पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने मुन्नाभाई फरार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने मुन्नाभाई फरार

नगर शहरासह जिल्हाभरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ

अहमदनगर/प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे आरोग्य सेवेची कोणतीही पदवी नसताना एक बोगस डॉक्टर मागील अनेक वर्षांपासून लोकांची उपचाराच्या नावाखा

 दुचाकी वाहन चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयीत पोलिसांच्या जाळ्यात 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युवक काँग्रेसचा दबदबा
चौरंगीनाथ महाराजांच्या यात्रेचा श्रीफळ वाढवून शुभारंभ

अहमदनगर/प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे आरोग्य सेवेची कोणतीही पदवी नसताना एक बोगस डॉक्टर मागील अनेक वर्षांपासून लोकांची उपचाराच्या नावाखाली फसवणूक करीत असल्याची माहिती उजेडात आली होती. मात्र, या डॉक्टरवर कारवाई करण्याबाबत कोणतीही ठोस पावले उचलली जात नव्हती. अखेर वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेवरून आश्‍वी पोलिस ठाण्यात शुक्रवारी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला, पण आता तो बोगस डॉक्टर पसार झाला आहे. दरम्यान, नगर शहर, उपनगर व जिल्हाभरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे.
बोगस डॉक्टर मुन्नाभाईबाबत आश्‍वी पोलिस ठाण्यात आरोग्य अधिकारी कोंडाजी मदने यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पानोडी गावात कोणताही वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना नसताना आरोपी डॉ. असिम दास (पूर्ण नाव माहीत नाही) हा त्याच्या नावाचा फलक लावून लोकांना डॉक्टर असल्याचे भासवून फसवणूक करीत होता. वैद्यकीय व्यवसायाची पदवी नसताना या पदवीचा फलकावर उल्लेख करुन महाराष्ट्र कौन्सिलची कोणतीही नोंदणी नसताना वैद्यकीय व्यवसाय करीत होता, असे तक्रारीत म्हटले आहे. यावरून दास या आरोपीविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 चे कलम 33 व 36 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार एस. एस. पवार करीत आहेत. आरोपी पसार झाल्याची माहिती मिळाली आहे.

वृद्ध शेतकर्‍याचा निर्घृण खून
75 वर्ष वयाच्या शेतकर्‍याच्या डोक्यात हत्याराने मारुन त्यांचा खून करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार मळेगाव शिवारात घडला. शेवगाव तालुक्यातील मळेगाव शिवारात मोतीलाल वामन साळवे यांच्या शेताजवळ शिवरस्त्याच्या बाजूला एका वृद्धाच्या डोक्यात हत्याराने मारुन तसेच शरीरावर मारहाण करुन खून करण्यात आला. या प्रकरणी शेवगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासात मृत वृद्धाच्या अंगावरील कपडे व चप्पल पोलिसांनी कमल मारुती सोमुसे (वय 65, धंदा शेती, रा.तळवणी, ता. शेवगाव) यांना दाखविली असता त्यांनी ते ओळखले व पती मारुती तुकाराम सोमुसे (वय 75) यांचे ते असल्याचे सांगितले. त्यानंतर कमल मारुती सोमुसे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरुद्ध शेवगाव पोलिसात भा.द.वि. कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक बागुल करीत आहेत.

तरुणीचा विनयभंग
राहुरी परिसरात वांजुळपोई भागात राहणारी एक विवाहित तरुणी दांगट यांच्या वस्तीवर शेतातून येत असताना सचिन चव्हाण (रा. शेंदडगाव, ता. राहुरी) याने तरुणीला पाठीमागून मिठी मारुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केला. तरुणीने आरडाओरड करताच व तिचा पती आल्याचे पाहून आरोपी पळून गेला. भर दुपारी 4 वाजता हा प्रकार घडला. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरुन राहुरी पोलिसात सचिन चव्हाणविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस नाईक भवारे करीत आहेत.

जिन्यातून पडून मृत्यू
नेवासा तालुक्यातील सोनई परिसरात राहणारा तरुण जगदीश काकासाहेब चांदघोडे (वय 30) हा श्रीशनिशिंगणापूर देवस्थान येथून रात्री 11 वाजता निघून घराच्या जिन्यातून पाय घसरुन रस्त्यावर पडून नाका-तोंडातून रक्त आल्याने त्याला नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी जगदीश चांदघोडे हा उपचारापूर्वीच मृत झाल्याचे सोनई पोलिसांना कळविले. या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात सीआरपीसी 174 अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जगदीश चांदघोडे याच्या मृत्यूप्रकरणी पोलिस हवालदार गर्जे पुढील तपास करीत आहेत.

राहुरीत गुटखा पकडला
राहुरी शहरात पाण्याच्या टाकीजवळ 5 नंबर नाका रस्त्याच्या कडेला पोलिसांनी छापा टाकून हिरा पान मसाला, सुगंधी तंबाखू, गुटखा पकडला. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल शेख यांच्या फिर्यादीवरुन आरोपी प्रताप बापूसाहेब उंडे (वय 38, रा. खळवाडी, राहुरी) याच्याविरुद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिरा पानमसाला व गुटखा मानवी शरीरास अपायकारक, मुर्छाकारक, नशाकारक असतानाही बेकायदेशीर विक्रीच्या उद्देशाने उंडे याच्या ताब्यात गुटखा मिळून आला. पोलिस निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक बोकील पुढील तपास करीत आहेत.

अनोळखी मृतदेह आढळला
श्रीरामपूर रेल्वे स्टेशनजवळ रुळावर अनोळखी मृतदेह आढळला. श्रीरामपूर शहरातील बेलापूर रेल्वेस्टेशन ते पढेगाव जाणार्‍या रेल्वे रुळ कि.मी. नं. 41516.8 च्यामध्ये एक्सप्रेस गाडीखाली सापडून एक अनोळखी जागीच ठार झाला. त्याचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रेल्वे रुळावर आढळल्याचे रेल्वे एक्सप्रेस गाडीच्या चालकाने बेलापूर उपरेल्वे स्टेशन प्रबंधकांना कळविले. त्यांनी शहर पोलिसांना खबर दिली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात सीआरपीसी 174 अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ही व्यक्ती कोण? त्याने रेल्वे खाली आत्महत्या का केली? याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल परदेशी करीत आहेत.

गुन्हेगारी घटनामध्ये वाढ
नगर शहरासह उपनगर व जिल्हाभरातील विविध तालुक्यांतून चोरीच्या व अन्य गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून चोरांच्या झालेल्या सुळसुळाटीमुळे नागरिकांत भीतीचे सावट पसरले आहे. पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक निर्ढावले आहेत. शहरासह जिल्हाभरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता पोलीस प्रशासन प्रयत्न करीत असून शहरासह तालुक्याचा वाढता विस्तार पाहता तसेच पोलिसांचे असलेले अपुरे संख्याबळ यामुळे चोरीच्या घटना वाढ होत आहे. पोलीस नागरिकांच्या मालमत्तेचे व जीविताचे रक्षण करतात, परंतु हे कर्तव्य बजावताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असले तरी नागरिकांनीही स्वतःच्या मालमत्तेचे व जीविताचे रक्षण करण्याकरिता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येत आहे.

COMMENTS