File Photograph कोयनानगर / वार्ताहर : कोळसा टंचाईमुळे औष्णिक वीजनिर्मिती केंद्राकडून वीजनिर्मितीत घट झाली आहे. त्यामुळे भारनियमनाचा फटका बसत आहे.
कोयनानगर / वार्ताहर : कोळसा टंचाईमुळे औष्णिक वीजनिर्मिती केंद्राकडून वीजनिर्मितीत घट झाली आहे. त्यामुळे भारनियमनाचा फटका बसत आहे. या संकटात जनतेला दिलासा देण्यासाठी कोयना जलविद्युत प्रकल्पाने मोलाची कामगिरी केली. कोयना जलविद्युत प्रकल्पातून दररोज एक हजार 800 मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. त्यामुळे काही प्रमाणात भारनियम कमी होण्यास मदत होत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसापूर्वी धरणातील पाणी सोडून का दिले जात होते याचा मात्र, आजअखेर मागमूस लागला नाही.
याबाबत कोयना जलविद्युत प्रकल्पाचे मुख्य अभियंता संजय चोपडे यांच्याशी त्याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले, कोयना जलविद्युत प्रकल्पातून सध्या दररोज एक हजार 800 मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. मागणी तसा पुरवठा ही कोयना जलविद्युत प्रकल्पाची ओळख आहे. राज्यात सध्या विजेची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कोळसा टंचाईमुळे अनेक औष्णिक वीजनिर्मिती करणारे प्रकल्पांतून कमी प्रमाणात वीजनिर्मिती होत आहे. विजेची घट होत असल्याने वीज टंचाई झाली आहे. पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी कोयना धरणातून 67.50 टीएमसी पाणीसाठा देण्यात येतो. या पाणीसाठ्याच्या माध्यमातून आतापर्यंत 2978.031 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. पाणीसाठा संपण्यासाठी केवळ 4.70 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. 31 मेपर्यंत विशेष बाब म्हणून 10 टीएमसी पाणीसाठा वाढवून दिला आहे. एरव्ही वीजनिर्मितीसाठी दररोज 0.30 टीएमसी पाण्याचा नियोजनबध्द वापर करण्यात येतो. सध्या विजेची वाढती मागणी व अन्य वीजनिर्मिती प्रकल्पातून निर्मितीत होणारी घट लक्षात घेऊन 0.70 टीएमसी पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी करण्यात येत आहे. धरणातील 10 टीएमसी जादा पाणीसाठा वापराला परवानगी दिल्यामुळे जादा वीजनिर्मिती होऊन राज्य अंधारात जाण्यापासून वाचवण्यात यश येणार आहे.
तीन वीजनिर्मिती प्रकल्प कागदावरच
कोयना जलविद्युत प्रकल्पाची स्थापित क्षमता एक हजार 960 मेगावॉट आहे. कोयना धरणाच्या डाव्या तीरावर 80 मेगावॉट क्षमतेचा वीजगृहाचा प्रकल्प रखडला आहे. प्रकल्पाचा एक हजार मेगावॉट क्षमतेचा पाचवा टप्पा, तर 800 मेगावॉट क्षमतेचा सहाव्या टप्प्याला तांत्रिकदृष्ट्या मंजुरी मिळाली आहे. मात्र, ते प्रकल्प कागदावर आहेत. ते प्रकल्प सुरू झाल्यास भविष्यातील वीज टंचाईची समस्या दूर होण्यास मदत होईल.
COMMENTS