देशातील कोरोनाची दुसरी लाट आणखी विक्राळ होताना दिसते आहे.
नवीदिल्ली, वॉशिंग्टनः देशातील कोरोनाची दुसरी लाट आणखी विक्राळ होताना दिसते आहे. देशात 93 हजार 294 इतके कोरोनाबाधित शनिवारी आढळून आले, तर 60 हजारांहून अधिक नागरिक कोरोनामुक्त झाले. एका दिवसांत इतक्या मोठ्या संख्येत कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आल्याने करोनाचा धोका वाढत चालला आहे. भारतात आढळणार्या नव्या कोरोनाबाधितांची संख्या ही अमेरिकेपेक्षाही अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनाचे 96 हजार 787 रुग्ण आढळले होते. गेल्या 24 तासांत पाचशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. याआधी शुक्रवारी 713 जणांच्या मृत्यू झाला होता. जगभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. युरोप, अमेरिका, दक्षिण अमेरिकेतील देशांसह भारत, पाकिस्तानमध्ये ही कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा जोर पकडला आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, भारतात दररोज सरासरी 65 हजार 623 कोरोनाबाधित आढळत आहेत, तर अमेरिकेत हीच संख्या 65 हजार 391 इतकी असून ब्राझीलमध्ये ही संख्या 75 हजार 534 इतकी आहे. भारतात कोरोनाबाधितांची संख्या 1.23 कोटी इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने ही माहिती दिली. भारतात एक लाख 64 हजार 110 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. सलग 24 व्या दिवशी रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे नोंदवण्यात आले. सध्या सहा लाख 58 हजार जणांवर उपचार सुरू आहेत. अमेरिकेत पाच लाख 30 हजारांहून अधिकजणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. मागील पाच आठवड्यात संपूर्ण जगात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली. मागील आठवड्यात 38 लाख नवीन कोरोनाबाधित आढळले. त्याआधीच्या आठवड्याच्या तुलनेत ही संख्या 14 टक्के अधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, युरोपमध्ये लसीकरणाचा वेग अतिशय कमी आहे. युरोपमध्ये कोरोनाचे थैमान सुरू असून फ्रान्समध्ये टाळेबंदी जाहीर करण्यात आली, तर मृतांच्या दरात पाच टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. दरम्यान, देशातील कोरोनाची स्थिती बिघडत असल्याने पंतप्रधान मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठ बोलावली आहे. ही बैठक सुरू आहे. पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव आणि नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. पॉल यांच्यासह अनेक महत्त्वाचे अधिकारी या बैठकीत उपस्थित आहेत.
COMMENTS