अहमदनगर/प्रतिनिधी : स्वस्त धान्य दुकानाचे धान्य चोरून विकताना रंगेहात पकडूनही रेशन दुकानदार मोकाटच असल्याने त्याच्यावरील कारवाईसाठी उपोषणाचा इशारा दे
अहमदनगर/प्रतिनिधी : स्वस्त धान्य दुकानाचे धान्य चोरून विकताना रंगेहात पकडूनही रेशन दुकानदार मोकाटच असल्याने त्याच्यावरील कारवाईसाठी उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील घुगलवडगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील धान्य चोरून विकताना व बेकायदेशीर वाहतूक करताना 31 जानेवारी रोजी स्वस्त धान्य दुकान चालकाला ग्रामस्थांनी रंगेहात पकडले होते. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर पुरवठा विभागाने पंचनामा केला. परंतु जवळपास दीड महिना होऊनही दुकानदारावर कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही व दुकानदाराचा परवानाही निलंबित न झाल्याने घुगलवडगाव येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ जिल्हा विभागाच्या कार्यालयापुढे दि. 22 मार्च रोजी उपोषण आंदोलन करणार आहेत.
याबाबत जिल्हा पुरवठा विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामस्थांनी दि.31 जानेवारी रोजी स्वस्त धान्य दुकानाचे धान्य चोरीच्या उद्देशाने बेकायदेशीर वाहतूक करताना दुकान चालक दत्तात्रय दांगडे यांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडले. त्यानंतर येथील या दुकानदाराची तक्रार तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्याकडे केली होती. त्यानंतर पुरवठा विभागाने पंचनामा केला होता. यावेळी तक्रारी असल्याने दुकानदाराचा दुकान निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकार्यांकडे त्वरीत पाठवून देतो, असे आश्वासन ग्रामस्थांना याच दिवशी तहसीलदारांनी दिले होते. परंतु संबंधित दुकानदाराविरुद्ध तहसीलदार यांनी धान्य चोरून विक्रीची फिर्याद पोलिसांकडे दिली नाही आणि संबंधिताचा दुकान परवानाही अद्यापही रद्द न केल्याने मंगळवार दि. 22 मार्चपासून अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थ उपोषण करणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर सरपंच मिलिंद कदम व उपसरपंच सविता गलांडे यांच्या सह्या आहेत. हे निवेदन मुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा आयुक्त (नाशिक), अहमदनगर जिल्हाधिकारी, श्रीगोंदा तहसीलदार व श्रीगोंदा पोलिस निरीक्षक यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
COMMENTS