मुंबईत भोंग्याचे राजकारण पेटले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत भोंग्याचे राजकारण पेटले

मनसेकडून मशीदीसमोर लाऊडस्पीकरवर लावली हनुमान चालिसा

मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही मशीदीसमोर हनुमान चालिसा लावू असा इशारा गुढीप

डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी हे कराच
मुळा धरणातील गाळ काढण्यासाठी येणार वेग
श्री सिध्दनाथ-जोगेश्‍वरी हळदी समारंभ मोठ्या उत्साहात

मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही मशीदीसमोर हनुमान चालिसा लावू असा इशारा गुढीपाडव्याच्या सभेला दिला होता. त्यानंतर रविवारी मुंबईत भोंग्याचे राजकारण पेटल्याचे बघायला मिळाले आहे. घाटकोपरमध्ये मनसे सैनिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयावर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा सुरू केला आहे.
दिवसभर लाऊडस्पीकरवरून हनुमान चालिसा लावला जाणार असल्याचे मनसेने म्हटले आहे. विशेष म्हणजे रमजान सुरू झालेला असतानाच मनसेने हनुमान चालिसा सुरू केल्याने मुंबईसह राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आम्ही आमच्या कार्यालयावर हनुमान चालिसा सुरू केला आहे. अजानमुळे जर धार्मिक तेढ निर्माण होत नाही तर हनुमान चालिसा सुरू केल्याने वातावरण कसे काय बिघडू शकते? असा सवाल मनसेच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे.
घाटकोपरच्या पश्‍चिमेकडील चांदिवली येथे मनसेच्या शाखेवर लाऊडस्पीकर सुरू करून हनुमान चालिसा सुरू करण्यात आला आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वात हे लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा सुरू करण्यात आला आहे. हनुमान चालिसा संदर्भात राज ठाकरे यांनी कोणतेही नियम लावले नाहीत. फक्त कालच्या भाषणातील राज ठाकरे यांचे आवाहन ऐकूनच हे भोंगे लावून हनुमान चालिसा सुरू करण्यात आला आहे. दिवसभर हनुमान चालिसा लावण्यात येणार असल्याचे मनसे पदाधिकार्‍यांनी सांगितले. राज ठाकरे यांचा आदेश. मनसे कार्यकर्ता म्हणून आदेशाचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी आजपासून सुरूवात केली आहे. रोज भोंगे वाजणार आहेत. त्यावर हनुमान चालिसा, गायत्री मंत्र, गणपतीची आरतीसह हिंदू धर्माशी निगडीत सर्व आरत्या या ठिकाणी वाजणार आहेत. तणाव कशाला होणार? हा धार्मिक कार्यक्रम आहे. त्यांची अजान होते. त्याने तणाव झाला का? नाही ना? हिंदू धर्माची आरती वाजली तर तणाव का? असा प्रश्‍नच का? आम्ही आमच्या धर्माचा प्रसार करतो, असं मनसेचे पदाधिकारी महेंद्र भानुशाली यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांनी 2 एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. दोन वर्षांनी मनसेचा पाडवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. नेहमीप्रमाणेच राज ठाकरेंची ही सभाही गाजली. या सभेत राज ठाकरे यांनी प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. तसेच मशिदीवरील भोंगे काढण्याचा निर्णय घ्या, असा इशारा सरकारला दिला. त्यानंतर रविवारी मुंबईत भोंग्याचे राजकारण बघायला मिळाले.

राज ठाकरे सरड्यासरखे रंग बदलतात : अजित पवार
गुढी पाडव्याचा दिवशी राज ठाकरेंनी केलेल्या भाषणावर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत राज ठाकरेंच्या भाषणाचा समाचार घेतला आहे. राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात. त्यांना नकला आणि टीका करण्याशिवाय काहीच येत नाही. त्यांनी एकदा परीक्षण करावं की त्यांचे आमदार त्यांना सोडून का गेले. नुसती भाषणं करुन लोकांचे प्रश्‍न सुटत नाहीत. तसेच केंद्र विरोधात मागे राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवरूनही त्यांनी टोलेबाजी केलीय.

COMMENTS