ना.छगन भुजबळांनी मंथन करावे!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

ना.छगन भुजबळांनी मंथन करावे!

घडामोड नाशिक जिल्ह्याच्या संदर्भात असली तरी महाराष्ट्राच्या राजकारणावर विशेषतः महाविकास आघाडीच्या गुत्तल समिकरणावर दुरगामी परिणाम करणारी आहे.महाराष्ट

मुंगुसाने झाडावर चढलेल्या सापाची केली शिकार
सातार्‍यात ‘शिवराज्य दरबार स्फूर्तीस्थान’ उभारणार : श्री. छ. वृषालीराजे भोसले
दिशा सालियानप्रकरणी राणे पिता-पुत्रांना समन्स


घडामोड नाशिक जिल्ह्याच्या संदर्भात असली तरी महाराष्ट्राच्या राजकारणावर विशेषतः महाविकास आघाडीच्या गुत्तल समिकरणावर दुरगामी परिणाम करणारी आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात वजनदार नेते म्हणूनच ज्यांचा  आर्मस्ट्राँग असा उल्लेख कधी सन्मानाने तर कधी उपहासाने होतो त्या  नावाप्रमाणेच भुज-बळ यांच्याशी संबंधीत असलेली ही घडामोड दखलपात्र ठरली नाही तरच नवल.वेगवेगळ्या शुक्लकाष्ठमधून सहीसलामत बाहेर पडत असलेल्या या दमदार नेत्याला स्वजिल्हातून मित्रपक्षाच्या आमदारानेच आव्हान दिल्याने हे राजकीय षडयंत्र आहे की जनमानसातील उद्विग्न प्रतिक्रीया यावर चर्चा तर होणारच!


पु.ल.देशपांडे नेहमी म्हणायचे,जमिनीला पाठ टेकताच ज्याला गाढ झोप लागते तो या जगातला सर्वांत सुखी माणूस. झोपताना त्याच्या मनावर कालच्या अपयशाचं मळभ किंवा उद्याच्या अपेक्षांचं ओझं नसतं. झोप हा त्याचा वर्तमान असतो आणि त्याचा तो पुरेपूर आनंद मिळवित असतो. असा शांतपणे झोपणारा माणूस सकाळी लवकर उठतो, आयुष्यातील नव्या दिवसाच्या आगमनानं आनंदी होतो आणि त्या बक्षिसाबद्दल जीवनाप्रती कृतज्ञता व्यक्त करत नव्या उमेदीनं कामाला लागतो. असा माणूस शेअर्सच्या चढ-उतारांमुळं भयभीत होत नाही, सोन्याच्या भावातील चढ-उतारांमुळं विचलित होत नाही. घरांच्या वाढत्या किंमतीमुळं अस्वस्थ होत नाही.भुतकाळातील पाप अत्यवस्थ करीत नाही. पोलीस दरवाजा वाजवतील किंवा इडी सीबीआयची धाड पडेल याची चिंता त्याला अजिबात नसते. आजच्या व्यवहारी जगात असा माणूस सापडणे तसे दुर्मिळच. राजकारणात तर शोधूनही सापडणार नाही. राजकीय मंडळींची कुट कारस्थानेच एव्हढी असतात की शांत झोप लागणे तसे अवघडच.नाशिक जिल्ह्यात सध्या चर्चेत असलेल्या दोन लोकप्रतिनिधींच्या कथित भांडणाने महाविकास आघाडीच्या विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडाली आहे,हे मात्र नक्की.


महाराष्ट्राचे  अन्न पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर नांदगाव मतदार संघातील शिवसेनेचे विधानसभा सदस्य सुहास कांदे यांनी गंभीर आरोप केल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीत राजकीय दरी निर्माण होऊ शकते असा एक कयास व्यक्त केला जात आहे. अर्थात हा कयास पाण्याचा बुडबुडा ठरण्याचीच शक्यता अधिक आहे.आरोप करणारे शिवसेनेचे आमदार जेंव्हा रांगत होते तेंव्हा ज्यांच्यावर आरोप केले ते छगन भुजबळ शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून महाराष्ट्रभर पायपीट करून शिवसेनेची एकएक शाखा सांधत होते. अशा या वाघावर आरोप करण्याचे धाडस आ.सुहास कांदे यांनी करावे,हे समजदार मनाला पटत नाही. याचाच अर्थ छगन भुजबळ यांच्या विरोधात पुन्हा एकदा राजकीय षडयंत्र सुरू झाले आहे,नांदगावच्या आमदारांचा  बोलावता धनी कुणीतरी वेगळाच असावा या शंकेलाही बळ मिळते.         

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, नव्यानेच स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशी भरभक्कम बिरुदावली मिळविणाऱ्या पालक मंत्री ना.छगन भुजबळ यांनी जिल्ह्याचे “अनभिषिक्त सम्राट” म्हणूनच कारभार हाताळला, स्वपक्षातच नव्हे तर अन्य पक्षात ही भुजबळ यांचा दबदबा होता, त्यांच्या विरोधात ‘ब्र’ शब्द काढण्याची हिंमत नव्हती, त्याच ना. भुजबळ यांच्या विरोधात पहिल्यांदाच तेही भुजबळ पुत्र पंकज भुजबळ यांचा पराभव करून आमदार झालेल्या सुहास कांदे यांनी आरोपांची राळ उठविली आहे, एवढेच नाही तर थेट न्यायालयात धाव ही घेतली, आ. कांदे हिम्मतवान असले तरी थेट ना. भुजबळ यांच्या विरोधात दंड धोपटणे सोपे नाही.ही बाब त्यांनाही चांगली ज्ञात आहे. राजकारणात सक्रीय होण्याआधी आणि राजकारणात सक्रीय झाल्यानंतरही भुजबळांच्या दबदब्याचा अनुभव स्वतः आमदार महोदयांनी व्यक्तीगत पातळीवर घेतला आहे. म्हणूनच मागील पाच वर्षात अनेक संकटे झेलून आता कुठे मोकळा श्वास घेणाऱ्या ना. भुजबळ यांच्या विरोधात उघड भूमिका घेण्याची हिंमत आ. कांदे हे एकट्याच्या हिमतीवर घेतील अशी सुतराम शक्यता नाही.भुजबळ यांचे जिल्हा आणि राज्य पातळीवरील राजकीय विरोधकांनी सुहास कांदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.सुहास कांदे म्हणतात,भुजबळांचे पालकमंत्री पद काढून घ्यावे. कारण काय तर पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीचा निधी विकला. मर्जीतील ठेकेदारांना कामे देऊन टक्केवारी उकळली. आरोप तसा गंभीर आहे. चौकशी व्हावी इतका गंभीर. पण मग भुजबळांचीच का चौकशी करायची? अन्य मतदार संघात काय सुरू आहे,एव्हढेच कशाला ज्यांनी आरोप केले त्यांच्या मतदार संघात वेगळे काय चालले आहे? मर्जीतील ठेकेदार सोडून अन्य कुठल्याही पात्र ठेकेदाराला या मतदार संघात काम करण्याची हिम्मत होते का? या मंडळींचीही चौकशी व्हायलाच हवी ना? ते चोर आणि हे साव! असा भेद नाही करता येणार ना व्यवस्थेला. थोडक्यात आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून ढुंकून.हाही तर जनद्रोहच आहे ना.या आरोपांना जनहिताचा कितीही मुलामा चोपडण्याचा प्रयत्न केला जात असला तरी स्वार्थ ओतप्रोत भरलेला आहे हे लपविता येणार नाही.  मुळातच एखादया मंत्र्याने,आमदाराने, खासदाराने,महापौर, सरपंचाने आपल्या पक्षाच्या ठेकेदार कार्यकर्त्यांना आपल्या पदाचा उपयोग करून आणि पक्षाचा कार्यकर्ता नसला तरी एखादया मर्जीतल्या ठेकेदाराला काही कामे देणे हा आजच्या नितीशून्य राजकारणातील अविभाज्य पायंडा बनला आहे. राज्यात ,केंद्रात हेच सुरू आहे. म्हणूनच आमदार साहेबांनी नामदार साहेबांवर केलेल्या आरोपांची सरकार पातळीवर किती दखल घेतली जाईल यावर जाणकार साशंक आहेत. चादर अर्धी फाटलेली आहे,डोके झाकण्याचा प्रयत्न केला तर पाय उघडे पडणार आणि पायावर ओढली तर डोके. म्हणूनच शिवसेनेचे नेते खा. अनिल देसाई,मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत कान उघाडणी झाली,संजय राऊतांनीही मुलगा समजून माफ करण्याचा कानमंत्र भुजाबळांना दिला त्यानंतर तरी हा धुराळा खाली बसेल अशी अपेक्षा आमदारांनी धुळीस मिळवली.याचाच अर्थ आ.सुहास कांदे  सन २०२४ मधील आपली दावेदारी पक्की करण्यासाठी पंगा घेत असावेत,त्यांना आपल्या मतदारसंघातील खुंटा बळकट करायचा असावा,किंवा छगन भुजबळ मजबूत आहेत तोपर्यंत जिल्ह्याच्या राजकारणात आपली डाळ शिजणार नाही अशी खात्री ज्यांना आहे त्या अदृश्य शक्ती कांदे यांना बळ देत असाव्यात. राजकीय कारकीर्द पणाला लागलेल्या प्रकरणातून निर्दोष मुक्त झाले, त्यांच्या डोक्यावरील बोजा कमी झाला, आणि पुन्हा एकदा ना. भुजबळ पूर्वीच्या जोशाने राजकीय झेप घेतील, अशी शक्यता निर्माण झाली नेमक्या त्याचवेळी अचूक ‘टायमिंग’ साधत निष्फळ आरोप आ. कांदे यांनी केले,आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार भुजबळांच्या समर्थनार्थ मैदानात उतरला नाही यामागचे मर्मही रंजक म्हणावे लागेल.अर्थात या प्रकरणातून स्वतः ना.भुजबळ यांनीही धडा घ्यायला हवा. आपला भवताल व्यापलेल्या चांडाळांच्या चौकडीचीही झाडाझडती घ्यायला हवी. जनमानसाच्या भावना समजून घ्यायला हव्यात. पालकत्व निभावतांना…….. मी कोण? अशी भावना बाळगू नये.एरवी विकास पुरूष म्हणून असलेली चौकडीतील मान्यता जनमान्य होण्यास वेळ लागणार नाही.

COMMENTS