पुणे दि.६ - पुणे शहर आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रप्रेमाच्या प्रेरणेसाठी प्रसिद्ध आहे. पुण्याने शैक्षणिक, संशोधन आणि विकास, माहिती तंत्रज्ञान आण
पुणे दि.६ – पुणे शहर आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रप्रेमाच्या प्रेरणेसाठी प्रसिद्ध आहे. पुण्याने शैक्षणिक, संशोधन आणि विकास, माहिती तंत्रज्ञान आणि वाहन उद्योग क्षेत्रात आपली ओळख प्रस्थापित केली आहे. त्यामुळे आधुनिक सुविधा गरजेच्या असून त्यासाठी सुरु करण्यात आलेल्या विकास प्रकल्पांसाठी केंद्र सरकार सहकार्य करेल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. एमआयटी महाविद्यालय मैदानावर आयोजित विविध विकास प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार प्रकाश जावडेकर, गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, उषा ढोरे आदी उपस्थित होते. प्रधानमंत्री श्री.मोदी म्हणाले, पुणे मेट्रो पुण्यातील वाहतूक व्यवस्थेला मजबूत करेल. जनतेला गर्दी आणि वाहतुकीच्या खोळंब्यापासून मुक्त करेल. पुण्यातील जनतेचे जीवनमान अधिक सुखकर करेल. कोरोना संकटकाळातही मेट्रो प्रकल्पाचा एक टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. पुणे मेट्रोसाठी सौर ऊर्जेचाही मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. त्यामुळे दरवर्षी २५ हजार टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होईल. या प्रकल्पासाठी कामगारांनी दिलेले योगदान सामान्य माणसासाठी उपयुक्त ठरेल.
नागरिकांनी मेट्रोने प्रवास करावा
देशात वेगाने शहरीकरण होत आहे. २०३० पर्यंत शहरी लोकसंख्या ६० कोटीपेक्षा अधिक होईल. शहराची वाढती लोकसंख्या संधी निर्माण करण्यासोबत आव्हानेही निर्माण करते. शहराच्या विस्तारासोबत रस्ते वाहतुकीला मर्यादा येतात. अशावेळी सार्वजनिक वाहतूक सुविधेचा विकास हाच सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे केंद्र सरकार अशा वाहतूक सुविधांवर आणि विशेषत: मेट्रो प्रकल्पावर विशेष लक्ष देत आहे.
आज देशातील दोन डझनापेक्षा अधिक शहरात मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आदी ठिकाणी मेट्रो रेल्वेचा विस्तार होत आहे. शहरातील सर्वस्तरातील नागरिकांनी मेट्रो रेल्वेत प्रवासाची सवय लावून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. मेट्रो प्रवासामुळे शहराला मदत होईल, असेही ते म्हणाले.
COMMENTS