आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून जाणार्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार्या वारकर्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून जाणार्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार्या वारकर्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असून पालखी मार्गावरील समन्वयासाठी जिल्ह्यात एका नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. पालखी, दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी संबंधित अधिकार्यांनी स्वतः भेट देऊन पाहणी करावी आणि तेथील स्थानिक अडचणी तातडीने दूर कराव्यात. सर्व संबंधित विभागांच्या अधिकार्यांनी वारकर्यांच्या सुविधेसाठी तत्पर रहावे. तरी पालखी सोबत दिंडीत येणार्या एकाही वारकर्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून जाणार्या पालखी आणि दिंडी मार्गावरील सोयी-सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, महावितरणचे अधिक्षक अभियंता प्रेमसिंग राजपुत यांच्यासह प्रमुख अधिकार्यांची यावेळी प्रत्यक्ष उपस्थिती होती तर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले की, जिल्ह्यात बीड जिल्ह्यामधून आषाढी एकादशीनिमित्त शांतीब्रम्ह श्री. संत एकनाथ महाराज पालखी श्रीक्षेत्र पैठण, श्री. विठ्ठल रुक्मीणी संस्थान श्री.तिर्थक्षेत्र कौंडण्यपूर, श्री. संत गजानन महाराज संस्थान शेगाव आणि श्री. संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर तापितीर या दिंडी, पालखी पंढरपूरकडे दि.8 ते 18 जुलै दरम्यान प्रस्थान करणार आहेत. दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी संबंधित अधिकार्यांनी स्वतः भेट देऊन पाहणी करावी आणि तेथील स्थानिक अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. वारकर्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता, मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात तात्पुरती स्वच्छतागृहे उभारण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच, शहागड ते गेवराई घाटाची स्वच्छता संबंधित विभागाने युद्धपातळीवर करावी, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पालखी सोहळ्यात वारकर्यांच्या वैद्यकीय मदतीसाठी चोवीस तास रुग्णवाहिकेसह वैद्यकीय टीम सज्ज ठेवण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आपापल्या स्तरावर तात्काळ आदेश पारित करावेत, महावितरण विभागाने विद्युत व्यवस्था चोख ठेवावी आणि दिंडी मुक्कामी राहणार्या गाव परिसरात अखंडित वीज पुरवठा राहील याची खबरदारी घ्यावी, पोलीस विभागाने वारीच्या मार्गावरील सुरक्षा व्यवस्थेकडे विशेष लक्ष द्यावे. पालखी सोहळ्यासोबत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करावा, तसेच वाहतूक कोंडी होणार नाही यादृष्टीने वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवावी. या बैठकीदरम्यान पालखी मार्गातील संभाव्य सोयी-सुविधा आणि अडथळे याबाबतची थेट माहिती दिंडीच्या प्रमुखांकडून घेण्यात आली. रिंगण कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी होत असल्याने, स्थानिक स्वराज्य संस्थांनी तेथे सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचनाही जिल्हाधिकारी श्री.जॉन्सन यांनी बैठकीत केली.

COMMENTS