पुणे: शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पुणे महापालिकेने १२ महत्त्वाच्या 'मिसिंग लिंक' रस्ते प्रकल्पांना प्राधान्य

पुणे: शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पुणे महापालिकेने १२ महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ रस्ते प्रकल्पांना प्राधान्य देत त्यांची कामे आगामी वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. अनेक वर्षांपासून रखडलेले हे रस्ते पूर्ण झाल्यानंतर शहरातील विविध भागांतील संपर्क अधिक सुलभ होणार असून, वाहतुकीवरील ताण कमी होण्यास आणि प्रवासाचा वेळ वाचण्यास मोठी मदत होणार आहे.
शहराच्या विकास आराखडा आणि प्रादेशिक योजनेत प्रस्तावित असलेल्या अपूर्ण रस्ते जोडणीची पूर्तता करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. महापालिकेच्या नोंदीनुसार, शहरात ६७८ ठिकाणी सुमारे ४५९ किलोमीटर लांबीचे ‘मिसिंग लिंक’ रस्ते प्रस्तावित आहेत. यांपैकी ३३ रस्त्यांना उच्च प्राधान्य देण्यात आले होते; मात्र आतापर्यंत केवळ पाच प्रकल्प पूर्ण झाले आहेत. उर्वरित महत्त्वाच्या मार्गांची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी महापालिकेने नव्याने नियोजन केले असून, येत्या काही महिन्यांत अनेक प्रकल्प प्रत्यक्ष मार्गी लागतील, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
या टप्प्यात शहराच्या मध्यवर्ती भागासह झपाट्याने विस्तारणाऱ्या उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. बाणेर-पाषाण मार्ग, ज्युपिटर रुग्णालयमार्गे औंध-बालेवाडी जोडरस्ता, नवले पूल ते वाकड जोडमार्ग यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर विशेष भर देण्यात आला आहे.
याशिवाय गणराज चौक ते कस्पटे वस्ती, राजाराम पूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि पुढे रोजरी शाळा भुयारी मार्गापर्यंतचा रस्ता, ह्यूम पाईप परिसर ते प्रयोझा सिटी मार्ग, लोकमत प्रेस ते सावित्री गार्डन, गुंजन चौक ते कल्याणीनगर, कल्याणीनगर ते खराडी, मुंढवा रेल्वे उड्डाणपूल ते केशवनगर तसेच एबीसी चौक ते गाडीगुट्टा चौक या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ रस्त्यांची कामेही प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या माहितीनुसार, सध्या शहरातील १८ ‘मिसिंग लिंक’ रस्त्यांची कामे विविध टप्प्यांवर सुरू असून त्यांना वेग देण्यात आला आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर शहरातील प्रमुख चौकांतील वाहतुकीचा भार कमी होईल, पर्यायी मार्ग उपलब्ध होतील आणि नागरिकांना अधिक सुरक्षित, जलद व सुकर प्रवासाचा अनुभव मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

COMMENTS