Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर अर्बनचे बनावट सोनेतारण गाजण्याची चिन्हे ; बचाव कृती समिती आक्रमक पवित्र्यात

नगर अर्बन बँकेच्या मार्केट यार्ड शाखेत 3 कोटीचा चिल्लर घोटाळा व पिंपरी चिंचवड शाखेत 22 कोटीची फसवणूक प्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

संगमनेर शहरातील शांतता बिघडवणाऱ्यांचा उद्देश सफल होऊ देऊ नका – आमदार थोरात
धनगर आरक्षणाकडे सर्वाचेच दूर्लक्ष : बाळासाहेब दोडतले
राहुरीमध्ये राज्यपाल व चंद्रकांत पाटील यांच्याप्रतीकात्मक पुतळयांचे दहन पोलिसांनी रोखले

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर अर्बन बँकेच्या मार्केट यार्ड शाखेत 3 कोटीचा चिल्लर घोटाळा व पिंपरी चिंचवड शाखेत 22 कोटीची फसवणूक प्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, शेवगाव शाखेत बनावट सोनेतारण घोटाळा होऊनही त्याची चौकशी बँक प्रशासनाद्वारे होत नसल्याने नगर अर्बन बचाव कृती समिती आता आक्रमक पवित्र्यात आहे. येत्या 31 मार्चपर्यंत प्रशासनाच्या याबाबतच्या कारवाईची प्रतीक्षा केली जाणार आहे व तोपर्यंत काहीच सकारात्मक घडले नाही तर बँक प्रशासकांच्या दालनात आंदोलन करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. 

शेवगाव शाखेतील बनावट सोनेतारण प्रकरणाबाबत बँकेचे माजी संचालक व बँक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी सांगितले की, शेवगाव बनावट सोनेतारण प्रकरणी बँकेचे प्रशासक व वरिष्ठ अधिकारी यांच्यावर संशयाची सुई आहे. 2018 मध्ये तत्कालीन शेवगावच्या शाखाधिकार्‍याने बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीला पत्र लिहून बँकेच्या शेवगाव शाखेतील जवळपास 2000 ते 2500 सोनेतारणाचे पिशव्यामध्ये बनावट सोने असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या कर्जखात्यांच्या कर्जदारांची नावे देखील डमी असावीत म्हणून बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी शेवगाव शाखेला भेट देवून याची खातरजमा करावी, असे त्यांचे म्हणणे होते. या सर्व पिशव्यांचे कर्जाची एकंदरीत रक्कम 5 कोटी रुपयांच्या पुढे असावी. बँकेचे सोनेतारण कर्ज नियमाप्रमाणे सोनेतारण कर्जाची मुदत ही एक वर्ष असते व एक वर्षानंतर कर्जदाराने सर्व रक्कम भरून सोने सोडवून न्यायचे असते किंवा व्याज भरून त्या कर्जाचे नूतनीकरण करायचे असते. कर्जदाराने असे न केल्यास त्या सोन्याचा लिलाव करून बँकेचे पैसे वसूल केले जातात. या पार्श्‍वभूमीवर तेथील सोने सोडवून घ्यायला कोणीही आलेले नाही, असे सांगून गांधी म्हणाले, शेवगावच्या या बनावट सोनेतारण घोटाळ्याला चार वर्ष होवून गेली आहेत. बँकेचे वरिष्ठ अधिकारी व आश्‍चर्यजनक बाब म्हणजे बँकेचे प्रशासक देखील अद्यापही या गंभीर घोटाळ्याची काहीच दखल घ्यायला तयार नाहीत. आज बँकेकडे खरे सोनेतारण करणेसाठी पर्याप्त निधी नाही म्हणून बँक ठराविक मर्यादेपर्यंतच सोनेतारण कर्ज देत आहे व दुसरीकडे बनावट सोने फसवणुकीमध्ये बँकेच्या 5 कोटीच्या पुढे असलेल्या रक्कमेच्या वसुलीपुढे प्रश्‍न चिन्ह आहे, असेही म्हणणे गांधी यांनी मांडले.

उत्तर दिले, पण कारवाई नाही

मागील महिन्यात बँक बचाव कृती समितीने याबद्दल प्रशासकांची भेट घेवून त्यांना शेवगाव बनावट सोनेतारण प्रकरणी बँकेकडून पोलीस फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली. प्रशासकांनी याबाबत लेखी उत्तर देताना बँक योग्य कायदेशीर कारवाई करत आहे असे उत्तर दिले. कारवाईचे स्वरूप काय व ती कारवाई किती दिवसात करणार या विषयी प्रशासकांनी मौन बाळगले. प्रशासक व बँकेचे अधिकारी याबाबत गंभीर चालढकल करत असल्याचे स्पष्ट होत आहे व त्यांचा यात नेमका काय स्वार्थ आहे, हे मोठे गौडबंगालच आहे, असा सवाल उपस्थित करून गांधी म्हणाले, तीन वर्षापूर्वीच ही कारवाई होणे आवश्यक होते. 1 ऑगस्ट 2019 पर्यत संचालक मंडळाने व त्यानंतर 1 ऑगस्ट 2019 पासून आजपर्यंत प्रशासक व वरिष्ठ अधिकार्‍यांनी हा घोटाळा लपवण्याचाच प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. त्यावर कारवाई बद्दल आजही चालढकल होत आहे, गंभीर गुप्तता पाळली जात आहे. आंदोलन इशारेही गांभीर्याने घेतले जात नाही व सभासदांचा संयम सुटण्याची वाट पाहिली जात आहे, असा आरोपही गांधी यांनी केला.

मार्चअखेरीपर्यंत थांबणार

31 मार्च ही प्रत्येक सहकारी संस्थांच्या दृष्टीने महत्वपूर्ण तारीख असते म्हणून 31 मार्चपर्यत शांतता व सबुरीने घेत आहोत व प्रशासक व अधिकारी यांना पुष्कळ संधी दिली आहे परंतु त्यांच्याकडून काहीही ठोस झालेले नाही किंवा तसे करणेची त्यांची मानसिकता दिसून येत नाही. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तीव्र आंदोलन करावे लागेल. बँकेचे वरिष्ठ अधिकारी कोणाचे तरी दबावाखाली आहेत, असे दिसत आहे व बँक बचाव समितीने आंदोलन केल्यामुळे आम्हाला पोलीस फिर्याद दाखल करावी लागली. नाही तर आम्ही करणार नव्हतो, असे कोणाला तरी दाखवायचा त्यांचा उद्देश दिसून येत आहे. पण बँक वाचविणेसाठी बँक बचाव समिती सर्व वाईटपणा घेणेस तयार आहे, असेही राजेंद्र गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS