उन्हाची तीव्रता दिवसोंदिवस वाढत आहे. एप्रिलच्या मध्यानात मे महिन्यात जाणवणाऱ्या उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. हा तापमानाचा प्रश्न फक्त आपल्या देश
उन्हाची तीव्रता दिवसोंदिवस वाढत आहे. एप्रिलच्या मध्यानात मे महिन्यात जाणवणाऱ्या उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. हा तापमानाचा प्रश्न फक्त आपल्या देशापुरता मर्यादित नसून तो जागतिक आहे. उन्हाळ्यात थोडी सावली मिळावी असे प्रत्येकाला वाटत असते. पण एखादे झाड लावून त्याचे संवर्धन करावे असे कुणालाही वाटत नाही. अभिनेता सयाजी शिंदे आणि इतर अनेक निसर्ग प्रेमी सह्याद्री देवराई ही वृक्ष लागवडीची चळवळ गतिमान करतांना दिसत आहेत. उष्णतेच्या लाटा निर्माण होण्यास तसे विविध कारणे आहेत. या उष्णतेच्या लाटा निसर्गनिर्मित नसून त्या मानव निर्मित आहेत. याचा परिणाम सृष्टीवरील सर्व जिवांवर होत आहे. ही मानवनिर्मित उन्हाची तीव्रता कशी वाढते आणि ती कशी कमी करता येऊ शकते याचा उहापोह करणे क्रमप्राप्त. साधारण दोन दशकापूर्वी ग्रामीण भागात उन्हाळ्यामध्ये दुपारी नदीवर पोहायला जाण्याचा आनंद आजच्या चाळीशीमधील सर्वानी घेतलेला आहे. भर उन्हात नदीच्या खळखळ वाहणाऱ्या गार पाण्यात पोहण्याचा आनंद आजच्या युवकांना नक्कीच घेता येणार नाही. कारण, सध्या नदीमध्ये पाणीच नसते. मग नदीचे पाणी गेले कुठे? याचे उत्तर एवढे सहजासहजी सांगणे नको. त्यावर सर्वानी विचार करणे गरजेचे. आज स्थितीला पाण्याची जी एवढी वानवा आहे ती फक्त माणसांमधल्या स्वार्थी स्वभावामुळेच. अशा माणसाने कधी पर्यावरणाचा त्यातील विविध जीवांचा विचारच केला नाही. आज उन्हामध्ये शरीराची जी लाही- लाही होत आहे ती यामुळेच. सर्व तऱ्हेचे वाढलेले प्रदूषण हे एक त्याचे कारण. जागतिक आरोग्य संघटनेने 2014 साठी या विषयावर डेटा प्रदान केला. वायू प्रदूषणामुळे जगभरात सुमारे 3.7 दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 7 दशलक्ष लोक प्रदूषित हवेच्या संपर्कात आल्याने मरण पावले. आणि हे एका वर्षात झालेले आहे. हवेमध्ये 98 ते 99% नायट्रोजन आणि ऑक्सिजन असते, उर्वरित: कार्बन डायऑक्साइड, पाणी आणि हायड्रोजन हे मुख्य घटक. पाणी आणि ऑक्सिजन सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक. शुद्ध हवा आपल्याला देण्याचे काम झाडे करतात. झाडामुळेच आपल्याकडे पाऊस पडतो. म्हणजे, झाडेच आपल्याला पाणी पाजतात आणि जागवतात. पाणी आणि झाडे आज संपत आहेत. हे कसे थांबवणार? हा माणसापुढील सर्वात मोठा प्रश्न. सूर्यकिरणांची दाहकता वाढल्यास जागतिक तापमान वाढ होण्याची शक्यता असते. परंतु सध्याच्या परिस्थितीत सूर्य किरणांचे उत्सर्जन हे नेहेमीप्रमाणे आहे. किरणांची दाहकता कमी जास्त झाल्यास जागतिक तापमान तात्कालिन कमी जास्त होते, दीर्घकालीन दाहकता कमी अथवा जास्त झालेली नाही, त्यामुळे सध्याच्या तापमान वाढीस हरितगृह परिणामच जवाबदार आहे. इ.स. १९६० च्या दशकामध्ये जागतिक तापमानवाढीचा शोध लागला हे खरे. परंतु नेमके परिणाम कोणते याचा थांग त्याकाळी लागणे अवघड झाले. इ.स. १९९० च्या दशकात ओझोनच्या प्रश्नाने जगाचे लक्ष वेधल्यावर तापमानवाढीचे परिणाम काय असतील यावर चर्चा झाली. ती अद्याप सुरु आहे. जगातील विविध भागातील होणारे बदल तपासण्यात आले. सर्वात दृश्य परिणाम दिसला तो हिमनद्यांवर गेल्या शंभर वर्षात जगातील सर्वच भागातील हिमनद्यांचा आकार कमी झालेला. तापमान वाढीने पडणाऱ्या बर्फापेक्षा वितळाणाऱ्या बर्फाचे प्रमाण जास्ती झाले आणि हिमनद्या वितळू लागल्या. या हिमनद्या सुद्धा मानवांकडून धोक्यात आहेत. हे सर्व कळत असतांना सुद्धा जल, जंगल वाचले पाहिजे त्याचे संवर्धन केले पाहिजे असे कुणालाही वाटत नाही. सह्याद्री देवराई नावाने सयाजी शिंदेनी सुरु केलेली झाडे लावण्याची आणि सांभाळण्याची चळवळ सोडता आजू- बाजूला काही दिसत नाही. जागतिक तापमानवाढीस मुख्यत्वे अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युरोप, चीन, जपान हे देश जबाबदार. याचे मुख्य कारण, त्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावरील खनिज इंधनांचा वापर आणि मोठ्या प्रमाणावरील हरितगृह वायूंचे उत्सर्जन हे. यातील अमेरिका हा सर्वाधिक हरितगृह वायूंचे उत्सर्जन करणारा देश. हा देश शेवटपर्यंत क्योटो करारात सहभागी झाला नाही. जपानमधील क्योटो या शहरात १९९७ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वाखाली क्योटो परिषद म्हणून हा प्रयत्न प्रसिद्ध आहे. या परिषदेत ३७ औद्योगिक देशांना आणि युरोपीय समुदायाला हरितगृह वायू उत्सर्जनात कपातीसाठी बंधने घालण्यात आली. उत्सर्जनासाठी उद्दिष्टही देण्यात आले. हा क्योटो करार १६ फेब्रुवारी २००५ पासून अमलात आला. २०१५ साली सर्व देशांनी मिळून जागतिक तापमान वाढीला तोंड देण्यासाठी पॅरिस करार हा नवा करार केला आहे. आपल्याकडे करार, कायदे होतात पण ते राबवले जात नाहीत. इथेच खरी खुट्टी आहे. प्रदूषण टाळण्यासाठी सोपे उपाय अनेक आहेत. हवा प्रदूषण, जल प्रदूषण, रासायनिक प्रदूषण थांबवण्यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याची गरज आहे. हे प्रयत्न अपवाद वगळता कुणी करतांना दिसत नाही. महाराष्ट्रात सिनेअभिनेते सयाजी शिंदे आणि त्यांची टिम हे सह्याद्री देवराईच्या माध्यमातून निसर्ग वाढवण्याचे काम करत आहेत. त्यांच्या टीमला आमचा सॅल्यूट आहे. हा आजचा उन्हाचा पारा कमी करायचा असेल तर प्रत्येकाला सयाजी शिंदे बनावे लागेल. तरच हे कुठेतरी थांबू शकते.
COMMENTS