नगरच्या दोघांनी केली साडेनऊ कोटींची फसवणूक ;गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरच्या दोघांनी केली साडेनऊ कोटींची फसवणूक ;गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : चांगला परतावा देण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे आमीष दाखवून व फंड पे अ‍ॅप तयार करून राज्यातील सुमारे दीड हजाराहून अधिक गुंतवणूकदारांना

महिला पोलिस उपनिरीक्षकांनी हनुमान रथाला लावला मानाचा ध्वज
डाँ.तनपुरे कारखान्याला गळीत हंगामाची परवानगी नसताना गुपचुप उरकला गळीत शुभारंभ
मुलांनी आई-वडिलांचा त्याग आणि कष्ट विसरु नये : विखे

अहमदनगर/प्रतिनिधी : चांगला परतावा देण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे आमीष दाखवून व फंड पे अ‍ॅप तयार करून राज्यातील सुमारे दीड हजाराहून अधिक गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणार्‍या नगरच्या बिग मी इंडिया कंपनीच्या दोन संचालकांविरुद्ध साडे नऊ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली असून, गुंतवणूकदारांची 50 कोटींपर्यंत फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमनाथ एकनाथ राऊत व सोनिया एकनाथ राऊत (रा. पाईपलाईन रोड, नगर) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबतची माहिती अशी की, सोमनाथ राऊत यांनी 2016 मध्ये नगर शहरामध्ये विघ्नहर्ता पॅलेस या ठिकाणी कुकाणा अर्बन मल्टीस्टेट निधी लिमिटेड कंपनी सुरू केली होती. या ऑफिसमध्ये त्यांनी 2019 साली फंड पे चे कार्यालय सुरू केले होते. ते कार्यालय रजिस्टर करून त्यांनी पुणे येथील श्री गणेश अपार्टमेंट, शुक्रवार पेठ, पुणे या पत्त्यावर नोंदणीकृत केलेले होते. राऊत यांनी बिग मी इंडिया अंतर्गत फंड पे नावाचे डिजिटल वॉलेट सुरू केले होते. त्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या पतसंस्था, एजन्सी तसेच बँकिंग सर्व्हिस पॉईंटच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये पैसे भरणे व काढणे, त्याचप्रमाणे मोबाईल फोन, डिजिटल रिचार्ज, आधार पेमेंट अशा ऑनलाईन सेवा देण्याचा व्यवसाय सुरू केलेला होता. हा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून जाहिरातीसुद्धा दिलेल्या होत्या. त्या जाहिरातीच्या आधारावर त्यांनी राज्यभरातून अनेक गुंतवणूकदार गोळा केले होते. या गुंतवणूकदारांकडून त्यांनी स्वतःच्या कंपनीच्या खात्यांमध्ये डिपॉझिट म्हणून पैसे घेतले होते. हे पैसे घेताना त्यांनी साधारणत: अकरा महिन्याचा करार केला होता. राऊत यांनी ज्यांच्याकडून रकमा गुंतवणूक म्हणून घेतलेल्या होत्या, त्या गुंतवणूकदारांना 0.30 टक्के ते दीड टक्केपर्यंत दैनंदिन बेसवर परतावा देण्यात येईल, असे आमीष दाखवून त्यांनी अनेकांशी लेखी करार केलेले होते. तसेच अनेक गुंतवणूकदारांना त्यांनी त्यांच्याकडील धनादेश सुद्धा विश्‍वास संपादन करण्यासाठी दिलेले होते, असे पोलिसात दाखल फिर्यादीत म्हटले आहे.
कोल्हापूर येथील कागल तालुक्यात राहणारे लक्ष डिजिटल मीडिया सोलुशन या फर्मचे संचालक सतीश खोडवे यांनी या कंपनीमध्ये 2 कोटी 59 लाख रुपयांची गुंतवणूक केलेली होती. खोडवे यांनी रितसर हे पैसे राऊत यांच्या खात्यामध्ये जमा केले होते. तसे त्यांना परतावा सुद्धा मिळण्यास सुरुवात झालेली होती. त्यांनी ज्या वेळेला त्यांचा व्यवहार ठरलेला होता व जो करारामध्ये उल्लेख करण्यात आलेला होता, त्यानुसार ही रक्कम देण्यास सुरुवात केली होती. आत्तापर्यंत खोडवे यांना फक्त यातील 39 लाख रुपये प्राप्त झाले. उर्वरित रक्कम त्यांना मिळू शकलेली नव्हती. ज्या वेळेला रक्कम येण्यास का विलंब होत आहे, अशी विचारणा करण्यास सुरुवात केल्यावर त्यांना राऊत दाम्पत्य हे उडवाउडवीची उत्तर देत होते, हे लक्षात आले. हा प्रकार त्यांना वेगळा वाटल्यानंतर त्यांनी नगर येथे येऊन माहिती घेतली असता त्यांना ही कंपनी बंद असल्याचे लक्षात आले व राऊत दाम्पत्य हे या कंपनीचे संचालक असून ते या ठिकाणाहून फरार झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. फसवणूक झालेले खोडवे यांच्यासह बाराजणांनी दिलेल्या फिर्यादीवरून 9 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी वरील दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दरम्यान, राऊत यांनी नगर जिल्ह्यामध्ये 2016साली जे कार्यालय सुरू केले होते. ते कार्यालय आता 2021 मध्ये बंद झालेले आहे. त्यांनी अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती देऊन लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. साधारणत: 1750 गुंतवणूकदार त्यांच्या कंपनीशी संलग्न असल्याचे निदर्शनास आलेले आहे. शनिवारी नगरमध्ये बारा जणांनी येऊन फसवणुकीची फिर्याद दिली आहे व त्याची रक्कम नऊ कोटी रुपये आहे. साधारणत: इतरांचा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरामध्ये असल्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे.

COMMENTS