पोलिसांनी नोंदवला डॉ. पोखरणांचा जबाब

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिसांनी नोंदवला डॉ. पोखरणांचा जबाब

अहमदनगर/प्रतिनिधी ः जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी सकाळी निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचा तपासाच्या अनुषंगाने जब

कोपरगावमध्ये शहरात फटाके वाजविण्यावरून मारहाण
रिक्षात बसलेल्या प्रवाशी महिलेची पर्स पळवली
आ. बानकुळेच्या स्वागतासाठी काढली बाईक रॅली

अहमदनगर/प्रतिनिधी ः जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी सकाळी निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचा तपासाच्या अनुषंगाने जबाब नोंदविला. डॉ. पोखरणा यांना न्यायालयाने अंंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांचा जबाब नोंदवल्याची माहिती तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणासंदर्भामध्ये पोलिसांनी स्वतःहून फिर्यादी होऊन याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी आतापर्यंत बारा जणांचे जबाब घेतले आहे तर तीन जणांचे कलम 164 प्रमाणे जबाब नोंदवले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी स्वतंत्ररित्या सुरू केलेला आहे. या आग प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी डॉ. पोखरणा यांना सीआरपीसी 160 नुसार नोटीस पाठविली होती. त्यानुसार डॉ. पोखरणा हे मंगळवारी सकाळी दहा वाजता तोफखाना पोलिस ठाण्यात हजर झाले होते. त्यानंतर या घटनेच्या तपास कामी त्यांचा जबाब घेतल्याचे उपअधीक्षक मिटके यांनी सांगितले.

ज्या वेळेला ही घटना झाली, त्या वेळेला डॉक्टर पोखरणा यांना ही घटना कशी कळली, त्यानंतर ते घटनास्थळी केव्हा दाखल झाले, त्यांनी याबाबत अगोदरच्या उपाययोजना काय काय केल्या होत्या किंवा नव्हत्या तसेच जिल्हा रुग्णालयामध्ये आयसीयु कक्ष केव्हा व कधी सुरू केला होते, त्या ठिकाणी कशा पद्धतीने कामकाज चालत होते, त्याच्यावर देखरेख कोण करत होते तसेच या ठिकाणी जी काही अद्ययावत यंत्रणा आवश्यक होती, ती उभारण्यात आली होती किंवा नव्हती, तेथे असलेल्या रुग्णांवर किती दिवसांपासून उपचार सुरू होते, यासह या घटनेच्या अनुषंगाने विविध प्रकारचे प्रश्‍न पोलीस तपासामध्ये त्यांना विचारण्यात आले. त्या पद्धतीनुसार पोलिसांनी त्यांचा चौकशीमध्ये जबाब सुद्धा घेतलेला आहे. सुमारे चार तासांहून अधिक काळ ही चौकशी सुरू होती. या प्रकरणात पोलिस स्वत: फिर्यादी आहेत. डॉ. पोखरणा यांना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. डॉ. पोखरणा यांच्या अर्जावर पुढील सुनावणी आज बुधवारी 17 नोव्हेंबरला होणार असून या अर्जावर पोलिसांना म्हणणे सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

दि. 6 नोव्हेंबर रोजी जिल्हा रूग्णालयातील करोना अतिदक्षता विभागाला आग लागली होती. या घटनेत 11 करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चारजणांना अटक केलेली आहे. जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात डॉ. पोखरणा यांच्यासह वैद्यकिय अधिकारी, स्टाफ नर्स यांना निलंबित करण्यात आले आहे. तर, दोन स्टाफ नर्स यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. राज्य शासनाने या घटनेच्या चौकशीसाठी नाशिक विभागीय आयुक्तांची चौकशी समिती गठीत केलेली आहे. या समितीमार्फतही चौकशी सुरू आहे. पोलिसांकडूनही स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येत आहे.

COMMENTS