अहमदनगर/प्रतिनिधी : सिव्हील रुग्णालयातील जळीताची घटना घडण्याच्या आधी तीन आठवडे अगोदर आम्ही डॉ. पोखरणा यांच्या संदर्भामध्ये फिर्याद दिलेली आहे व त्यात
अहमदनगर/प्रतिनिधी : सिव्हील रुग्णालयातील जळीताची घटना घडण्याच्या आधी तीन आठवडे अगोदर आम्ही डॉ. पोखरणा यांच्या संदर्भामध्ये फिर्याद दिलेली आहे व त्यात आम्ही सर्व वस्तुस्थिती मांडलेली आहे, पण यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. जर त्याबाबत त्याचवेळी निर्णय घेतला असता, तर जिल्हा रुग्णालयात जळिताची घटना घडलेली नसती. त्यामुळे डॉ. पोखरणा यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीन प्रकरणात थर्ड पार्टी अर्ज करण्याचा आम्हाला अधिकार आहे, असा युक्तिवाद शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांचे वकील अॅड. अभिजीत पुप्पाल यांनी मंगळवारी न्यायालयात केला.
दरम्यान, डॉ. पोखरणांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनावर आता उद्या गुरुवारी (25 नोव्हेंबर) सुनावणी होणार आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आगीत आत्तापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालेला आहे. पोलिसांनी स्वतः फिर्याद देऊन गुन्हा दाखल झालेला आहे. चार महिलांना अटक करण्यात आली होती. त्यांना जामीन सुद्धा मिळाले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पोखरणा यांना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. त्यानंतर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी डॉ. पोखरणा यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाला आक्षेप घेत यासंदर्भामध्ये थर्ड पार्टी अर्ज न्यायालयात दाखल करून त्यास हरकत घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी येथील न्यायालयामध्ये ठेवण्यात आली होती. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यावर तपासी अधिकार्यांनी म्हणणे मांडण्यास मुदत मागितल्याने या प्रकरणी पुढील सुनावणी दिनांक 25 रोजी ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी दिले.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद
न्यायालयामध्ये सरकारी पक्षाच्यावतीने सरकारी वकील अॅड. ढगे यांनी बाजू मांडताना थर्ड पार्टी अर्ज गिरीश जाधव यांना दाखल करता येणार नाही, तो अर्ज तत्काळ फेटाळून लावावा, अशी मागणी लेखी स्वरूपामध्ये न्यायालयामध्ये केली. त्यांचा कोणताही संबंध नसताना त्यांना या अटकपूर्व जामीन अर्जाच्या संदर्भामध्ये आक्षेप अर्ज करण्याचे कोणतेही कारण नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. तर तपासी अधिका़र्यांच्यावतीने याबाबत म्हणणे मांडण्यास मुदत वाढवून मागण्यात आली. यानंतर जाधव यांचे वकील अॅड. पुप्पाल यांनी न्यायालयामध्ये युक्तिवाद केला की, आम्ही (जाधव) थर्ड पार्टी अर्ज दाखल केलेला आहे, घटना घडण्याच्या तीन आठवडे अगोदर आम्ही डॉ. पोखरणा यांच्यासंदर्भामध्ये फिर्याद दिलेली आहे. आम्ही सर्व वस्तुस्थिती त्यात मांडलेली आहे, पण यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. जर त्याचवेळी त्याबाबत निर्णय घेतला असता, तर जिल्हा रुग्णालयात जळीताची घटना घडलेली नसती. त्यामुळे थर्ड पार्टी अर्ज करण्याचा आम्हाला अधिकार आहे, असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला. डॉ. पोखरणा यांच्यावर विविध प्रकारचे आक्षेप आहेत, त्यामुळेच आम्ही या संदर्भामध्ये फिर्याद दाखल केली होती तसेच एखाद्या विषयासंदर्भामध्ये गांभीर्य लक्षात घेता जर एखाद्याला न्यायालयामध्ये त्याचे मत मांडायचे असेल किंवा त्याला आक्षेप घ्यायचा असेल तर तो थर्ड पार्टी म्हणून न्यायालयामध्ये हजर होऊ शकतो, याबाबतचे सुप्रीम कोर्टाचे दाखले सुद्धा यावेळी त्यांनी दिले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या अर्जावर पुढील सुनावणी दिनांक 25 रोजी ठेवण्याचे आदेश दिले.
उद्याच्या सुनावणीकडे लक्ष
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा यांना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला होता. त्यांनी कायमस्वरूपी जामीन मिळावा, असे म्हणणे सादर केले होते. त्याला जाधव यांनी आक्षेप घेतला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी 25 तारखेला होणार असल्यामुळे यामध्ये अजून काय-काय म्हणणे पुढे येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच सोमवारी जाधव यांनी डॉ. पोखरणा यांच्या कॉल रेकॉर्डसची व बँक खात्याची तसेच अन्य कागदपत्रांची पडताळणी करावी, अशी लेखी स्वरूपामध्ये मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे सुद्धा केली आहे. त्यामुळे त्याबाबतही पोलिसांकडून काय निर्णय होतात, याची उत्सुकता आहे.
अनोळखी मृताची ओळख पटेना
सिव्हिल हॉस्पिटल जळीत कांडातील अनोळखी मृताची ओळख अद्याप पटली नसून पोलिसांनी याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे. पोलिसांनी यात म्हटले आहे की, नगर रेल्वे स्टेशनवर दिनांक 5 नोव्हेंबर रोजी जखमी अवस्थेत आढळून आलेल्या अनोळखी व्यक्तीचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृताची अद्याप ओळख पटली नाही. पोलिस त्याची ओळख पटविण्याची व त्याच्या नातेवाईकाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. रेल्वेस्टेशनवर जखमी अवस्थेत पडलेल्या अवस्थेत मिळून आलेली ही अनोळखी व्यक्ती उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमधील कोविड आयसीयू वॉर्ड नंबर 1मध्ये उपचार घेत असताना झालेल्या आगीच्या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हयातील फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्हयाचा तपास पोलिस करीत आहेत. या प्रकरणातील अनोळखी मृताची माहिती-वय अंदाजे 58 वर्ष (पुरुष जातीचे), रंग सावळा, उंची 172 सें.मी., बांधा सडपातळ, चेहरा-उभट, नाक- सरळ, केस काळे पांढरे, दाढीमिशी मध्यम वाढलेली, नेसनीस कपडे निळे रंगाचा फुल बाह्यांचा रेषा असलेला शर्ट, चॉकलेटी रंगाचे बनियान, काळ्या रंगाची, पॅन्ट, चॉकलेटी रंगाची अंडरविअर घातलेली आहे. ओळख चिन्ह छातीवर तीळ असे वर्णन आहे. या अनोळखी मृताचे नाव व पत्ता याबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके (श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, चार्ज नगर शहर विभाग, अ.नगर ) तसेच तोफखाना पोलिस ठाणे 0241-2416118 या फोनवर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
COMMENTS