Homeताज्या बातम्या

एकाच पक्षात आले तरी कदम कोहळीकर-आष्टीकर यांच्यातील राजकीय वैमनस्य कायम?जिल्हा बँक निवडणुकीत उमेदवारीवर कायदेशीर आक्षेप

नांदेड : ठाकरे शिवसेनेतून शिंदे शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलतील, अशी अपेक्षा व्यक्त केली ज

विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी 1 जुलैला निवडणूकउमेदवारी अर्जांसाठी 30 जून अंतिम मुदत ; शिंदे गटातच चुरस
बारामती, राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच; काँगे्रसची बारामतीत माघार, मात्र कोणत्याच उमेदवारांना पाठिंबा नाही
ममता बॅनर्जींचा भवानीपुरमधून उमेदवारी अर्ज दाखल; भाजपचेे सुवेंदू अधिकारी यांच्याविरुद्ध थेट सामना

नांदेड : ठाकरे शिवसेनेतून शिंदे शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकाच पक्षातील आमदार बाबुराव कदम कोहळीकर आणि खासदार कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यातील राजकीय मतभेद पुन्हा उफाळून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
नांदेड स्थानिक प्राधिकरण विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर खासदार कृष्णा पाटील आष्टीकर यांनी आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, निवडणुकीच्या प्रारंभीच त्यांच्या उमेदवारीवर कायदेशीर आक्षेप नोंदविण्यात आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हदगाव विकास सहकारी सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचे सूचक गजानन अंतरवार यांनी कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या उमेदवारीवर अधिकृत हरकत घेतली आहे. आष्टीकर यांनी सहकार क्षेत्रातील आवश्यक पाच वर्षांचा अनुभव असल्याचा दावा केला असला, तरी त्यासाठी सादर करण्यात आलेली कागदपत्रे नियमांनुसार ग्राह्य धरता येणार नाहीत, असा दावा अंतरवार यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी आष्टी सेवा सहकारी संस्थेची गेल्या पंधरा वर्षांतील अधिकृत नोंदी, ठराव व इतर कागदपत्रे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर केली आहेत. तसेच, अनुभवाचा पुरावा म्हणून जोडलेल्या एका गृहनिर्माण संस्थेबाबतही गंभीर आक्षेप नोंदविण्यात आला आहे. संबंधित संस्था सन 2016 मध्येच अवसायनात (लिक्विडेशन) गेल्याचा दावा करत त्यासंदर्भातील कागदपत्रेही प्रशासनासमोर सादर करण्यात आली आहेत. छाननीच्या टप्प्यावर उपस्थित करण्यात आलेल्या या कायदेशीर आक्षेपांमुळे कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा सहकार व राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुसरीकडे, आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी संपूर्ण तयारीनिशी ही निवडणूक लढविण्याचा निर्धार केल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे. एकाच पक्षात असूनही दोन्ही नेत्यांतील राजकीय संघर्ष आता सहकार क्षेत्रातील निवडणुकीतही स्पष्टपणे दिसून येत असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, गजानन अंतरवार यांनी दाखल केलेल्या आक्षेपांवर निवडणूक निर्णय अधिकारी कोणता कायदेशीर निर्णय घेतात, याकडे संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. हा निर्णय केवळ एका उमेदवारीपुरता मर्यादित न राहता जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पुढील राजकीय समीकरणांवरही परिणाम करणारा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS