श्रीगोंदा,दि.९(प्रतिनिधी) - कारखान्याच्या कारभाराला कंटाळून मी दोन वर्षांपूर्वी संचालकपदाचा राजीनामा दिला होता. परंतु, तो राजीनामा नामंजूर करत म
श्रीगोंदा,दि.९(प्रतिनिधी) –
कारखान्याच्या कारभाराला कंटाळून मी दोन वर्षांपूर्वी संचालकपदाचा राजीनामा दिला होता. परंतु, तो राजीनामा नामंजूर करत मला निवडणूक लढवता येऊ नये म्हणून माझ्याविरोधात याचिका दाखल केली गेली. या याचिकेमुळे माझे संचालकपद रद्द झाले आहे. या विरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याची माहिती नागवडे कारखान्याचे संचालक अण्णासाहेब शेलार यांनी दिली.
तालुक्यातील मढेवडगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य जिजाबापू शिंदे, वैभव पाचपुते, भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, ऍड बाळासाहेब काकडे, प्रशांत दरेकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना शेलार म्हणाले, ‘नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी कारभारात अनेक ‘उद्योग’ केले आहेत. ते येत्या पाच वर्षांत कारखाना खासगी करून टाकतील. गेली २५ वर्षे कारखान्याकडे शिल्लक असलेले कित्येक टन साहित्य नागवडेंनी दोन वर्षांत भंगारमध्ये विकून टाकले. यामध्ये नागवडेंनी प्रतिकिलो ४ रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप शेलार यांनी केला.
कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशवराव मगर म्हणाले, नागवडे कारखान्याने अनेकदा इथेनॉल प्रकल्पाची चर्चा केली आहे. परंतु, त्याबाबत कोणतेही ठोस पावलं उचललेली नाहीत. कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांना कारभाराचे पूर्ण ज्ञान नसल्याने सहवीजनिर्मिती प्रकल्प व असवणी प्रकल्प तोट्यात आहेत. सहकारी कारखान्याच्या जोरावर नागवडेंनी खासगी कारखाने घेतले आहेत. सहकारातून खासगी कारखानदारीकडे वळालेले लोक सहकारी कारखाने टिकून देत नाहीत. नागवडेंनी स्वतःचे खासगी कारखाने चालवावेत, सहकारी कारखानदारी मोडीत काढून सामान्यांचे संसार उध्वस्त करू नयेत, अशी खरमरीत टीका केशवराव मगर यांनी केली.
COMMENTS