कर्ज महागले ; रिझर्व्ह बँकेने केली रेपो दरात वाढ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्ज महागले ; रिझर्व्ह बँकेने केली रेपो दरात वाढ

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे आर्थिक व्यवहार मोठया प्रमाणावर ठप्प झाल्यामुळे अर्थव्यवस्था संकटात सापडली होती. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने आप

अध्यादेशाचा उतारा
दहशतादी मोठ्या हल्ल्याचा कट उधळला
बीडपाठोपाठ धाराशिवमध्येही संचारबंदी

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे आर्थिक व्यवहार मोठया प्रमाणावर ठप्प झाल्यामुळे अर्थव्यवस्था संकटात सापडली होती. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात कपात केली होती. मात्र त्यानंतर रशिया-युक्रेन युद्ध आणि महागाई यातून दिलासा देत रिझर्व्ह बँक रेपो दरात वाढ करणार नसल्याचे वाटत असतांनाच, बुधवारी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.40 टक्क्यांची वाढ करुन सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. या दरवाढीनंतर बँकेचा रेपो दर 4.40 टक्के झाला असून सर्वच प्रकारची कर्ज महागण्याचे संकेत आहेत.
गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दास यांनी व्याजदर वाढीची घोषणा केली. नवे व्याजदर आजपासून लागू झाले आहेत. देशात महागाईने कहर केला आहे. मार्च 2022 मध्ये किरकोळ महागाई झपाट्याने वाढली आणि 7 टक्क्यांवर पोहोचली. हेडलाइन सीपीआय चलनवाढ, म्हणजे किरकोळ चलनवाढीमुळे विशेषत: अन्नधान्याची महागाई झपाट्याने वाढली आहे. याशिवाय भू-राजकीय तणावामुळेही महागाई वाढली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे गव्हासह अनेक धान्यांच्या किमती वाढल्या आहेत. या तणावाचा जागतिक पुरवठा साखळीवरही वाईट परिणाम झाल्याचे दास यांनी सांगितले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की यापूर्वी 8 एप्रिल रोजी, आर्थिक वर्ष 2022-23 साठी रिझर्व्ह बँकेची पहिली चलनविषयक धोरण (चझउ) आढावा बैठक झाली होती. त्यावेळी, आरबीआयने सलग 11 व्या बैठकीत रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट जुन्या पातळीवर कायम ठेवला होता. पण बदलाचे संकेतही दिले होते. त्यावेळी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले होते की, महागाई हा मोठा धोका नाही, केंद्रीय बँकेचे लक्ष आर्थिक वाढीवर आहे.

गुंतवणूकदारांचे सात लाख कोटींचे नुकसान
रिझर्व्ह बँकेने अचानक व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेअर बाजाराला हादरे बसायला सुरूवात झाली. चौफेर विक्रीच्या मार्‍यापुढे सेन्सेक्स 1400 अंकांनी तर निफ्टी 377 अंकांची घसरण झाली. या पडझडीत गुंतवणूकदारांचे सात लाख कोटींची नुकसान झाले. गुंतवणूकदारांनी आज सकाळपासून चौफेर विक्री कायम ठेवली आहे. गुंतवणूकदारांनी एलआयसीच्या शेअर खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली आहे. मात्र दुसर्‍या बाजुला शेअर बाजारात मात्र विक्रीचा सपाटा सुरु आहे. रिझर्व्ह बँकेने अचानक केलेल्या व्याजदर वाढीने बाजारात नकारात्मक वातावरण तयार झाले. गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला.

COMMENTS