जामखेड : जामखेड शहर व संपूर्ण तालुक्यात सध्या दुध भेसळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोक

जामखेड : जामखेड शहर व संपूर्ण तालुक्यात सध्या दुध भेसळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या प्रश्नावर ‘जन जागरण युवा मंच’ महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भास्करराव मोरे यांनी थेट आवाज उठवला आहे. त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना लेखी निवेदन पाठवून, जामखेड व परिसरातील भेसळखोरांवर ‘अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६’ अंतर्गत तातडीने आणि कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
डॉ. भास्करराव मोरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, जामखेड शहर व तालुक्यात काही दूध विक्रेते, डेअरी चालक आणि पुरवठादार केवळ अधिक नफा मिळविण्याच्या हव्यासापोटी नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत. दूधामध्ये पाणी, स्टार्च यासोबतच अत्यंत घातक असलेले डिटर्जंट, युरिया आणि सिंथेटिक रसायने मिसळली जात असल्याची अनेक धक्कादायक प्रकरणे समोर आली आहेत. विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर याचे अत्यंत घातक दुष्परिणाम होत असून जनआरोग्य धोक्यात आले आहे.केवळ कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही, तर सर्वसामान्य नागरिकांनीही जागरूक राहणे गरजेचे आहे.
तुकाराम मुंढे हे सध्या अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. २१ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांची २५ वेळा बदली झाली असूनही त्यांनी जनहिताच्या कार्यात कधीही तडजोड केलेली नाही.या निवेदनामुळे जामखेडमधील अवैध आणि भेसळयुक्त दूध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, आता अन्न व औषध प्रशासन विभाग यावर काय आणि कधी कारवाई करणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS