काँग्रेस ला केवळ काँग्रेसचं हरवू शकते

Homeताज्या बातम्यासंपादकीय

काँग्रेस ला केवळ काँग्रेसचं हरवू शकते

नुकत्याच 5 राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाली नाही. काँग्रेसला भाजप किंवा अन्य कोणताही पक्ष हरवू शकत नाही, काँग्रेसला काँग्र

तापमानवाढ रोखण्याचे आव्हान
शिक्षणाविषयी उदासीनता
अपघाताचा नव्हे मृत्यूचा महामार्ग

नुकत्याच 5 राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाली नाही. काँग्रेसला भाजप किंवा अन्य कोणताही पक्ष हरवू शकत नाही, काँग्रेसला काँग्रेसच हरवू शकते, असे जे म्हटले जाते, तेच खरे ठरते. सत्ता नसेल, तर काँग्रेसचे नेते किती अस्वस्थ होतात, याचे उदाहरण गेल्या काही दिवसांतील घटनांवरून स्पष्ट होते. सत्ता असेल, तर पक्षश्रेष्ठींविरोधात बोलायची हिंमत एकाही नेत्यात नसते; परंतु सत्ता गेली, तर मग नेत्यांची हिंमत वाढते, असा अनुभव कायम येत असतो. खरेतर 1984 च्या निवडणुकीनंतर काँग्रेसला कधीही स्वबळावर सत्ता मिळविता आलेली नाही. आघाडी करून काँग्रेसने 1991 आणि 2004 मध्ये सत्ता मिळाली. 15 वर्षांत काँग्रेसकडे सत्ता होती; परंतु या काळात सध्या जी 23 मध्ये असलेल्या नेत्यांनी कधीच पक्षाच्या नेतृत्वाविरोधात बंड केले नाही. आता पक्षाच्या नेत्यांना पक्ष मजबूत करण्याची जी काळजी वाटते आहे, ती यापूर्वी कधीही वाटली नव्हती. लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुकानंतर तर देशात कधी काळी हा पक्ष सत्तेत होता, असेही वाटत नाही. काँग्रेसची इतकी अधोगती झाली, की त्यातून सावरण्याचे सोडा, उलट काँग्रेस आणखी खोल खोल गर्तेत चालली. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आत्मचिंतन करून काय चुका झाल्या, त्यातून काय बोध घ्यावा, असे कुणाला वाटले नाही. पक्षनेतृत्वही जुन्या मानसिकतेतून बाहेर पडायला तयार नाही. पराभव झाल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम द्यायचा, धीर द्यायचा प्रयत्न पक्ष नेतृत्वाने केला नाही. देशात फिरून पक्षाची पुनर्बांधणी, पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा असा प्रयत्न नेतृत्वाकडून झाला नाही. लोकसभेच्या गेल्या निवडणुकीतील पराभवानंतर पक्ष आणखी सैरभैर झाला. राजकीय पर्यटन करण्यासारखे राजकारण होत नसते, याचा विसर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना पडला. गेल्या निवडणुकीतील अपयशानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला; परंतु त्यानंतरच्या दीड वर्षांत काँग्रेसला अध्यक्षही देता आला नाही. सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद देण्यात आले; परंतु बहुतांश निर्णय अजूनही राहुल गांधी हेच घेत आले आहेत. गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष करण्याची भाषा राहुल यांनी केली; परंतु पक्षाला दीड वर्षांत गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष शोधण्यात पक्षाला आणि पक्षश्रेष्ठींना यश आले नाही. आता आता तर राहुल गांधी यांनी पुन्हा पक्षाध्यक्षपद स्वीकारण्याची तयारी दाखविली. त्यातून त्यांचा वैचारिक गोंधळ कायम राहिला. काँग्रेसच्या 23 नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पक्षाला पूर्णवेळ आणि सर्वसमावेशक अध्यक्ष देण्याची मागणी केली, त्यात काहीच गैर नव्हते; परंतु या नेत्यांना भाजपसमर्थक ठरवून त्यांचा पाणउतारा करण्यात आला.
काँग्रेसला अंतर्गत गटबाजी नवी नाही. सत्तेच्या काळात या गटबाजीचे प्रदर्शन फार होत नाही. सत्ता त्यावर उतारा असतो आणि गटबाजी थांबविता येते; परंतु सत्ता नसली, की पक्षश्रेष्ठींचा दरारही कमी होतो. त्यांच्याविरोधातील बंडाला धार येते. काँग्रेसमध्ये सध्या त्याचा अनुभव येत असतो. नेत्यांना संघटनेत आणि सत्तेत कितीही वाटा दिला, तरी त्यांचे  समधान होत नसते. त्यामुळे विकलांग नेतृत्वाविरोधात बंडाची भाषा त्यांच्या तोंडून येते. लोकसभा निवडणुकीनंतर बिहारमध्ये काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. नुकत्याच चार राज्यात झालेल्या निवडणुकीत देखील काँग्रेसच्या हाती सत्ता आली नाही.
पश्‍चिम बंगालमधील काँग्रेसच्या आघाडीवरून पक्षातील अंतर्गत मतभेद आणखी तीव्र झाले असून ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील स्तुतिसुमने बंद करा’, असा हल्लाबोल लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते व पश्‍चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी काँग्रेसमधील बंडखोर ‘जी-23’ गटातील नेत्यांवर केला. काँग्रेसने पश्‍चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांशी युती केली असून त्यात आता मुस्लिम धर्मगुरू अब्बास सिद्दीकी यांचा इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) हा पक्षही सहभागी झाला आहे. प्रक्षोभक विधाने करून सिद्दीकी अनेकदा वादात सापडले आहेत. त्यांचा पश्‍चिम बंगालमधील मुस्लिम समुदायावर प्रभाव असला तरी त्यांच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह उभे केले गेले होते. ‘जी-23’ गटातील नेते आनंद शर्मा यांनी हाच मुद्दा उपस्थित करून काँग्रेसच्या ‘आयएसएफ’ला सहभागी करून घेण्यावर आक्षेप घेतला. काँग्रेस सर्व प्रकारच्या धर्मांधतेविरोधात नेहमी लढत आला असल्याचे ट्वीट शर्मा यांनी केले होते. पश्‍चिम बंगालमध्ये आघाडी करण्यासंदर्भात कार्यकारी समितीत चर्चा करायला हवी होती, असाही मुद्दा शर्मा यांनी उपस्थित केला होता. त्यावरून काँग्रेसमध्ये गांधी निष्ठावान आणि बंडखोर नेत्यांमध्ये वाद सुरू आहे. चौधरी यांनी बंडखोर नेते हेच मोदींचे कौतुक करून धर्माध भाजपला बळ देत असल्याचा आरोप केला. आझाद यांनी जम्मूमधील संमेलनात मोदी यांची स्तुती केली होती. त्यावर, ‘निवडक मान्यवर काँग्रेसवासींनो (जी-23 गट) वैयक्तिक लाभाचा मोह सोडा आणि पंतप्रधानांवर स्तुतिसुमने उधळण्यात वेळ दवडू नका.. पक्षाला मजबूत करा, तुम्हाला मोठे करणार्‍या पक्षाच्या मुळावर घाव घालू नका’’, असे ट्वीट अधीर रंजन यांनी केले आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने पश्‍चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांशी आघाडी केली आहे. ‘आयएसएफ’ला डाव्या पक्षांच्या कोट्यातून जागांचे वाटप केले जाईल. शिवाय, पाच राज्यांमध्ये भाजपविरोधात काँग्रेसला बळकट करा. भाजपच्या धोरणांची री ओढू नका, असे आवाहन ही अधीर रंजन यांनी केले आहे. जम्मूमधील संमेलनात काँग्रेस नेतृत्वावर झालेल्या अप्रत्यक्ष टीकेवर पक्षाने अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही; मात्र जम्मूमधील काँग्रेस कार्यकर्त्यांंनी मंगळवारी आझाद आणि शर्मा यांच्या प्रतिमेचे दहन करून राहुल गांधी झिंदाबादच्या घोषणा दिल्या. ही निदर्शने गांधी निष्ठावानांकडून ‘जी-23’ गटाला दिलेले प्रत्युत्तर मानले जात आहे

COMMENTS