राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील यांचे प्रतिपादन
राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील यांचे प्रतिपादन
इस्लामपूर / प्रतिनिधी : गेल्या पाच वर्षात अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा कारखाना यशस्वीपणे सुरू आहे. चांगला दर मिळाल्याने कारखान्याचे सभासद समाधानी आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत वाळवा तालुका सहकार पॅनेलच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असा विश्वास राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजयबापू पाटील यांनी व्यक्त केला. साखराळे (ता. वाळवा) येथे य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना सभासद संपर्क दौर्यानिमित्त आयोजित बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, सरपंच बाबुराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक लिंबाजीराव पाटील, संजय पाटील, सुजित मोरे, अमोल गुरव, मनोज पाटील, कृषी उद्योग संघाचे अध्यक्ष शशिकांत पाटील, भास्कर पाटील, सुबराव डांगे, विश्वासराव माने, मानसिंग पाटील, प्रकाश चव्हाण, हंबीरराव पाटील, अमोल कुंभार, अविनाश पाटील उपस्थित होते.
विजयबापू पाटील पुढे म्हणाले, की साखराळे गाव हे स्व. जयवंतराव भोसले यांच्यापासून भोसले कुटुंबियांना सावलीसारखे साथ देणारे गाव आहे. नेहमी चांगल्या विचारांशी प्रामाणिक राहणारे गाव म्हणून तालुक्यात साखराळेचे नाव आहे. विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी अडचणीतून मार्ग काढत कृष्णा कारखाना यशस्वीपणे चालवला आहे. त्यांच्या पाठीशी वाळवा तालुका ठामपणे उभा राहील.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, की कृष्णा कारखाना, राजारामबापू कारखाना ही सहकारातील मंदिरे आहेत. या दोन्ही संस्थेमुळे लोकांची प्रगती झाली. पाच वर्षांपूर्वी डॉ. सुरेशबाबांकडे सभासदांनी सत्ता दिली, पण कारखाना सुरू करणे अवघड होते. त्यावेळी कुठलीही बँक तोडणी वाहतुकीसाठी कर्ज द्यायला तयार नव्हती. अखेर अनंत अडचणीतून मार्ग काढत, डॉ. सुरेशबाबांनी गेल्या 5 वर्षात कारखान्याला उर्जितावस्था प्राप्त करून दिली. आज कारखान्याचा उच्चांकी उतारा व दर पाहता, कृष्णा कारखान्याने पुन्हा एकदा राज्यात नावलौकिक प्राप्त केला आहे.
प्रा. सुरज चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला सभासद शेतकरी उपस्थित होते.
COMMENTS