मनपा जागा बळकावण्यासाठी सार्वजनिक शौचालय जमीनदोस्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनपा जागा बळकावण्यासाठी सार्वजनिक शौचालय जमीनदोस्त

झारेकर गल्लीत गुंडांचा कारनामा, पोलिसात गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरात कोण, कधी व काय करेल हे सांगता येत नाही. अमरधाम ते आयुर्वेद महाविद्यालय रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण एकीकडे प्रस्तावित

Sangamner :संगमनेर खुर्द मध्ये 9 लाख रुपयांचा 40 किलो गांजा जप्त
नगर मनमाड महामार्गावरील खड्डे बुजवून अवजड वाहतूक बंद करा
नगरच्या दोन गिर्यारोहकांचा सुळक्यावरून पडून मृत्यू

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरात कोण, कधी व काय करेल हे सांगता येत नाही. अमरधाम ते आयुर्वेद महाविद्यालय रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण एकीकडे प्रस्तावित असून, त्याचे काम सुरू होण्याच्या बेतात आहे. अशावेळी या रस्त्याच्या कडेला असलेले सार्वजनिक शौचालय शनिवारी रात्री गुंडांनी पाडून टाकले. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जागेचे भाव गगनाला भिडल्यामुळे शहरातील महापालिकेच्या मोकळ्या जागा बळकावण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यातच आता मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय जागांवरील बांधकाम पाडून भविष्यात त्या बळकावण्याचे मनसुबे काहींनी आखले आहेत. असाच एक प्रकार नगरच्या अमरधाम ते आयुर्वेद कॉलेज रस्त्यालगत असलेल्या झारेकरगल्लीत घडला आहे. काही गुंडांनी महापालिकेचे सार्वजनिक शौचालय एका रात्रीतून जमीनदोस्त केले. शौचालयाची ही जागा बळकावण्याच्या उद्देशाने ते पाडून टाकले गेले आहे. यात महापालिकेचे लाखोंचे नुकसान झाले आहे. नगर शहरामध्ये नालेगाव परिसरामध्ये असलेल्या झारेकर गल्ली येथे शनिवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. या ठिकाणी सकाळी कर्मचारी सफाई करण्यासाठी कामावर येत असतात, त्यामुळे रविवारी सकाळी हे स्वच्छता कामासाठी आल्यावर तेथील महापालिकेचे असलेले सार्वजनिक शौचालय पडल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती त्यांनी वरिष्ठांना दिल्यानंतर अधिका़र्‍यांची धावपळ सुरू झाली याप्रकरणी महापालिकेचे स्वच्छता विभागाचे सुपरवायझर ज्ञानेश्‍वर झारेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल आला आहे. पुढील तपास कोतवाली पोलिस करत आहेत. दरम्यन, हे शौचालय पाडणारांचा महापालिका शोध घेईल का आणि तसा शोध लागला तर संबंधितांविरुध्द कारवाई होईल का, हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. मात्र, शौचालय पाडणार्‍यांचा शोध लागेल का, हा खरा मुख्य प्रश्‍न आहे. रात्रीतून अचानक असे काय झाले की ही शौचालये पाडण्यात आली. याआधीही अशी अनेक शौचालये, भाजी मंडई, रस्त्याच्या कडेची छोटी स्वच्छतागृहे नगर शहरात रात्रीतून गायब झालेले आहेत. त्यांचा पत्ता अद्यापही लागलेला नाही. त्याजागी वेगळ्या इमारती उभ्या राहिल्या. मात्र, आता झारेकर गल्लीमधील शौचालयाबाबत महापालिका आणि स्थानिक नगरसेवक काय भूमिका घेतात. याकडे लक्ष लागले आहे.

रात्रीस खेळ चाले…
नगर शहरामध्ये रात्रीतून काय घडते हे सांगता येत नाही. शहरामध्ये रात्रीस खेळ चाले या प्रकारांमधून पाडापाडीच्या अनेक घटना घडल्या आहेत. असा प्रकार नगर शहरातील झारेकर गल्लीमध्ये पुन्हा घडला. या ठिकाणी महापालिकेच्या जागेत असणारी 24 पैकी 18 शौचालये रात्रीतून पाडण्यात आली. विशेष म्हणजे हे शौचालय का पाडली याबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही. मात्रं ही जागा अत्यंत मोक्याची असून याठिकाणी शौचालय अनेक वर्षांपासून बांधलेले होते आणि आसपास परिसरातील नागरिक या शौचालयाचा वापर करत होते.

पर्‍या दिमाखात उभ्या राहतील
झारेकर गल्लीतल रस्त्याच्या कडेला असलेले हे आता अर्धवट पाडलेले बांधकाम काही दिवसातच मनपा पूर्ण उतरवून घेईल, त्यानंतर ही जागाही मोकळी होईल. या शौचालयाचा वापर करणारे पर्याय शोधतील. नंतर परिसरातील नगरसेवकांच्या मागणीवर येथे नवे शौचालय बांधकाम करण्याचा प्रस्ताव तयार होईल, तो या टेबलावरून त्या टेबलावर फिरत दोन-चार महिन्यांनी स्थायी समितीत येईल व तोपर्यंत इकडे मोकळ्या पडलेल्या जागेवर प्लास्टिक पत्र्यांच्या टपर्‍या दिमाखात उभ्या राहतील. जेव्हा येथील जागेवर मनपाचा नवा शौचालयाचा बांधकामाचा निर्णय होईल, तेव्हा ते वापरणारे कोणीही नाहीत व नगरमध्ये रोजगार निर्मितीची गरज असल्याने प्लास्टिक टपर्‍या काढू नयेत, अशी मागणी होईल व नव्या शौचालय बांधकामाचा प्रस्ताव बासनात गुंडाळला जाईल.

COMMENTS