सांगली : माहे जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर महापूर आलेला होता. या महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आर्थिक सल्लागार रवनिष कुमार यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय अंतर मंत्रालय पथकासमोर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सादर केला. जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या या आढावा बैठकीमध्ये केंद्रीय पथकातीलनागपूर येथील जलशक्तीचे अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे, नवी दिल्ली येथील ऊर्जा विभागाच्या उपसंचालक श्रीमती पूजा जैन, मुंबई येथील रस्ते परिवहन विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर, उपायुक्त प्रताप जाधव तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली जिल्ह्यात महापुराने झालेल्या नुकसानीची माहिती पथकासमोर सादर केली. यामध्ये त्यांनी सांगली जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 514.5 मिलिमीटर इतके असून यावर्षी 18 जुलै ते 25 जुलै या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. कोयना धरणात या कालावधीत 33 टी.एम.सी. तर वारणा धरणात 13.29 टी.एम.सी. पाणीसाठा झाला. एक तृतियांश पाण्याचा विसर्ग धरणांमधून तर दोन तृतियांश पाण्याचा विसर्ग फ्री कॅचमेंट एरियातून होत होता. धरणांमधून होणार विसर्ग नियंत्रित करण्यात येत असला तरी फ्री कॅचमेंट एरियात पडणाऱ्या पावसामुळे नदीपात्रात येणाऱ्या पाण्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण करता येत नव्हते. माहे जुलै मध्ये आलेल्या महापूरात २५ जुलै रोजी आयर्विन पुलाजवळ 54 फूट 5 इंच इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी पातळीची नोंद झाली आहे. महापूर कालावधीमध्ये अलमट्टी धरणातून होणाऱ्या विसर्गाबाबत अत्यंत चांगला समन्वय राहिल्याने पाणी लवकर ओसरण्यास मदत झाली. जिल्ह्यातील महापूर स्थितीबद्दल माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यात वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव हे चार तालुके पूर प्रवण असून सन 2019 मध्येही जिल्ह्याला महापूराचा फटका बसला असून त्यावेळी 10 दिवसात विक्रमी पाऊस पडला. सन 2021 मध्ये तर अवघ्या तीन ते चार दिवसात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने महापूराची स्थिती निर्माण झाली. 22 जुलै रोजी सांगली जिल्ह्यातील 18 सर्कलमध्ये, 23 जुलै रोजी 10 सर्कलमध्ये तर 24 जुलै रोजी 24 सर्कलमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. जुलै 2021 मध्ये आलेल्या महापूरामुळे मिरज, वाळवा, शिराळा, पलूस या चार तालुक्यातील आणि सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील अशा 104 गावांमधील 86 हजार 95 कुटुंबे तर 32 हजार 606 लहान, मोठी जनावरे मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्याचे सांगून पूराच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीबद्दल माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी महापूरामुळे जिल्ह्यात 181 गावांमधील 515 घरांची पूर्णत: पडझड झाली असून त्यांच्यासाठी एनडीआरएफच्या निकषानुसार 4 कोटी 79 लाख 81 हजार रूपये, 19 झोपड्यांसाठी 1 लाख 14 हजार, अंशत: पडझड झालेली 1320 घरे असून त्यांच्यासाठी 79 लाख 20 हजार, 2694 कच्च्या घरांची पूर्णत: पडझड झाली असून त्यांच्यासाठी 1 कोटी 61 लाख 64 हजार, 82 गोठ्यांच्या नुकसानीसाठी 35 लाख 35 हजार असे एकूण 7 कोटी 67 लाख 14 हजार रूपये पुनर्बांधणी – दुरूस्तीसाठी एनडीआरएफ च्या निकषानुसार आवश्यक असल्याचे सांगितले. जिल्ह्यात कृषि क्षेत्राच्या नुकसानीबद्दल माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जिल्ह्यातील 247 गावांमधील 1 लाख 1 हजार 209 शेतकरी बाधित झाले असून तांदूळ, सोयाबीन, भुईमुग, खरीप ज्वारी, डाळी, ऊस, फळपिके आदिंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये 39 हजार 695 हेक्टर क्षेत्राला महापूराचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. तर 153 गावांमधील जमिनीचे मोठ्या प्रमाणावर माती खरडून जाणे / भूस्खलन यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यासाठी 2 कोटी 37 लाख 57 हजार रूपये निकषानुसार आवश्यकता आहे. कृषि क्षेत्राच्या नुकसानीपोटी एनडीआरएफच्या निकषानुसार सुमारे 60 कोटी रूपये आवश्यक आहेत. असे असले तरी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे एनडीआरएफच्या निकषांमध्ये बदल करण्याची आवश्यकता जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी व्यक्त केली. महापूरामुळे जिल्हा परिषदेच्या रस्ते, इमारती यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये आरोग्य विभाग, गा्रमपंचायत,प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते, प्राथमिक शाळा, लघु सिंचन योजना, अंगणवाडी, पशुसंवर्धन या विभागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हे नुकसान साधारणत: 35 कोटी 78 लाख आहे. जिल्ह्यातील 91 पाणीपुरवठा योजना महापूरामुळे बाधित झाल्या असून त्यांच्या दुरूस्तीसाठी अथवा पुनर्बांधणीसाठी 2 कोटी 13 लाख रूपयांची आवश्यकता आहे. महावितरणकडील ट्रान्सफॉर्मर, विद्युत वाहिन्या, सबस्टेशन, मीटर्स, भूमीगत केबल, सर्व्हिस वायर, फिडर पिलर यांचेही सुमारे 34 कोटी 68 लाख 87 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात महापूरामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेकडील सुमारे 11 हजार 730 कि.मी. रस्त्यांचे नुकसान झाले आहे. महापूर काळात मोठे 17 व लहान 61 पूल पाण्याखाली होते. महापुरामुळे उखडलेले रस्ते, नादुरूस्त झालेले रस्ते, पूल, मोऱ्या, संरक्षक भिंत यांच्या दुरूस्तीसाठी 110 कोटी 36 लाख रपयांची आवश्यकता असल्याचे सांगितले. महानगरपालिकेकडील 25 रस्ते व 20 इमारतींचे 30 कोटी 67 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. पुढील काळात महापूर आल्यास महावितरणकडील आवश्यक उपाययोजनांसाठी 28 कोटी 70 लाख रूपयांची आवश्यकता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील उपाययोजनांसाठी 466 कोटी 75 लाख रूपयांची गरज व्यक्त केली. हॅण्डलुम / हस्तकलांची 11 हजार 1289 दुकानांचे नुकसान असून 77 मोठ्या, 39 लहान, अन्य 5आणि 53 हजार 945 पक्षी वर्गीय प्राण्यांचा महापुरामध्ये मृत्यू झाला असल्याचे सांगितले. 43 हजार 474 पूरबाधित कुटुंबाना शासनाच्या निकषानुसार 10 किलो गहू , 10 किलो तांदूळ आणि 5 किलो तूरडाळ यांचे वितरण करण्यात आले आहे.
COMMENTS