अहमदनगर/प्रतिनिधी : नगरच्या कापड बाजार व बाजारपेठेच्या अन्य भागात रस्त्यावरील हॉकर्स हटवण्याच्या मागणीसाठी व्यापार्यांची एकजूट झाली असली तरी ती आता
अहमदनगर/प्रतिनिधी : नगरच्या कापड बाजार व बाजारपेठेच्या अन्य भागात रस्त्यावरील हॉकर्स हटवण्याच्या मागणीसाठी व्यापार्यांची एकजूट झाली असली तरी ती आता फुटीच्या उंबरठ्यावर आहे. काही हॉकर्सकडून रस्त्यावर बसून व्यवसाय करण्याबाबत काही हरकत नाही (ना-हरकत) असा दाखला व त्यावर व्यापार्याचा सही-शिक्का घेण्यास सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सोशल मिडियातून हा प्रकार गाजत असून, ना-हरकत दाखल्याची प्रतही व्हायरल होत आहे. दरम्यान, यामागे काही नगरी राजकारण आहे काय, यावरूनही सोशल मिडियात कॉमेंटस जोरात सुरू आहेत.
मागच्या महिन्यात कापड बाजारातील घासगल्लीत एक व्यापारी व एक हॉकर यांच्यात वाद व भांडणे झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी समर्थक गट समोरासमोर ठाकले. शिवसेना, काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीसह मनसे व शिवराष्ट्र सेनेनेही व्यापार्यांच्या बाजूने यात उडी घेतली. बाजारपेठेतून हॉकर्स व हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण कायमस्वरुपी हटवावे, या मागणीसाठी दीनदयाळ परिवाराचे प्रमुख वसंत लोढा व व्यापारी प्रतिनिधी सुभाष बायड यांनी दिवसभर उपोषण केले. त्यानंतर बाजारपेठेतील हॉकर्सची अतिक्रमणे नियमितपणे काढली जातील, अशी ग्वाही मनपाने दिली तर दुसरीकडे मनपाच्या या मोहिमेमुळे हॉकर्सच्या पोटावर पाय पडला असल्याचा दावा करून हॉकर्स संघटनेने व्यवसायासाठी पर्यायी जागा देण्याची मागणी केली. मात्र, पूर्वीचे शरण मार्केट वा जुन्या मनपाजवळील बेग पटांगणाची जागा नाकारली. त्यामुळे आता त्यांच्यासाठी नव्या जागेचा शोध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसात बाजारपेठेत ना-हरकत दाखला सही-शिक्का संकलन मोहीम चर्चेत आहे. हे कोण व का करते, हे कोणालाही माहीत नाही. पण यामुळे चर्चेला संधी मिळाली आहे. या दाखल्याच्या प्रतीवर, दुकानदाराचे नाव, दुकानाचा पत्ता, राहण्याचा पत्ता, मोबाईल नंबर अशी माहिती असून, तसेच त्यात पुढे म्हटले आहे की, मी लिहून देतो की, श्री…हे माझे मालक्की हक्काचे दुकान (नाव व सर्व्हे नंबर) समोर अनेक वर्षांपासून छोटा व्यवसाय करीत आहे. तरी यासाठी हातगाडी किंवा पथारी लावल्यावर माझी संमती आहे, मला कुठल्याही प्रकारची हरकत नाही, हे लिहून देतो…असा मजकूर व खाली सही-शिक्का असे म्हटले आहे. मात्र, या कोर्या ना-हरकत पत्राने सोशल मिडियात धूम उडवली आहे.
व्यापारी महासंघाचे आवाहन
अहमदनगर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ईश्वर बोरा यांनी या ना-हरकत दाखला सही-शिक्का मोहिमेबाबत नापसंती व्यक्त करीत महासंघाचे सदस्य असलेल्या तसेच अन्य व्यापारी संघटनांचे सदस्य असलेल्या व्यापार्यांना अशा कोणत्याही कागदावर सही-शिक्का देऊ नये, असे आवाहन केले आहे. सर्व व्यापार्यांनी याची देखील दखल घ्यावी व तदनुषंगाने निर्णय घ्यावा व कुठल्याच प्रकारे अशा स्वरूपात संमती देऊ नये, ही विनंती, असे म्हणणे त्यांनी सोशल मिडियातून मांडले आहे.
यात त्यांनी पुढे म्हटले आहे की, काही हातगाडी धारक व पथारीवाले यांनी संगनमताने एक वेगळ्या पद्धतीचा तोटका अशा फॉर्म/अर्जाच्या माध्यमातून दुकानदारांकडून सही शिक्का घेऊन आपली हातगाडी अगर पथारी लावण्यासाठी ना-हरकत गोळा करण्याचा घाट रचला आहे. त्यामुळे सर्व दुकानदारांना विनंती आहे की कोणीही आपल्या दुकानासमोर अशाप्रकारे हातगाडी अगर पथारी लावण्याकरिता कुणासही स्वसंमतीने किंवा कोणत्याही दबावाला बळी पडून देऊ नये. अन्यथा, आपण केलेल्या या संघर्षाच्या मोहिमेत एक मोठा असा अडसर आपल्यास निर्माण होईल व येणार्या भविष्यात जो कोणी अशा पद्धतीने संमती देईल, त्याला भविष्यात कोणत्याही पद्धतीची हरकत घेण्याचा अधिकार राहणार नाही. सर्वांनी आपापल्या व्यावसायिक बंधू-दुकानदार यांना या फॉर्मबाबत अवगत करून कुठल्याही प्रकारे कोणत्याही दबावाला बळी न पडता असा अर्ज देऊ नये. प्रत्येकाने आपल्या आजूबाजूच्या व आपल्या ओळखीतल्या प्रत्येक दुकानदार व व्यावसायिक बंधूंना याची माहिती द्यावी व याच्या दुष्परिणामांबाबत प्रत्येक दुकानदार-व्यवसाय बंधूला अवगत करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. सोशल मिडियातून फिरणारे हे आवाहनही चर्चेत आहे.
काट्याने काट्याचा मनसुबा
सोशल मिडियात फिरणारा ना-हरकत दाखला पत्र व व्यापारी महासंघ आवाहनाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांचेही यावरील सोशल मिडियातील भाष्य चर्चेत आहे. व्यापार्यांनो सावधान, तुमचा काट्याने काटा काढण्याचा मनसुबा आखला जात आहे…असे नमूद करून वर्मा यांनी या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, नगर शहरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमण विषयावर गेले काही दिवस बाजारपेठेत वातावरण गरम असताना यावेळी सर्व व्यापारी आणि संघटना एकवटल्यावर काही लोकांची पळताभुई थोडी झाली आहे. बेकायदा अतिक्रमणाविरोधात कायदेशीररित्या आपण ही लढाई लढत असताना यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आता शक्कल लढवली जात आहे. आता नवीन खुळ आणलंय ते म्हणजे संमती पत्र. म्हणजे तुमच्या दुकानासमोर हातगाडी लावायला तुमची संमती व हातगाडी म्हणजे अतिक्रमणच आणि तुम्हीच अतिक्रमण करायला जबाबदार आहेत म्हणून प्रशासन पुढे जाऊन तुमचा गळा धरणार. यामुळे तुमचाच कार्यक्रम तुमच्याच हाताने करायचा अन् परत काही झालं तर प्रशासन बोंबलायला मोकळं की तुम्हीच संमती दिली होती. मग तुमच्याच दोरीने तुम्हालाच बांधून ठेवण्याची ही खेळी मोडून काढा. जो कोणी तुमच्याकडे या प्रकारचं संमती पत्र घेऊन येईल त्याला उभापण करू नका, आल्या पावलानं मागं हो म्हणा. कारण, तो तुमचीच शिकार करायला आलेला आहे. असं ऐकलं होतं की, आयुर्वेदाने रोग बरा होतो, पण इथं रोग पसरेल कसा याचाच प्रयत्न होतोय. त्यामुळे व्यापारी मित्रांनो तुम्ही सतर्क राहा, ही खेळी हाणून पाडा. एकत्रित राहा…असे त्यांचे आवाहनही जोरदार लाईक्स मिळवून जात आहे.
COMMENTS