अहमदनगर/प्रतिनिधी : हिंदू-मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, बहुजन, शीख, पुरुष, स्त्री, श्रीमंत, गरीब…आणि तुम्ही व मी…अशा सर्वांच्या मृत्यूनंतरच्या कवट्या एक
अहमदनगर/प्रतिनिधी : हिंदू-मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, बहुजन, शीख, पुरुष, स्त्री, श्रीमंत, गरीब…आणि तुम्ही व मी…अशा सर्वांच्या मृत्यूनंतरच्या कवट्या एकसारख्याच असतात. मग जिवंत असताना जातीयवाद कशाला?, असा आगळावेगळा संदेश देणारी राहुरी पोलिसांची भित्तीपत्र (पोस्टर) जनजागृती मोहीम सोशल मिडियातून चर्चेत आहे. जातीयवाद, धार्मिकवादाला नका देऊ थारा! माणूस म्हणून जगू…हाच नवा नारा!, या संदेशातून समाजात धार्मिक सलोखा राखण्यासाठी राहुरी पोलिसांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या या उपक्रमाचे सोशल मिडियातून कौतुक व स्वागत होत आहे.
समाजात सध्या जातीयवाद वाढला असून, राजकीय पक्षांकडूनही त्याला खतपाणी घातले जात आहे. मशिदीवरील भोंग्यांविरुद्ध हनुमान चालिसा असा नवा वाद सध्या सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर राहुरी पोलिसांनी हाती घेतलेली जनजागृती संवेदनशील नागरिकांची दाद मिळवून जात आहे. विविध मानवी कवट्यांच्या खाली धर्माचे नाव लिहिले आहे व यातून आपण सर्व एकच आहोत हे सांगण्याचा प्रयत्न या पोस्टरद्वारे करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांची प्रेरणा व संकल्पनेतून राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी हा पोस्टर उपक्रम साकारला आहे.
सहा प्रमुख धर्माच्या मृत व्यक्ती तसेच स्त्री-पुरुष, श्रीमंत-गरीब आणि एवढेच नव्हे तर तुमची व माझीही कवटी मृत्यूनंतर एकसारखीच दिसते, मग जिवंतपणी जातीयवाद कशाला, असा सूचक सवाल उपस्थित करीत नागरिकांना या पोस्टरवर विचार करायला भाग पाडले गेले आहे. प्रत्येक घटनेला जातीय रंग देण्याच्या राजकीय मानसिकतेमुळे कायदा-सुव्यवस्था राखण्याचा ताण पोलिसांवर जास्त पडू लागला आहे. हाडामांसांचे मानवी शरीर सर्वांचेच सारखे असते. निधन झाल्यावर प्रत्येकाचा विविध धर्मानुसार अंत्यविधी होतो. पण या मृत शरीराची स्थिती सर्वांचीच सारखीच असते. त्यामुळे जातीय व धार्मिक वाद माणूस जिवंत असेपर्यंत असतो, असा संदेश देणारे हे पोस्टर नागरिकांची दाद मिळवून जात आहे.
COMMENTS