नाणेघाटातील ब्राम्ही लिपीतील सुमारे 2 हजार 220 वर्षांपूर्वीच्या शिलालेखातील महारठ्ठीनो हा उल्लेख विनपिटक, दीपवंश, महावंश या ग्रंथातील महाराष्ट्राचे उ
नाणेघाटातील ब्राम्ही लिपीतील सुमारे 2 हजार 220 वर्षांपूर्वीच्या शिलालेखातील महारठ्ठीनो हा उल्लेख विनपिटक, दीपवंश, महावंश या ग्रंथातील महाराष्ट्राचे उल्लेख, हाल सातवाहनाच्या गाथासप्तशतीतील श्रेष्ठ दर्जाचे मराठी काव्य, रामायण, महाभारतासारख्या प्राचीन काव्यात येणारे असंख्य मराठी शब्द, वररूचीचे प्राकृतप्रकाश, हेमचंद्राची देशीनाममाला, शांकुतल, मृच्छकटिकातील अनेक पात्रांच्या तोंडचे प्राचीन मराठीतील संवाद यावरून मराठी भाषेचे अनन्यसाधारण महत्व आणि तिची व्यापकता अधोरेखित होते. मात्र केंद्र सरकारच्या अनास्था आणि उदासीनतेमुळे मराठी भाषेची व्यापकता त्यांना निर्दशनास पडत नाही, ही मराठी भाषिकांची खंत आहे. मराठी भाषा ही अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी असलेले सर्व निकष पूर्ण करत असतांना देखील केंद्र सरकारच्या अनास्थेमुळे अजुनही या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. मराठी भाषा तशी प्राचीन भाषा. अनेक बोली भाषा, आणि भाषिकांची संस्कृती पोटात घेऊन सर्वत्र संचार करणारी मराठी भाषा हजारो वर्षांचा इतिहास असणारी प्राचीन भाषा म्हणून ओळखली जाते. याच प्राचीन आणि ऐतिहासिक असलेल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी राज्य सरकारने 8 वर्षांपूर्वी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला होता. मात्र हा प्रस्ताव आजतागायत धूळखात पडून असल्यामुळे केंद्र सरकारची मराठी भाषेविषयीची उदासिनता दिसून येते. मराठी भाषेतील ग्रंथधनाचे पुरावे बाराव्या-तेराव्या शतकापासून आढळतात. ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘विवेकसिंधू’ यांसारख्या ग्रंथांचा आधार दाखविला जातो. अभिजात दर्जा मराठीच्या सर्व चळवळींसाठी फार मोठा उत्प्रेरक इतिहास या भाषेला आहे. प्राचीन महारठ्ठी, मरहट्टी भाषा, महाराष्ट्री प्राकृत भाषा, अपभ्रंश मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा असा मराठी भाषेचा प्रवास आहे. महाराष्ट्री प्राकृत, महाराष्ट्री अपभ्रंश आणि मराठी या तीन वेगवेगळया भाषा नसून ती एकाच भाषेची तीन रुपे आहे. मराठी भाषेत उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ म्हणून ग्राथासप्तशती हा सुमारे 2 हजार वर्ष जुना ग्रंथ आजही उपलब्ध आहे. कोणतीही भाषा एका दिवसात प्रगल्भ होत नाही, त्यासाठी शेकडोव र्ष जावी लागतात, त्यानंतर त्या भाषेत होणारे संशोधन, लेखन यातून ती भाषा समृद्ध होत जाते. मराठी भाषेत अनेक जागतिक तोडीचे ग्रंथ आठशे वर्षांपूर्वी ज्या भाषेत लिहिले गेले, ती त्याच्या आधी बारा-पंधराशे वर्षे अत्यंत समृद्ध अशी भाषा होती. याचे शेकडो शिलालेख, ताम्रपट, पोथ्या आणि हस्तलिखित ग्रांथिक पुरावे आज उपलब्ध झालेले आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असून, लवकरच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणार असल्याचे सुतोवाच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी केले. मात्र राज्य सरकारने प्रस्ताव पाठवून तब्बल 8 वर्षांचा कालावधी लोटला तरी देखील केंद्राने अद्याप तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अजून किती वाट पाहावी लागणार आहे, याचा सर्वस्वी निर्णय केंद्रावर अवलंबून आहे. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने मराठी प्राकृत भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाल्याचं पाहायला मिळालंय. मराठीतील पहिला ग्रंथ समजल्या जाणार्या ’विवेकसिंधू’ ची निर्मिती शके 1110 मध्ये मुकुंदराज या कवीने केली. त्यानंतर शके 1212 मध्ये ’ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. नंतरच्या काळात महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात भक्तिपंथाच्या काव्याची मौलिक भर घातली. असा मोठा साहित्याचा वारसा असलेल्या मराठी भाषेला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नसल्याची खंत मराठी जनमाणसातून व्यक्त होत आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी चार निकष लावले जातात. 1भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावा. हे साहित्य महत्वाचे, मौल्यवान असावे. भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी. प्राचीन भाषेचे स्वरुप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे. वरील सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करत असतांना देखील केंद्र सरकार या भाषेविषयी अनास्था प्रकट करत, तिला अभिजात भाषेचा दर्जा देत नसल्याचे लपून राहिलेले नाही.
COMMENTS