इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर (निनाईनगर) येथील ’जयंत प्रिमियर कबड्डी लिग’च्या तिसर्या दिवशीच्या सामन्यात स्व.जगदीशआप्पा पाटील रायडर्स (कामेर
इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर (निनाईनगर) येथील ’जयंत प्रिमियर कबड्डी लिग’च्या तिसर्या दिवशीच्या सामन्यात स्व.जगदीशआप्पा पाटील रायडर्स (कामेरी) व आदिती पँथर्स (ओझर्डे) या संघांनी आप-आपल्या प्रत्येकी तीनही संघावर दणदणीत विजय मिळवित स्पर्धेतील आपले स्थान भक्कम केले. स्फुर्ती रॉयल्स (जुनेखेड), जय हनुमान नागरी पतसंस्था टायगर्स (इस्लामपूर),राजारामबापू ईगल्स (कासेगाव) या तीन संघांना पात्रता फेरीत खेळण्यासाठी निकराची झुंज द्यावी लागेल. राज्याचे जल संपदामंत्री ना. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येथील जयंत स्पोर्ट्सच्या वतीने ’प्रो कबड्डी’च्या धर्तीवर या लिगचे आयोजन केले आहे. या लिगला कबड्डी क्रीडा प्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
स्व. जगदीशआप्पा पाटील रायडर्स (कामेरी) या संघाने राजारामबापू ईगल्स (कासेगाव) या संघावर 3 गुणांनी, स्फुर्ती रॉयल्स (जुनेखेड) या संघावर 14 गुणांनी तर राजेंद्रभाऊ युवा मंच फायटर्स (वाळवा) या संघावर 20 गुणांनी विजय मिळविला आहे. आदिती पँथर्स (ओझर्डे) या संघाने मा.राजेंद्रभाऊ युवा मंच फायटर्स (वाळवा) या संघावर 7 गुणांनी, स्व. शरद लाहिगडे हरिकेन्स (कासेगाव) या संघावर 17 गुणांनी तर राजारामबापू ईगल्स (कासेगाव) या संघावर 6 गुणांनी विजय मिळविला. राजारामबापू ईगल्स (कासेगाव) या संघाने शिराळा कोब्रा (शिराळा) या संघास 5 गुणांनी मात दिली. तर जय हनुमान पतसंस्था टायगर्स (इस्लामपूर) या संघाने स्व. शरद लाहिगडे हरिकेन्स (कासेगाव) या संघास 5 गुणांनी पराभूत केले. चौथ्या दिवशी (रविवारी) होणार्या सामन्यात राजारामबापू ईगल्स (कासेगाव), जय हनुमान पतसंस्था टायगर्स (इस्लामपूर) आणि स्फुर्ती रॉयल्स (जुनेखेड) या तिन्ही संघांना आपला ’पुढचा मार्ग’ निश्चित करण्यासाठी ’करो वा मरो’ या त्वेषाने खेळावे लागणार आहे.
अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार विजेते, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू शांतारामबापू जाधव (पुणे), राजु भावसार (सांगली) व शिव छत्रपती पुरस्कार विजेते गणेश शेट्टी (सांगली) यांनी कबड्डी मैदानास भेट देवून स्पर्धेच्या नेटक्या संयोजनाचे कौतुक केलेफ खेळाडूंना प्रोत्साहन दिले. राष्ट्रीय कबड्डी पटू, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, जयंत स्पोर्ट्स चे अध्यक्ष सागर जाधव, प्रशिक्षक विजय देसाई (सोन्याबापू), उमेश रासनकर, शिवाजी पाटील यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला.
राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, माजी नगराध्यक्ष पै. भगवान पाटील, सुभाषराव सुर्यवंशी, संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव चव्हाण, राष्ट्रीय कबड्डीपटू सुनील कुंभार, पै. राजाराम माळी, रतन रायगांधी, सौ. शुभांगी शेळके, संजय देशमुख (कासेगाव) यांच्यासह कबड्डीवर प्रेम करणार्या असंख्य क्रीडाप्रेमींनी मैदानास भेट देवून कबड्डीचा आनंद घेतला.
गौतम वगरे (कासेगाव), धनाजी सिध्द (ऐतवडे खुर्द), तुषार धनवडे (वाळवा), गणेश भस्मे (माधवनगर), झाकीर इनामदार (सांगली), आलम मुजावर (सांगली), निलेश देसाई (सांगली) यांनी पंच म्हणून, तर राष्ट्रीय खेळाडू विकास पाटील (कामेरी) यांनी तांत्रिक समिती सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली. टाकवडे (ता. शिरोळ) चे विशाल कांबळे व सहकार्यांचा हलगी-घुमक्याचा ठेका आणि सुरेश पाटील (सांगली), प्रसाद कुलकर्णी (राजारामनगर) यांच्या प्रभावी समालोचनाने स्पर्धेची रंगत चांगलीच वाढविली.
कासेगाव कबड्डीपटूंची खाण॥
जयंत प्रिमियर लिगमध्ये कासेगावचे राजारामबापू ईगल्स व कै. शरद लाहिगडे हरिकन्स हे आठपैकी दोन संघ आहेत. गावातील राजारामबापू, क्रांतिसिंह, कृष्णा खोरा, शिव गर्जना या चार मंडळातील साधारण 25-30 खेळाडू या लिगमध्ये खेळत आहेत. लिगमधील बहुतेक सर्व संघात कासेगावचे 4-2 खेळाडू आहेत. प्रसिध्द कबड्डीपटू काशीलिंग आडके, नुकत्याच पार पडलेल्या 8 व्या प्रो कबड्डीमध्ये बंगाल वॉरिअर्समधून खेळलेला रविंद्र कुमावत कासेगावचाच. गावातील राष्ट्रीय कबड्डीपटू नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत.
COMMENTS