भंडारदरा आणि निळवंडे धरणक्षेत्रात सातत्याने पाऊस सुरू असल्याने निळवंडे धरणातून काल दि.13 रोजी रात्री 09:00 वाजता 16101 क्युसेकने विसर्ग सोडण्यात
भंडारदरा आणि निळवंडे धरणक्षेत्रात सातत्याने पाऊस सुरू असल्याने निळवंडे धरणातून काल दि.13 रोजी रात्री 09:00 वाजता 16101 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला असून रात्रीतून अंदाजे 20000 ते 25000 क्युसेकपर्यंत विसर्ग वाढवण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली. त्याप्रमाणे आज सकाळी सुमारे 26 हजार क्युसेक प्रमाणे विसर्ग प्रवरा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या तीरावर असणार्या गावातील सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे.
त्याचबरोबर नदीकाठी राहणार्या नागरिकांना सुरक्षित स्थळी आश्रयास जाण्याच्या सूचना प्रशासनाने दिले आहेत. नदीकाठावरील शेतकर्यांनी शक्यतो नदीपात्रालगत रात्रीच्या वेळी जाणे टाळावे. प्रवरा नदीच्या तीरावर असलेल्या गावातील नागरिकांनी छोट्या पुलावर व नदीपात्रालगत जाऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांना काही अडचण असल्यास तात्काळ आपापल्या भागातील तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी यांना संपर्क साधावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तालुका प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन असून आपल्या समवेत आहे.
पावसाळा सुरू होऊन तब्बल साडेतीन महिने होऊन गेले मात्र समाधानकारक पाऊस झाला नव्हता. आता गेली तीन ते चार दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे अकोला आणि संगमनेर तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आता भंडारदरा आणि निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. प्रशासनाच्या वतीने शहरातील प्रवरा नदी काठावरील गंगामाई घाट परिसरामध्ये नागरिकांना मज्जाव करण्यात आला असला तरी अनेक नागरिक आणि लहान मुले पाणी पाहण्याचा आनंद घेताना या ठिकाणी दिसत आहे. गंगामाई घाट पूर्णपणे पाण्याखाली गेला असून घाट परिसरामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. प्रवरा नदीवरील संगमनेर खुर्द जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. त्याचप्रमाणे दशक्रियाविधीसाठी असलेला केशव तीर्थ घाटही पाण्याखाली गेला आहे. यावेळी पुरामध्ये मच्छीमारांनी मासे पकडण्यासाठी जाळे टाकून अनेक मासे पकडण्याचा आनंद लुटला. शहरातील प्रवरा नदी परिसरामध्ये जाण्यासाठी चे सर्व मार्ग बंद केले असून पोलिस बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला आहे
COMMENTS