सोशल, सोसेल का?

Homeसंपादकीयअग्रलेख

सोशल, सोसेल का?

सध्याचे युग हे डिजीटल क्रांतीचे युग म्हणून मानले जात असले तरी, या डिजीटल क्रांतीमुळे माणूस जवळ येण्याऐवजी दुरावतांना दिसून येत आहे. त्यामुळे सोशल माध

झोपाळू सरकारचा ’ओव्हरटाईम’
प्रदूषणाची वाढती पातळी
ट्रक चालक आणि कायदा

सध्याचे युग हे डिजीटल क्रांतीचे युग म्हणून मानले जात असले तरी, या डिजीटल क्रांतीमुळे माणूस जवळ येण्याऐवजी दुरावतांना दिसून येत आहे. त्यामुळे सोशल माध्यमांचा वापर तुम्ही कसा करता, यावर बरेच काही अवलंबून आहे. डिजीटल क्रांतीमुळे जग एक खेडे झाले आहे. सर्वजण एकमेकांच्या जवळ आले आहेत. संपर्क साधण्याचे, व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून आपण पाहिजे, तिथे, पोहचू शकतो, आणि डोकावू शकतो. मात्र याच सोशल क्रांतीमुळे माणूसकीचा संवाद कमी झाला आहे. तुम्ही नातेवाईक सण-उत्सवांच्या वेळी किंवा मित्र मंडळी, चहा जेवणांसाठी एकत्र आले तरी आपल्या हातात मोबाईल सारखा असतो. आणि त्यातून आपण बाहेरचे जग जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, मात्र जवळ बसलेले चार माणसे जाणून घेत नाही. त्यांच्यासोबत मोजकाच संवाद साधतो. थोडक्यात आपले विश्‍व हे, स्वतःभोवती गुरफुटतांना दिसून येत आहे. त्यामुळे कुठेतरी या बाबींना आपल्याला लगाम घालावा लागणार आहे.
सोशल मीडियाचा वापर जसा प्रसिध्दीसाठी होत आहे, तसाच तो समाजाची माथी भडकवण्यासाठी देखील होत असल्यांचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियाच्या वापरा संदर्भात विविध माध्यमांतून चर्चेला उधाण आले आहे. या सर्व चर्चा या माध्यमांचा वापर नेमका कसा करावा यावर सर्व पातळीवर होत असलेली ही चर्चा एकूणच तरुण वर्गावर घसरतांना दिसते. मात्र तरुण वर्ग हा एकंदरीत तणावाची परिस्थिती निर्माण होईल अशा पध्दतीने हा मीडिया वापरत नाही. ज्यांना समाज व्यवस्थेत ताण-तणाव निर्माण करावयाचा असतो त्यांची उद्दिष्टे ही वेगळी असतात. साधारणत: अशा उद्दिष्टांमध्ये राजकीय सत्ता संपादन करणे किंवा टिकविणे. त्याचप्रमाणे परंपरागत सामाजिक आणि धार्मिक व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी द्वेषमुलक विचार प्रसारीत करणे हा उद्देश असतो. अशी उद्देश असणारी माणसे ही क्वचितच तरुण वर्गातील असतात. त्यामुळे तरुण वर्गावर या सर्वच बाबींचा आरोप थेट टाकणे हे तसे पहात बेजबाबदार पणाचे लक्षण आहे. त्यामुळे एकूणच या सर्व प्रकारावर आता गंभीरपणे चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र बर्‍याचवेळा समाजव्यवस्थेत घडणार्‍या घटनांकडे जो कानाडोळा केला जातो त्यातूनच अशा स्थिती अधिक तीव्रपणे उद्भवतात याची जाण सर्वसामान्यपणे कमीच दिसते. त्यामुळे सोशल मिडियाचा वापर करतांना काहींचे म्हणणे त्यावर बंदी आणावी तर काहींना वाटत त्यावर सतर्क असा पोलिसांचा सेल निर्माण करावा. तर काहींच्या दृष्टीने बेजबादारपणे वापरणार्‍या व्यक्तींवर कार्यवाही व्हावी असा सुर दिसतो. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाने दिलेले हे वरदान अशा बेजबाबदारपणे बंदीला बळी पडू नये. कारण कोणत्याही गोष्टीला दोन परिणाम नक्की असतात. एका अर्थाने एक प्रश्‍न संपूर्ण जगात सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेला आले तर कदाचित जगाला नवी दिशा मिळू शकेल. मात्र विधायकपणे अशा प्रकारच्या बाबी करण्यास एकूणच जागतिक प्रशासन कंजूषपणा दाखविते. अर्थात त्यामागे त्यांचे राजकीय डावपेच आणि आडाखे हेच प्रमुख असतात. भारतात सामाजिक व्यवस्था ही असमान असल्यामुळे ती तशिच रहावी यासाठी कार्यरत असणारे आणि ती व्यवस्थाच बदलू पहाणारे यांच्यामधील संवेदनशिलता हा अत्यंत नाजूक विषय आहे. या नाजूक विषयला हातळतांना सोशल मिडियावर गांभिर्य टिकविण्याची गरज आहे. हा विषय अभिनिवेशाने चर्चेचा नसून सगळ्यांनी सामंजस्यपणे समजून सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याशिवाय ताण-तणावमुक्त समाजाचे स्वप्न पहाणे अवघड ठरेल. सोशल मीडिया हे आजच्या तरूणाईचे व्यक्त होण्याचे साधन आहे.

COMMENTS