फलटण / प्रतिनिधी : फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून खाजगी सावकाराच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा सपाटा सुरू
फलटण / प्रतिनिधी : फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून खाजगी सावकाराच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा सपाटा सुरूच असुन दाखल चौथ्या गुन्ह्यात सुरवडी येथील एका तरुणाने गावातील दोन सावकाराच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश रघुनाथ जगताप (वय 40 वर्ष, रा. सुरवडी, ता. फलटण) संशयित आरोपी धनाजी उर्फ धनंजय पांडुरंग साळवे (रा. सुरवडीख ता. फलटण) याच्याकडून जानेवारी 2011 मध्ये व्याजदराने बेकायदेशीररीत्या 70 हजार रुपये फिर्यादीच्या घरी घेतले होते. त्या बदल्यात त्यांनी 1 लाख 46 हजार रुपये परत दिले होते.
व्याजाचे पैसे वेळेवर येत नसल्याने साळवे याने फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी केली. तसेच जानेवारी 2012 मध्ये संशयित आरोपी संतोष बाबुराव साळुंखे (रा. सुरवडी, ता. फलटण) यांच्याकडून 1 लाख 25 हजार रुपये 12.5 टक्के व्याजाने यांनी घेतले होते. त्या मोबदल्यात जानेवारी 2013 ते सन 2015 पर्यंत व्याजापोटी 2 लाख 64 हजार पाचशे रुपये त्यामधील 1 लाख रुपये चेक फिर्यादी याने दिले होते. तसेच सदरचे व्याजाचे पैसे वेळेवर न दिल्याने फिर्यादीस आरोपीने शिवीगाळ दमदाटी केली होती.
संशयिताने फिर्यादीस तुझ्याकडे व्याजाचे पैसे राहिले आहेत. म्हणून सतत त्रास देऊन शिवीगाळ दमदाटी करत होते. सन 2016 मध्ये फिर्यादीस पैशाची गरज होती. गावांमध्ये कोणीही त्यांना पैसे देत नव्हते. त्यावेळी वर नमूद दोन्ही आरोपी यांनी फिर्यादीच्या गट नंबर 470 मधील 22 गुंठे जमीन साठेखत करून घेतली. त्यामध्ये त्यांनी 6 लाख 80 हजार रुपये दिल्याचे सांगितले. परंतू त्यांनी फिर्यादीस रोख 1 लाख 60 हजार रुपये दिले. तसेच उर्वरित 5 लाख 20 हजार रुपये पाठीमागील 2011 व 2012 मधील दिलेले पैशांपैकी 3 लाख 40 हजार रुपये व्याज व चालू दिलेले पैशाचे 1 लाख 80 हजार अगाऊ व्याज असे 5 लाख 20 हजार रुपये व्याजापोटी घेतले.
वास्तविक फिर्यादेने वर नमूद दोन्ही आरोपींकडून 3 लाख 55 हजार रुपये रोख असे व्याजाने घेतली होते. त्या बदल्यात फिर्यादीने त्यांना वेळोवेळी 9 लाख 30 हजार 500 रुपये व्याजापोटी दिले होते. असे असतानाही अजून व्याजापोटी 6 लाख 80 हजार रुपये मागत आहेत. तसेच गेल्या 15 दिवसापूर्वी आरोपी हे फिर्यादीच्या घरी येऊन आत्तापर्यंत व्याजाचे पैसे द्यायचे जमत नसेल तर तू आम्हाला साठेखत करून दिलेली जमीन आमच्या नावावर करून दे असे म्हणून दमदाटी करत होते. याप्रकरणी फिर्यादी अविनाश रघुनाथ जगताप याने धनाजी उर्फ धनंजय पांडुरंग साळवे व संतोष बाबुराव साळुंखे या दोघांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अरगडे करत आहेत.
COMMENTS