हिमायतनगर शहरात नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या गिरीजा वॉटर स्विमिंग पूलमध्ये एका नऊ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 14

हिमायतनगर शहरात नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या गिरीजा वॉटर स्विमिंग पूलमध्ये एका नऊ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 14 मे रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून स्विमिंग पूलमध्ये कोणतीही सुरक्षा व्यवस्था अथवा जीवरक्षक नसल्याची माहितीही पुढे आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिमायतनगर तालुक्यातील भिसी येथील सक्षम नागोराव गायकवाड (वय 9 वर्षे) हा बालक त्याच्या आईसोबत भोसीवरून हिमायतनगर येथे आला होता. माहेरी आलेल्या आईकडे त्याने स्विमिंग पूलला नेण्याचा हट्ट केला. त्यामुळे पोहण्यासाठी आईने सक्षमला गिरीजा वॉटर स्विमिंग पूलमध्ये नेले. त्याला पोहण्यासाठी सोडून आई बाहेर थांबली. एक तासानंतरही मुलगा बाहेर न आल्यामुळे आईने त्याचा शोध घेतला. मात्र तो पोहत असताना अचानक पाण्यात बुडाला असल्याची बाब काही वेळानंतर आईसह उपस्थितांच्या लक्षात आली. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी तत्काळ बालकाला पाण्याबाहेर काढून उपचारासाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करून सक्षमचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेनंतर बालकाच्या कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला. स्विमिंग पूल परिसरात कोणतीही योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप मृत बालकाच्या आईने केला आहे. पूल परिसरात प्रशिक्षित लाईफगार्ड, सुरक्षा साधने किंवा लहान मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी नसल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी स्विमिंग पूलकडे धाव घेतली. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली असून संबंधित स्विमिंग पूल चालकाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

COMMENTS