नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्या उपस्थितीत झालेल्या नांदेड रेल्वे विभागाच्या आढावा बैठकीत राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांन

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्या उपस्थितीत झालेल्या नांदेड रेल्वे विभागाच्या आढावा बैठकीत राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी नांदेडला दक्षिण मध्य भारताचे प्रमुख धार्मिक व पर्यटन प्रवेशद्वार म्हणून विकसित करण्याची जोरदार मागणी केली. तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथे दरवर्षी देश-विदेशातून लाखो भाविक येत असल्याने नांदेड रेल्वे स्थानकाचा जागतिक दर्जानुसार विकास, अत्याधुनिक प्रवासी सुविधा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत नांदेड स्थानकाच्या विकासकामांचा, 2047 च्या मास्टर प्लॅनचा तसेच दोन नवीन प्लॅटफॉर्म, पर्यटन माहिती केंद्र, एक्झिक्युटिव्ह लाऊंज, कॅप्सूल हॉटेल, स्मार्ट पार्किंग, ईव्ही चार्जिंग, पिट लाईन स्थलांतर आदी कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नांदेड स्थानकाचा देशातील स्वच्छ स्थानकांच्या पहिल्या दहामध्ये समावेश करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची मागणीही त्यांनी केली. प्रवाशांच्या सोयीसाठी बॅटरी कार, व्हीलचेअर, क्यूआर-आधारित तक्रार निवारण, जीपीएस डिस्प्ले, वाय-फाय, डिजिलॉकर सुविधा, आरओ पिण्याचे पाणी, प्रत्येक चार तासांनी डब्यांची स्वच्छता, महिला सुरक्षा पथके, सीसीटीव्ही, फेस रिकग्निशन, इंटिग्रेटेड कमांड सेंटर आणि तंबाखूमुक्त रेल्वे अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी सुचविले. नांदेड-अर्धापूर-वर्धा, नांदेड-बिदर, बोधन-लातूर रोड व नांदेड-लातूर रोड या रेल्वे प्रकल्पांना गती देण्याची मागणी करत परभणी-परळी, पूर्णा-अकोला, मुदखेड-आदिलाबाद, मुदखेड-सिकंदराबाद आणि छत्रपती संभाजीनगर-मनमाड दुहेरीकरणातील विलंबाबाबत त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. गाडेगाव, उमरी, गोरठा येथील उड्डाणपूल व भुयारी मार्गांची कामे तातडीने पूर्ण करून नांदेड विभाग फाटकमुक्त करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली. नवीन रेल्वे सेवांमध्ये नांदेड-अमृतसर, नांदेड-अयोध्या, जालना-नांदेड-पटना, जालना-नांदेड-तिरुपती, नांदेड-पुणे वंदे भारत, नांदेड-हैदराबाद वंदे भारत तसेच हैदराबाद-नांदेड-मुंबई स्लीपर वंदे भारत गाड्यांबाबत माहिती मागविण्यात आली. संपर्क क्रांती एक्सप्रेसचा हरिद्वार अथवा ऋषिकेशपर्यंत विस्तार, नांदेड-जम्मू हमसफरचा कटरापर्यंत विस्तार, उमरी व धर्माबाद येथे सुपरफास्ट गाड्यांना थांबा तसेच तपोवन व मराठवाडा एक्सप्रेसचा विलंब कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली. रेल्वे विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी उत्पादनांसाठी लॉजिस्टिक पार्क, गुड्स कार्गो टर्मिनल, नांदेडला पूर्ण विकसित कोचिंग टर्मिनलचा दर्जा आणि धार्मिक पर्यटनावर आधारित रेल्वे अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याची मागणी करत नांदेड रेल्वे विभागाला विशेष प्राधान्य देण्याची अपेक्षा डॉ. गोपछडे यांनी व्यक्त केली.
धर्माबाद स्थानकाला ’डॉ. हेडगेवार’ नाव देण्याची मागणी
बैठकीत खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी धर्माबाद रेल्वे स्थानकाचे नामांतर करून त्याला डॉ. हेडगेवार रेल्वे स्थानक असे नाव देण्याची मागणी केली. डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून नामांतरास लवकर मंजुरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

COMMENTS