मुंबई : संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी एका लेखात भाजपशी युती हाच पर्याय असल्याचे वक्तव्य एका लेखात केल्याने गुरूवारी राज्य
मुंबई : संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी एका लेखात भाजपशी युती हाच पर्याय असल्याचे वक्तव्य एका लेखात केल्याने गुरूवारी राज्यातील राजकारण ढवळून निघाले. संभाजी ब्रिगेडचा सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेेवक संघ, भाजपसोबत टोकाचा विरोध राहिला आहे. तरी देखील त्यांनी भाजपसोबत युती करणे हाच पर्याय असल्याचे म्हटले आहे.
मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘मराठा मार्ग’ या मासिकामध्ये संपादकीय लेख लिहिला आहे. या लेखामध्ये भाजपसोबतच्या युतीची भूमिका मांडली. या लेखात ते म्हणतात ङ्गकुणबी मराठा बहुजन समाजातील स्थिरस्थावर बंधू-भगिनींनी सामाजिक बांधिलकी व कृतज्ञता म्हणून गरजवंतांना कौशल्य, बुद्धी, श्रम, पैसा व वेळ खर्च करून त्यांना आजच्या जागतिकीकरणाच्या रेट्यात स्वावलंबी होण्यासाठी सहकार्य करावे, अशी मराठा सेवा संघाची संकल्पना आहे, हेच तत्व आहे. परंतु अलीकडे या कामात शिथिलता आली आहे, असं लक्षात येतं. हे कार्य सर्वांगाने गतिमान करून नव्याने समाज उभा करणे आवश्यक आहे. पंचसूत्री कार्यक्रम राबविण्यात आले पाहिजेत, असे ते या लेखात मांडतात.
खेडेकर यांनी राज्यात एका नव्या राजकीय समीकरणाच्या दृष्टीने ही मांडली केली आहे. मात्र संभाजी बिग्रेडमधील कार्यकर्त्यांची काय भूमिका असेल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 1 सप्टेंबर 1993 रोजी अकोला या ठिकाणी मराठा सेवा संघाची स्थापना करण्यात आली. मराठा समाजातील अधिकार्यांची एक संघटना म्हणून या संघटनेकडे सुरुवातीला बघितलं जात होतं.पुढे काळानुरूप विविध कक्षाची स्थापना या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली. एकूण 33 कक्ष सध्या कार्यरत आहेत. सळसळत्या रक्ताच्या तरुणांसाठी संभाजी ब्रिगेड हा कक्ष स्थापन करण्यात आला तर महिलांसाठी जिजाऊ ब्रिगेड हा कक्ष स्थापन करण्यात आला. शिक्षकांसाठी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, विद्यार्थ्यांसाठी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, पत्रकारांसाठी तानुबाई बिर्जे पत्रकार कक्ष, राजकीय भूमिकेसाठी शिवराज्य पक्ष, साहित्यिकांसाठी संतसूर्य तुकाराम साहित्य परिषद आदी विविध कक्षाच्या माध्यमातून सेवा संघ विधायक काम करत आहे. मात्र संभाजी ब्रिगेडला राजकीय पक्ष म्हणून अद्याप यश मिळालेले नाही.
या लेखात खेडेकर पुढे म्हणतात की, महाआघाडीतील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांची इच्छा असली तरी ते संभाजी ब्रिगेडला वाटा देण्यास नकार देण्याची शक्यता अधिक आहे. त्यांची प्रवृत्ती संभाजी ब्रिगेडला दूर ठेवून केवळ त्यांच्या नावाचा व कामाचा एकतर्फी लाभ घेणे आहे. तसेच ते संभाजी ब्रिगेडला गृहीत धरून आहेत.
संभाजी ब्रिगेडला सत्तेपासून दूर ठेवण्याची तिन्ही पक्षांची मानसिकता
भाजप सत्तेत आली तरी हरकत नाही पण संभाजी ब्रिगेड सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे ही या तिन्ही पक्षांची मानसिकता आहे. तर काही लहान पक्ष नेते संभाजी ब्रिगेड बाबत गैरसमज पसरवत असतात. या परिस्थितीत संभाजी ब्रिगेडला सत्ता हस्तगत करायची असल्याचे खेडेकर यांनी म्हटले आहे. संभाजी ब्रिगेडला खूप मर्यादा येतात. स्वबळ अवघड आहे. शेवटी भाजपशी युती हाच पर्याय उरतो. तसं संभाजी ब्रिगेडपेक्षा वेगळ्या अर्थानं भाजपला अस्पृश्य मानले जाते. मराठा सेवा संघ व आरएसएस यांची विचारसरणी पूर्णपणे परस्परविरोधी आहे. ते चित्र तसेच राहील परंतु राजकारणात अंतिम यश मिळविणे हेच एकमेव तत्त्व असते. जो जिता वही सिकंदर: राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी जी किल्ली उपयोगी पडेल ती वापरली पाहिजे.राजकारणात आपला स्वार्थ आणि हित हेच अंतिम उद्दिष्ट असते.तिथे कोणीही कायमस्वरूपी मित्र व शत्रू नसतात. वेळ व संधी हेच राजकीय सत्य आहे. लोक काय म्हणतील यावर राजकारण केले जात नाही. असे पुरुषोत्तम खेडेकर यांनी आपल्या लेखात मांडणी केली आहे.
COMMENTS