गत निवडणूकीत अतिविद्वानासह अतिअडाणी चेअरमनला सभासदांनीच नाकारले : डॉ. अतुल भो

Homeमहाराष्ट्रसातारा

गत निवडणूकीत अतिविद्वानासह अतिअडाणी चेअरमनला सभासदांनीच नाकारले : डॉ. अतुल भो

कृष्णा कारखान्याला गेल्या 10 वर्षांपूर्वी एक अतिविद्वान आणि एक अतिअडाणी चेअरमन लाभल्यामुळे कारखान्याची मोठी अधोगती झाली.

कराडकरांची तहान भागविण्यासाठी डॉ. अतुल भोसले मैदानात
नवीन मुजामपेट येथील पंधरा लाखाचा रस्ता दोन लाखात बनविला
वसंतदादा पाटील महाविद्यालयात स्वा. सावरकर यांची जयंती साजरी

कराड / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याला गेल्या 10 वर्षांपूर्वी एक अतिविद्वान आणि एक अतिअडाणी चेअरमन लाभल्यामुळे कारखान्याची मोठी अधोगती झाली. जागतिक दर्जाचे व्याख्यान देऊन व खुर्चीखाली नारळ ठेवून चांगला कारभार करता येत नाही, याची जाणीव विरोधकांना सभासदांनी करून दिली आहे. त्यामुळे 5 वर्षांपूर्वी या अतिविद्वान आणि अतिअडाणी चेअरमनला सभासदांनी सपशेल नाकारले, असा सणसणीत टोला कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी माजी चेअरमन अविनाश मोहिते आणि डॉ. इंद्रजीत मोहिते यांना नामोल्लेख टाळत लगावला. रेठरे खुर्द (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना सभासद संपर्क भेटीप्रसंगी नुकतेच ते बोलत होते.

आपल्या भाषणात डॉ. भोसले पुढे म्हणाले, की सभासदांनी माजी दोन अध्यक्षांना सत्तेची संधी दिली. पण त्या दोन्ही अध्यक्षांनी सभासदांचा अपेक्षाभंग केला. सक्षम नेतृत्व नसणारे सत्तेत गेले की संस्था बंद पडायला वेळ लागत नाही. आमचे चुलते आता ब्राझीलमध्ये काय सुरू आहे, या विषयावर सभासदांसोबत बोलतात. पेशाने डॉक्टर आहेत, मात्र स्वतःचा दवाखाना त्यांनी कोरोना काळात बंद ठेवला. दुसर्‍या माजी अध्यक्षांना त्यांच्या काळात केलेल्या घोटाळ्यातून बाहेर पडण्यासाठी सत्ता हवी आहे. मात्र, सभासदांनी यांना चांगलेच ओळखले आहे. गेल्या वर्षी कोरोना काळात हे विरोधक कुठे होते. नेहमी निवडणूक आली की कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टवर बोलतात. कोरोना काळात लोकांनी कृष्णा हॉस्पिटलचे काम बघितले आहे. त्यामुळे विरोधकांना कृष्णा ट्रस्टवर टीका करता येत नाही. म्हणूनच ते आता खोटेनाटे आरोप करत सुटले आहेत.

विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी पाच वर्षे कारखान्याचा कारभार पारदर्शीपणे केला. विरोधकांना बोलायला मुद्दा राहिला नाही, म्हणून काही लोक बिनबुडाचे आरोप करत आहेत. विरोधकांना चांगले चाललेले काही दिसत नाही. मुळात विरोधकांनी कारभारच भ्रष्ट पध्दतीचा केल्याने त्यांची दृष्टीही तशीच बनली आहे, असे प्रतिपादन डॉ. भोसले यांनी केले.

याप्रसंगी राहुल पाटील, धनाजी जाधव, वसंत मोरे, उपसरपंच चंद्रकांत पाटील, मराठा सेवा सोसायटीचे अध्यक्ष जयवंत नलवडे, सोसायटीचे अध्यक्ष सागर साळुंखे, प्रकाश पाटील, बी. एल. मोहिते, बजरंग कळसे, गणेश पाटील, धोंडीराम तांदळे, अशोक गावडे, सुभाष मोहिते, सर्जेराव पाटील, आनंदा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

COMMENTS