गोंदवले : समाधी मंदिर परिसरातून सुरु असलेल्या प्रदक्षणा. (छाया : विजय भागवत) गोंदवले / वार्ताहर : यंदाही ना सडा-रांगोळ्या, ना पताकाधारी भाविक, ना
गोंदवले / वार्ताहर : यंदाही ना सडा-रांगोळ्या, ना पताकाधारी भाविक, ना टाळ- मृदंगाची थाप. तरीही मोठ्या उत्साहात पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्री. ब्रम्हचैतन्य महाराजांच्या पादुका बत्ताशावर मंदिरात पालखीत विराजमान होत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी टाळण्यासाठी समाधी मंदिर समितीने यंदाही श्रींच्या प्रतिमा व पादुकांची ग्रामप्रदक्षणा रथाऐवजी वाहनातून काढण्यात येणार आहे.
श्री गोंदवलेकर महाराजांचा 108 वा पुण्यतिथी महोत्सव येथील समाधी मंदिरात सुरू आहे. कोरोना ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यंदाही यात्रेवर बंदी घातली असल्याने साध्या पध्दतीने हा महोत्सव साजरा होत आहे. श्री ब्रम्हानंद महाराजांनी घालून दिलेल्या रितीप्रमाणेच आजही हा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात येत असला तरी कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून महोत्सवावर मर्यादा पडल्या आहेत. वद्य प्रतिपदेला कोठी पूजनाने महोत्सवाला सुरूवात होते. वद्य दशमी पर्यत श्रीच्या प्रतिमा व पादुकांची रथ आणी पालखीतून रोज सकाळी ग्रामप्रदक्षणा काढण्यात येते. हा सोहळा खुप महत्वाचा मानला जातो. त्यामुळे भाविक देखील मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी होतात. टाळ मृदंगाच्या सोबतीने श्रीराम नामाच्या गजरात व अभंगात भाविक न्हाऊन निघतात. मात्र, यावेळी देखील हा सोहळा साध्या पध्दतीने होत असल्याने श्रीच्या पादुका व प्रतिमेची ग्रामप्रदक्षणा फुलांनी सजविलेल्या बत्ताशा वाहनातून काढण्यात येत आहे. त्यामुळे यंदाही भाविकांना या पालखी सोहळ्यापासून वंचित राहावे लागत आहे.
श्रीच्या पादुका व प्रतिमेची ग्रामप्रदक्षिणा झाल्यानंतर पालखीतून समाधी मंदिर प्रदक्षणा करण्यात येते. मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत सकाळी व रात्री हा सोहळा मंदिर परिसरात करण्यात येत आहे. महोत्सवाची सांगता बुधवार, दि. 29 रोजी पहाटे होणार आहे. भाविकांनी हा सोहळा घरातूनच साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
COMMENTS