नांदेड : नांदेड शहरातील वारंवार खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असताना महावितरणचे कार्यकारी अभि
नांदेड : नांदेड शहरातील वारंवार खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असताना महावितरणचे कार्यकारी अभियंता विनय घनबहादूर यांची बदली झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या जागी कलंत्री हे नवीन कार्यकारी अभियंता म्हणून पदभार स्वीकारणार असून विस्कळीत झालेली यंत्रणा पुन्हा मार्गावर आणण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शहरातील अनेक भागांमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना वाढल्या आहेत. दिवस असो किंवा रात्र. वारा पाऊस अथवा इतर कोणतेही स्पष्ट कारण नसतानाही वीज गायब होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक रुग्ण आणि व्यापारी वर्गाला याचा मोठा फटका बसत आहे. ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप होत आहे. महावितरणच्या अधिकार्यांना आणि कर्मचार्यांना सेवा संपर्कासाठी मोबाईल उपलब्ध करून देण्यात आले असले तरी अनेकदा फोन उचलले जात नसल्याची तक्रार ग्राहकांकडून सातत्याने केली जात आहे. कंट्रोल रूमकडूनही समाधानकारक माहिती मिळत नसल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे. महावितरणच्या जनसंपर्क विभागाची भूमिकाही प्रश्नचिन्हाखाली आली आहे. शहरात वारंवार उद्भवणार्या वीज समस्यांबाबत अधिकृत माहिती वेळेवर उपलब्ध होत नसल्याने ग्राहक संभ्रमात राहत आहेत. दरम्यान स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वाढीव वीजबिले येत असल्याच्या तक्रारीदेखील वाढल्या आहेत. अनेक ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक रकमेची बिले येत असल्याचा दावा केला जात असून त्याबाबत समाधानकारक स्पष्टीकरण मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. थकबाकी झाल्यास वीजपुरवठा स्वयंचलित पद्धतीने खंडित होत असल्याने ग्राहकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. शहरातील वाढत्या वीज मागणीचा विचार करून सुमारे 250 नवीन रोहित्रांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या कामांमुळे भविष्यात वीजपुरवठा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीचा वेग वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे. नवीन कार्यकारी अभियंता कलंत्री यांच्याकडून ग्राहकाभिमुख प्रशासन. तक्रारींवर तातडीने प्रतिसाद. अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये शिस्त. तसेच सुरळीत वीजपुरवठा याबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. नांदेडकरांना वीजेच्या लपंडावातून दिलासा मिळणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिकार्यांची उत्तरदायित्वाची कसोटी.
महावितरणने अधिकार्यांना दिलेले सेवा मोबाईल प्रत्यक्षात कितपत वापरले जातात याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. नागरिकांशी संवाद वाढविणे आणि तक्रारींना प्रतिसाद देणे ही नवीन प्रशासनासमोरील महत्त्वाची जबाबदारी ठरणार आहे.
वाढीव बिलांचा प्रश्न कायम.
स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी अनेक भागांतून येत आहेत. या तक्रारींची वस्तुनिष्ठ पडताळणी करून ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याचे आव्हानही महावितरणसमोर आहे.
रोहित्र प्रकल्पांना गतीची गरज
नवीन रोहित्रांच्या उभारणीमुळे वीजपुरवठ्यात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. मात्र मंजूर कामे वेळेत पूर्ण होऊन त्याचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचणे तितकेच महत्त्वाचे मानले जात आहे.

COMMENTS