Homeताज्या बातम्या

शिक्षक संघटना एवढ्या निद्रिस्त कशा? डॉ. नंदकुमार उघाडे यांचा थेट सवाल

बीड: नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी व शैक्षणिक व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला विविध स्तरातून पाठिंबा मिळत असताना

पेपरफुटीचे ’धंदे’ अन् बेरोजगारांचे ’फास’: किनवटमध्ये व्यवस्थेच्या चिंधड्या उडवणारा सत्याग्रह!
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा २६ वा दिवस
नीट पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधू मैदानात! २६ जुलैला मुंबईत शिवाजी पार्क ते सिद्धीविनायक मंदिरापर्यंत मोर्चा

बीड: नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी व शैक्षणिक व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला विविध स्तरातून पाठिंबा मिळत असताना शिक्षक व प्राध्यापक संघटना मात्र मौन का बाळगत आहेत, असा सवाल ज्येष्ठ पत्रकार व स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे लेखक डॉ. नंदकुमार उघाडे यांनी उपस्थित केला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डॉ. उघाडे यांनी म्हटले आहे की, विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि शैक्षणिक व्यवस्थेतील अनागोंदी कारभाराविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात समाजातील विविध घटक सहभागी झाले आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित या प्रश्नावर शिक्षक संघटनांची भूमिका दिसून येत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. गेल्या काही वर्षांत अनेक परीक्षांमध्ये पेपरफुटी व गैरप्रकाराच्या घटना घडल्या आहेत. नवीन शैक्षणिक धोरणातील त्रुटी, विद्यार्थ्यांच्या समस्या याबाबत शिक्षक संघटनांनी अपेक्षित आवाज उठवला नाही, अशी तीव्र टीका त्यांनी केली.

वेतनवाढ, जुनी पेन्शन योजना, पदोन्नती, अनुदान यांसारख्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या संघटनांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठीही पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थी आंदोलनाला साहित्यिक, कलाक्षेत्रातील व्यक्ती, पर्यावरणवादी आणि सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत असताना शिक्षक संघटनांनी मात्र मौन धारण केले आहे. शिक्षक हे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात त्यांनी भूमिका घेणे आवश्यक असल्याचे डॉ. उघाडे यांनी स्पष्ट केले.

नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केलेल्या आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी शिक्षक संघटनांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले. विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांना पाठिंबा देण्यास संघटना का कचरत आहेत, असा सवाल त्यांनी केला. विद्यार्थ्यांचे आंदोलन हे सामाजिक आणि शैक्षणिक परिवर्तनाची नांदी ठरू शकते. विद्यार्थी आणि शिक्षक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून शिक्षक संघटनांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. नंदकुमार उघाडे यांनी शेवटी केले आहे.

COMMENTS