Homeताज्या बातम्या

तहसील कार्यालय-निरा हॉस्पिटल मार्गावरील नालीचा नैसर्गिक उतार अडवल्याने नागरिकांचा संताप; नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

बीड: बीड शहरातील क्रांतीनगर परिसरातील तहसील कार्यालय ते निरा हॉस्पिटल या महत्त्वाच्या मार्गावरील नालीचा नैसर्गिक उतार अडवल्यामुळे नागरिकांम

युवक-युवतींनी माय भारत पोर्टलवर १५ ऑगस्टपर्यंत नोंदणी करावी; जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे आवाहन
आंदोलनकर्त्यांच्या घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी राष्ट्रपतींना निवेदन : सोमनाथ मोहिते
आषाढी एकादशी निमित्त श्रीगुरू बंकटस्वामी मठात फराळाचे आयोजन; नेकनूर येथे भाविकांची मोठी उपस्थिती

बीड: बीड शहरातील क्रांतीनगर परिसरातील तहसील कार्यालय ते निरा हॉस्पिटल या महत्त्वाच्या मार्गावरील नालीचा नैसर्गिक उतार अडवल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गेल्या ४० ते ५० वर्षांपासून सुरळीत सुरू असलेला नालीच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

या मार्गावरील रस्ता व नालीचे काम जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मंजूर झाले असून, संबंधित कामाची वर्क ऑर्डरही तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. या कामामध्ये नालीतील पाण्याचा नैसर्गिक उतार छत्रपती कॉलनीमार्गे कॅनॉल रोडवरील मुख्य नालीत सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, छत्रपती कॉलनी परिसरातील काही व्यक्तींनी केंडे यांच्या घराजवळ नालीचा प्रवाह अडवल्यामुळे पाण्याचा निचरा थांबला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

परिणामी, पावसाचे पाणी रस्त्यावर साचत असून तहसील कार्यालय ते निरा हॉस्पिटल या संपूर्ण मार्गावर सुमारे एक ते दीड फूट पाणी साचत आहे. या परिस्थितीमुळे वाहनचालक, पादचारी, विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परिसरातील सुमारे ३०० ते ४०० कुटुंबांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, या मार्गावर असलेल्या हॉस्पिटल व सोनोग्राफी सेंटरमध्ये उपचारासाठी येणार्‍या रुग्णांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णवाहिकांच्या ये-जा करण्यावरही याचा परिणाम होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक हिताच्या विकासकामात काही व्यक्तींमुळे अडथळा निर्माण होत असून, त्याचा फटका संपूर्ण परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगराध्यक्षांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून नालीचा नैसर्गिक प्रवाह मोकळा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मंजूर विकासकामाला अडथळा निर्माण करणार्‍यांवर नियमानुसार कारवाई करून नालीचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नगरपालिका प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास पाणी साचण्याचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो. प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS