विटा / प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी उपक्रम असणार्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सन 2019 व 2020 अशी दोन वर्षे देशात प्रथम क्रमांक
विटा / प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी उपक्रम असणार्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सन 2019 व 2020 अशी दोन वर्षे देशात प्रथम क्रमांक मिळवणार्या कराड नगरपालिकेची 2021 मध्ये घसरण झाली आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहराने देशात पहिला क्रमांक मिळवला असून सातारा जिल्ह्यातील कराड शहराने पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे. गौरवप्राप्त पालिकांच्या यादीत पाचगणीचाही समावेश आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात सलग दोन वर्षे एक लाख लोकसंख्येच्या आतील नगरपालिकामध्ये कराड पालिकेने प्रथम क्रमांक मिळवला होता. सन 2021 मध्ये पहिल्या क्रमांकाची हॅटट्रीक करण्यासाठी कराड पालिकेने कंबर कसली होती. मात्र, कराड पालिकेची यंदाची हॅट्रीक हुकली. दिल्ली येथे 20 नोव्हेंबर रोजी स्वच्छ सर्वेक्षणचा 2021 चा निकाल जाहीर होणार आहे. यानिमित्त दिल्लीमध्ये स्वच्छ अमृत महोत्सव होत आहे. या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारच्या शहरी व गृहनिर्माण मंत्रालयाने राज्यातील विजेत्या पालिका, महापालिकांना निमंत्रण दिले आहे. त्यात कराड पालिकेचा समावेश आहे. या यादीत कराड शहर चौथ्या क्रमांकावर आहे. सांगली जिल्ह्यातील विटा, पुणे जिह्यातील लोणावळा, सासवड आदी पालिकांची नावे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. या तिन्ही पालिकांचा सन्मान महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. यादीत तर कराडचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. कराडची यंदाची हॅट्रीक हुकली तरी पहिल्या पाचमध्ये मात्र समावेश आहे. पहिल्या दहामध्ये पाचगणी नगरपालिकेचा समावेश आहे.
केंद्रीय शहरी कार्य मंत्रालयाच्या सचिव व स्वच्छ सर्वेक्षणाच्या संचालक रूपा मिश्रा यांनी लेखी पत्रे पालिकांना पाठवली आहेत. त्या पत्रांत विजेत्या पालिकांचा सन्मान करण्यात येणार असल्याचा थेट उल्लेख आहे. स्वच्छ सर्वेक्षणमधील कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यासह राज्यातील एकूण 21 शहरांचा गौरव होणार आहे.
COMMENTS