कोरेगाव तालुक्यातील सातारारोड येथील आरोग्य केंद्राला 108 रुग्णवाहिका मिळावी यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरु आहेत.
सातारारोड / वार्ताहर : कोरेगाव तालुक्यातील सातारारोड येथील आरोग्य केंद्राला 108 रुग्णवाहिका मिळावी यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरु आहेत. मात्र, शासन स्तरावर जर रुग्ण वाहिका देण्यास टाळा-टाळ झाल्यास लॉकडाऊन संपताच जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनसमोर अमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा येथील शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपजिल्हाप्रमुख विशाल जाधव व माजी सरपंच ऋषी जाधव यांनी दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ समजल्या जाणार्या वाठारस्टेशनमध्ये गेले कित्येक वर्ष संपूर्ण महाराष्ट्राला नवसंजीवनी देणार्या 108 या रुग्णवाहिकेची वेळोवेळी मागणी करूनही जाणूनबुजून हा विषय डावलला जात आहे. विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रात 108 या रुग्णवाहिकेचे काम हे उत्कृष्ट समजले जाते. याच्याच अनुषंगाने निवेदनाद्वारे तसेच संपर्काद्वारे मागणी करूनही 108 ही रुग्णवाहिका दिली जात नाही. कोरोना सारख्या आपत्तीमध्ये 60 गावांचा मध्यबिंदू असणार्या वाठारस्टेशनला एकही रुग्णवाहिका नसणे म्हणजे मोठी खेदाची गोष्ट म्हणावी लगेल. गेल्या वर्षी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका जाळल्याने तर येथील परिसरातील रुग्णांचे मोठे हाल पहावयास मिळत आहेत.
याच पार्श्वभूमीवर वाठारस्टेशन येथील शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपजिल्हाप्रमुख विशाल जाधव व माजी सरपंच ऋषी जाधव हे उपोषणाच्या पवित्र्यात आहेत. याबद्दल त्यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. वाठार स्टेशनला रुग्णवाहिका असणे ही फार मोठी गोष्ट आहे तसे पाहिले तर वाठारस्टेशनमधून राज्य महामार्ग जातो. त्यामुळे येथे सतत छोटे मोठे अपघात घडत असतात. आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भाग असल्याने सतत काहींना काही घटना घडत असतात. गेले कित्येक वर्षे संबंधित अधिकारी यांना पत्र व्यवहार करूनही अधिकारी झोपेचे सोंग घेताना दिसत आहेत. याच अनुषंगाने विशाल जाधव व ऋषी जाधव या दोघांना पुन्हा अॅक्शन मोडमध्ये पहावयास मिळणार आहे. आजपर्यंत या जोडीने केलेली आंदोलने, मोर्चे फेल गेलेली नाहीत. त्यामुळे वाठार स्टेशनला लवकरच 108 ही रुग्णवाहिका मिळणार याबाबत दुमत नाही. वाठारस्टेशन येथे 108 ही रुग्णवाहिका मिळाल्यानंतर ग्रामीण भागातील जनतेची होत असलेली फरफट थांबणार आहे.
COMMENTS