ऑब्जेक्टीव्ह) व 35 गुणांची प्रॅक्टीकल परीक्षा घ्यावी व मेरीट लिस्टप्रमाणे एलसीबीत नेमणूक करावी व त्याचा सविस्तर तपशील नाशिक कार्यालयास लेखी स्वरूपात दोन दिवसांच्या आत सादर करावा, असे आदेश त्यांनी संबंधित पाचही जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी स्थानिक गुन्हे शाखेत नेमणूक करण्याबाबत मार्गदर्शक सूचना यापूर्वीच विहित केलेल्या आहेत. दि. 16-10-2014च्या परिपत्रकानुसार पोलिस अधिकारी-कर्मचारी यांनी गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलिस अधिकारी-कर्मचारी यांचीच एलसीबीत नेमणूक करावी, असे नमूद केलेले आहे. असे असतानाही ज्यांना कोणताही गुन्हे उघडकीस आणण्याचा अनुभव नसताना, त्यांची नेमणूक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत केली जाते, असे आयजींच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे एलसीबीत नेमणुकीस नियमावली लागू करत त्यांनी या पद्धतीद्वारेच अंमलदारांची नेमणूक करावी, असे निर्देश नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांत दिले आहेत.
या आहेत…अटी व शर्ती
- एलसीबीत पोलिस अधिकारी-कर्मचारी यांची नेमणूक करताना क्षमता, सचोटी आणि एकूणच योग्यतेचे व्यावसायिक निकष गुन्हेगारीच्या व अन्वेषणाच्या माहितीबाबत तपासावे.
- अधिकारी-कर्मचारी यांचे दहा वर्षांमध्ये अॅव्हरेज ग्रेडींग बी-प्लसच्या खाली नसावे.
- सेवा अखंडित असावी व त्यांच्याविरुद्ध कोणतीही चौकशी प्रलंबित नसावी.
- कोणताही फौजदारी खटला प्रलंबित नसावा.
- गुन्हे अन्वेषण विद्यालयातून गुन्हे अन्वेषण करण्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.
- कमीत कमी दोन पोलिस ठाणे येथे मिळून सहा वर्षे कर्तव्य केलेले असावे.
- स्वतंत्रपणे गुन्हे उघडकीस आणलेले असावेत.
- मागील दहा वर्षांत कोणतीही मोठी शिक्षा नसावी.
इच्छुकांचा होणार हिरमोड!
नगर जिल्ह्यात अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी हे एलसीबीत जाण्यासाठी प्रचंड इच्छुक असतात. एक प्रकारची चढाओढच त्यासाठी असते. एलसीबीच्या पोलिस निरीक्षकपदासाठी सध्या अनेकजण शर्यतीतही आहेत. याशिवाय पोलिसांची जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सध्या सुरू असून, त्यात सुमारे 450जणांनी एलसीबीत नेमणुकीची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी अनेकांनी फिल्डींगही लावल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आयजींच्या या नव्या आदेशाने तसेच त्यातील अटी-शर्ती व परीक्षेच्या नियमाने जिल्ह्यातील अनेकांचा हिरमोड होणार आहे व त्याचीच चर्चा आता जिल्हा पोलिस दलात सुरू आहे.
COMMENTS