सिव्हीलच्या एक्सप्रेस फिडरचा वीजपुरवठा संशयात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिव्हीलच्या एक्सप्रेस फिडरचा वीजपुरवठा संशयात

शॉर्टसर्किट व अनियमित विद्युत दाबाबाबत केले होते अलर्ट, सार्वजनिक बांधकामचा दावा

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीच्या घटनेला आज (सोमवारी, 6 डिसेंबर) एक महिना होत असताना अजूनही

पोलीस इलेव्हन शिरूर ठरले कर्जतच्या पैलवान चषकाचे मानकरी
विद्यार्थ्यांनी वेळेच्या व्यवस्थापनाला महत्व द्यावे ः संदीप टुले
‘या’ उपजिल्हा रुग्णालयात 10 व्हेंटिलेटर 7 महिन्यांपासून धूळखात | ‘१२ च्या १२ बातम्या’ | Lok News24

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीच्या घटनेला आज (सोमवारी, 6 डिसेंबर) एक महिना होत असताना अजूनही शासनाचा चौकशी अहवाल जाहीर झालेला नाही. मात्र, सिव्हील रुग्णालयाला महावितरणद्वारे एक्सप्रेस फीडरद्वारे दिलेला अख़ंड वीज पुरवठा व याच फिडरमधून साईदीप या खासगी रुग्णालयास दिलेला वीजपुरवठा संशयाच्या भोवर्‍यात सापडण्याची चिन्हे आहेत. एक्सप्रेस फीडरवरुन देण्यात आलेले कनेक्शन व त्याच्या धोकादायक केबलमुळे होऊ शकणार्‍या परिणामांबाबत मागील ऑक्टोबर महिन्यातच जिल्हा रुग्णालयाला पूर्वकल्पना दिली गेली असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे हे प्रकरण आता पुन्हा चर्चेत येण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालयात मागील 6 नोव्हेंबरला भाऊबीजेच्या दिवशी अतिदक्षता विभागात आग लागून 14जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी शासनाने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे व तिने आपला अहवाल शासनास सादर केला आहे. शासनाने तो अद्याप जाहीर केलेला नाही तर दुसरीकडे सिव्हीलमधील जळीतकांड प्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करून एक महिला डॉक्टर व तीन परिचारिकांना निष्काळजीपणाबद्दल अटकही केली आहे. या प्रकरणी सहाजण निलंबितही करण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा रुग्णालयाच्या आगीच्या घटनेच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र आता समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयातील पीएससी प्लँटसह एक्सप्रेस फीडरवरुन देण्यात आलेले कनेक्शन व त्याच्या धोकादायक केबलमुळे होऊ शकणार्‍या परिणामांबाबत ऑक्टोबर महिन्यातच जिल्हा रुग्णालयाला पूर्वकल्पना दिली गेली असल्याचे या पत्रावरुन स्पष्ट होत आहे.
जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीच्या घटनेचे कारणही विभागीय आयुक्तांच्या चौकशी अहवालातून स्पष्ट झाल्याचे सांगितले जात आहे. पण, सरकारकडून याची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र, या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातील विद्युत व्यवस्थेतील दोष व एक्सप्रेस फीडरवरुन देण्यात आलेले कनेक्शन व त्यासाठी वापरण्यात आलेली केबल, धोकादायक अवस्थेतील केबल व यामुळे होऊ शकणार्‍या परिणामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत उपअभियंत्यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला पूर्व कल्पना दिली होती, असे सांगितले जात आहे. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनीही जिल्हा रुग्णालयातील एक्सप्रेस फीडरवरुन बेकायदेशीर कनेक्शन दिल्याचा आरोप करत पोलिसांकडे रितसर फिर्यादही दिली होती. त्याची दखल त्यावेळी घेतली गेली नाही. तसेच ‘पीडब्ल्युडी’ने दिलेल्या पत्रानंतरही उपाययोजना झालेल्या नसल्याचे यामुळे आता स्पष्ट झाले आहे.
जिल्हा रुग्णालय परिसरात पीएससी प्लँट उभारण्यात आलेला आहे. या प्लँटमधील स्टॅबिलायझर वारंवार नादुरुस्त होत असल्यामुळे सबस्टेशनमधील ‘ओ.ओ. फ्यूज’ वितळून पूर्ण विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. याबाबत संबंधित यंत्रणेकडून कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबत कळवावे, असे विद्युत अभियंत्यांनी सांगितले होते. तसेच 5 ऑक्टोबर 2021 रोजी झालेला बिघाड तीव्र स्वरुपाचा होता. आपण वापरलेले स्विचगिअर ट्रीप होतात. मात्र, बिघाडामुळे झालेल्या शॉर्टसर्किट आणि अनियमित विद्युत दाबामुळे वीज संचमांडणीतील रोहित्र आणि इतर सुरक्षा यंत्रणेला धक्का पोहचून कमजोर होतात. त्यामुळे वारंवार बिघाड होणार नाही, याकरीता कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची सूचनाही सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत अभियंत्यांनी सिव्हील प्रशासनास केली होती.
जिल्हा रुग्णालयाला एक्सप्रेस फिडरद्वारे विद्युत पुरवठा करण्यात आलेला असून, सबस्टेशनमधून एबी स्वीच व एचटी केबलद्वारे अन्यत्र विद्युत पुरवठा देण्यात आलेला आहे. त्या कनेक्शनची सबस्टेशनमध्ये केबल अस्ताव्यस्त स्थितीत असून, ते धोकादायक आहे. रुग्णालयाला एक्सप्रेस फीडरवरुन केबलद्वारे विद्युत पुरवठा घेण्यात आला आहे. त्याच केबलवरून पुढे एक्सप्रेस फिडरचा विद्युत पुरवठा अन्यत्र देण्यात आलेला आहे. पुढे जाणारा विद्युतभार वाढला, तर ओव्हरलोडमुळे आपली केबल खराब होऊ शकते अथवा नादुरुस्त होऊ शकते. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होऊ शकतो. सबस्टेशनचे काम करावयाचे असल्यास काही वेळेकरीता विद्युत पुरवठा खंडीत करत असताना जास्त विद्युतभारामुळे जास्त प्रमाणात स्पार्किंग होते व त्यामुळे व्होल्टेज फ्लक्चुएशन होऊन विद्युत उपकरणे खराब होत आहेत. त्यामुळे याबाबत महावितरणला पुढे जाणार्‍या विद्युत पुरवठ्याकरीता योग्य ती संचमांडणी करून सुरळीत विद्युत पुरवठा देण्याबाबत अवगत करावे, असे विद्युत अभियंत्यांनी या पत्रात स्पष्ट केले होते.

दखल कोण घेणार?
रुग्णालयातील प्लँटमधील होणारे विद्युत बिघाड, त्यामुळे होणारे शॉर्टसर्किट, अनियमित विद्युत दाबामुळे रोहित्रासह इतर सुरक्षा यंत्रणेला निर्माण होणारा धोका, एक्सप्रेस फीडरवरुन देण्यात आलेल्या कनेक्शनच्या अस्ताव्यस्त व धोकादायक केबल, त्यामुळे विद्युत दाब ओव्हरलोड होऊन केबल खराब होण्याची, विद्युत पुरवठा खंडीत होण्याची दिलेली सूचना, यामुळे होणारे स्पार्किंग, व्होल्टेज फ्लक्चुएशन होऊन विद्युत उपकरणांमध्ये होत असलेले बिघाड याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने आग लागण्याच्या एक महिनाआधीच जिल्हा रुग्णालय प्रशासनाला कल्पना दिली होती. त्याबाबत उपाययोजना करण्याची सूचनाही त्यांनी दिलेली होती. असे असतानाही त्याची दखल घेतली गेली नाही. चौकशी समितीने व पोलिस प्रशासनाने गुन्ह्याचा तपास करताना ही सर्व कागदपत्रे संकलित केलेली असल्याने एक्सप्रेस फीडरबाबत झालेल्या तक्रारीसंदर्भात चौकशी अहवालात व पोलिस तपासात काय दखल घेण्यात आली, हे अजून तरी गुलदस्त्यातच आहे.

COMMENTS