बावधनची प्रसिध्द बगाड यात्रा गनिमी काव्याने; बघ्याच्या भूमिकेतील पोलिसांकडून धरपकड सुरु

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बावधनची प्रसिध्द बगाड यात्रा गनिमी काव्याने; बघ्याच्या भूमिकेतील पोलिसांकडून धरपकड सुरु

वाई तालुक्यातील बावधन येथे पहाट होण्यापुर्वीच ग्रामदैवत सोमेश्‍वराच्या मंदिराजवळ ग्रामस्थ एकत्र आले.

ठाण्यात लिफ्ट कोसळून 7 कामगारांचा मृत्यू
सिक्कीममध्ये अपघातात भारताचे 16 जवान शहीद
मुंबई मेट्रोच्या डब्यात पाणीगळती

वाई / प्रतिनिधी : वाई तालुक्यातील बावधन येथे पहाट होण्यापुर्वीच ग्रामदैवत सोमेश्‍वराच्या मंदिराजवळ ग्रामस्थ एकत्र आले. काशिनाथाच्या नावानं चांगभलं’ च्या जयघोषात मानाच्या बगाड्याला आणून अवघ्या काही सेकंदात त्यास लाटेवर (झोपाळ्यावर) चढविले. सूर्य उगवतोच तोच बगाडाच्या चहूबाजूंनी हजारो भाविकांच्या उपस्थिती होती. त्यानंतर पारंपारिक मिरवणुकीस प्रारंभ झाला. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने यात्रेवर प्रतिबंध घातल्याने बगाड मिरवणुक निघणार नाही, अशी शक्यता असतानाच गावकर्‍यांनी गनिमी काव्याने काढलेली मिरवणुक देश-विदेशात सोशल मिडीयाच्या माध्यमातील भाविकांपर्यत पोचली. हजारोंच्या संख्येत आलेल्या भाविकांपुढे बंदोबस्तासाठी आलेले पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांची संख्या खूपच अपूरी होती. 

वाई तालुक्यात बावधनमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व यात्रेच्या निमित्ताने गावामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला होता. येथील भैरवनाथाच्या यात्रेसाठी होळी पौर्णिमेच्या रात्री मंदिरामध्ये बगाड्या ठरविण्यात येतो. या वेळी संचार बंदीमुळे बगाड्याची निवड झाल्याची अधिकृत माहिती उपलब्ध मिळाली नव्हती.  यामुळे यात्रेबाबत साशंकता निर्माण झाली होती. परंतू आज पहाटेच बगाड्याला झोपाळ्यावर चढवून मिरवणुकीस प्रारंभ झाला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर गतवर्षी बगाड मिरवणुक काढल्याने यात्रा समितीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यंदा यात्रा समिती निश्‍चित करण्यात आलेली नसल्याने यात्रेचे नियोजन कोणाकडे आहे हे समजत नव्हते. होळीच्या रात्री कौल लावल्यानंतर निवड झालेल्या बगाड्यास गावाच्या बाहेरील देवळात लपवून ठेवल्याची परिसरात चर्चा सुरु आहे. 

बावधनच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णा तीरावरील सोनेश्‍वर येथे पहाटेच्या सुमारास बगाड मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यापूर्वी बगाड्यास नदीत स्नान घालून देवदेवतांची विधिवत पूजा-आरती करण्यात आली. त्यानंतर बगाड्यास पारंपरिक पोशाख घालून बगाडाच्या झोपाळ्यावर चढविण्यात आले. या वेळी भाविकांनी नोटांची व नारळाची तोरणे, झेंडे, गोंडे बगाडाच्या शिडाला बांधले.

बगाड रथाच्या मागे वाघजाईदेवी, भैरवनाथ आणि ज्योतिबाची पालखी सुशोभित करून ठेवण्यात आली होती. त्याचे भाविक दर्शन घेत होते. काही ठिकाणी बगाड थांबवून विश्रांती घेण्यात येत होती. या वेळी पाच फेर्‍या घालण्यात येत होत्या. दुपारी पोचणारे बगाड आज साडेनऊला गावात मंदिराजवळ पोचले. तेव्हा पारंपारिक वाद्यांचा गजर करण्यात आला. दरवर्षी बगाड पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा हजारोंच्या संख्येने भाविक गर्दी करतात. यावर्षी बगाडाबाबत साशंकता निर्माण झाल्याने परिसरातील वाडीवस्तीवरील ग्रामस्थ सहभागी झाले नव्हते. 

दरम्यान, गनिमी काव्याने बगाड निघाल्याचे व्हिडिओ सोशल मिडियाच्या माध्यमातून जगभर पोचले. बगाड मिरवणुकीला मोठी गर्दी झाल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठली. यंदा यात्रा समिती नसल्याने पोलिसांची नेमकी काय भुमिका राहणार याचे लक्ष लागून राहिले आहे. दुपारी एक वाजेपर्यंत बघ्याच्या भूमिकेत असलेले पोलीस त्यांनी केलेल्या व्हिडिओ चित्रणातून ग्रामस्थांची ओळख पटवून त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली.

COMMENTS