अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार हिंदूविरोधी व हिंदू द्रोही आहे व याचे असंख्य पुरावे भाजपने विधीमंडळासह विविध ठिकाणी दिले आ
अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार हिंदूविरोधी व हिंदू द्रोही आहे व याचे असंख्य पुरावे भाजपने विधीमंडळासह विविध ठिकाणी दिले आहेत व अशा घटना वारंवार सिद्धही होत आहेत. या पार्श्वभूमीवर, राम नवमी उत्सवादरम्यान नगरमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा होत असतील तर हे काय काश्मीर आहे काय?, असा सवाल भाजपचे आ. नितेश राणे यांनी मंगळवारी येथे केला. महाराष्ट्रात हिंदू सुरक्षित आहेत की नाहीत, याचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील धर्मांतर प्रकरणाबाबत आवश्यक कारवाईची मागणी आ. राणे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले, पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहे, पण यापुढे मी समजावून सांगण्यास येणार नाही, असा सूचक व गर्भीत इशाराही त्यांनी दिला.
आ. राणे व खा. अमर साबळे यांनी मंगळवारी नगरला येऊन जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन ब्राह्मणीचे धर्मांतर तसेच राम नवमी मिरवणुकीतील आक्षेपार्ह घोषणांबाबत दोषींवर कारवाईची मागणी केली तसेच नगरच्या व्यापार्यांचीही भेट घेऊन बाजारपेठेतील व्यापारी व हॉकर्स यांच्या वादाची माहिती घेऊन व्यापार्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांच्या सावेडीतील कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, कालिंदी केसकर, प्रदीप परदेशी, अॅड. विवेक नाईक आदी उपस्थित होेते.
आ. राणे म्हणाले, पंजाबमधील कमलसिंग नावाची व्यक्ती ब्राह्मणीमध्ये येऊन धर्मांतराचा प्रयत्न करतो, तो सरकारचा जावई आहे काय? त्याच्या तक्रारी करूनही पोलिस कारवाई करीत नाहीत. उलट, त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यास पुढे आलेल्या महिलेला भीती दाखवून तुम्ही तक्रार मागे घेतली नाही तर तुमच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होऊ शकते, असे पोलिस अधिकारी बोलत असतील तर हिंदू सुरक्षित नाहीत, हेच स्पष्ट होते. तसेच लव्ह जिहादच्या एका प्रकरणात एक मुलगी तीन महिन्यांपासून गायब आहे, पोलिस तिचा शोध घेत नाहीत, तिचे आई-वडील पोलिसात चकरा मारून थकले आहेत. त्यामुळे आम्ही आता उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहोत व तेथे मग पोलिसांना उत्तरे द्यावी लागतील, असे सांगून आ. राणे म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नगरसारख्या ठिकाणी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा कशा? हे काय काश्मीर आहे काय? नगरच्या कापड बाजारात महावीर दुकानासमोर काहीजण खुर्च्या टाकून बसतात, मग आम्हीपण त्यांच्या दुकानांसमोर खुर्च्या टाकायच्या का? कायदा व सुव्यवस्था आम्ही खराब करीत नाही व करणारही नाही. पण समोरून कोणी हालचाल केली तर आम्ही गप्प बसणार नाही व हा नितेश राणे परत समजावून सांगायला येणारही नाही, असा गर्भीत इशाराही त्यांनी दिला.
हिंदू-मुस्लिम वाद हे भाजप नाही तर ठाकरे सरकार लावत आहे, असा दावा करून आ. राणे म्हणाले, आम्हाला जशा चार नोेटिसा पाठवता, तशा त्यांनाही 5 नोटिसा पाठवल्याचे आम्हाला दाखवा. पोलिस त्यांचे कर्तव्य पार पाडत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. हिंदूंकडे वाईट नजरेने कोणी पाहिले तर हिंदूंना त्यांचा तिसरा डोळा उघडावा लागेल व तो उघडला तर अनेकांची हालत खराब होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
नागपूरला पटोलेही राहतात
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याबाबत नागपूर कनेक्शन (देवेंद्र फडणवीस) असल्याबाबत बोलले जाते, यावर भाष्य करताना आ. राणे म्हणाले, नागपूरला नाना पटोलेही राहतात. तेथे तर काही गडबड नाही ना? कारण, त्यांनाही ते आवडत नाहीत, अशा सूचक शब्दात प्रतिक्रिया देऊन ते म्हणाले, संभाव्य हल्ल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली असताना पोलिस अधिकारी विश्वास नांगरेंनी कारवाई का केली नाही? शिवाय हल्ल्यांचा हा पायंडा ठाकरेंनीच पाडला आहे. त्यांच्या भाच्याने आमच्या घरावर हल्ला केला होता. त्याचवेळी त्याला थांबवले असते तर पुढे अशा घटना घडल्या नसत्या. त्यामुळे ठाकरेंनी आरसा पाहून बोलावे, असा सल्लाही आ. राणेंनी दिला.
राऊत…बाजारपेठेत मिळतात
संजय राऊतांवर बोलायला मला फावला वेळ नाही. त्यांच्यावर वेळ वाया कशाला घालू, असे भाष्य करून आ. राणे म्हणाले, अशी माणसे बाजारपेठेत विकत मिळतात. त्यांचे सध्याचे मालक शरद पवार आहेत. अशा लोमट्यावर व ज्याच्याविरुद्ध 420चा गुन्हा सिद्ध झाला आहे, त्याच्यावर मी काय बोलणार?, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, राज ठाकरेंबद्दल बोलताना ते म्हणाले, भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेनुसार ते आता भूमिका घेत आहेत. मशिदीवरच्या भोंग्यांचा विषय आमच्या प्रसाद लाड व अन्य नेत्यांनी याआधीही उपस्थित केला होता. तो आता राज ठाकरेंना पसंत पडला आहे. पण तो त्यांना किती दिवस पसंत पडेल, हे तुम्ही त्यांनाच विचारा, असा सूचक टोमणाही त्यांनी मारला. तसेच भाजप मुंबई महापालिकेसह सर्व निवडणुका स्वबळावरच लढवणार असल्याचेही स्पष्ट केले.
COMMENTS