शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेकडून तब्बल 61 लाख 46 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये

शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेकडून तब्बल 61 लाख 46 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विजयनगर परिसरातील पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेही सध्या फरार आहेत. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही गुंतवणूकदार पुढे येत असल्याने फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील आबानगरी येथील रहिवासी जयश्री गजानन कदम या सध्या नांदेडच्या अभिजीतनगर भागात वास्तव्यास आहेत. आरोपी संदीप बाबुराव तंवर आणि वैशाली संदीप तंवर यांनी त्यांच्याशी संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा नफा मिळेल, असे सांगितले. 2 मे 2023 ते 12 जून 2024 या कालावधीत त्यांनी विविध टप्प्यांत कदम यांच्याकडून लाखो रुपये उकळले. सुरुवातीच्या काळात विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी काही रक्कम नफ्याच्या स्वरूपात परत केली. त्यामुळे अधिक नफ्याच्या अपेक्षेने कदम यांनी मोठी गुंतवणूक केली. मात्र त्यानंतर ना नफा मिळाला, ना मूळ रक्कम परत करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणुकीसह अनियंत्रित ठेव योजना बंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप थडवे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान, शेअर मार्केट आणि एआय आधारित गुंतवणूक योजनांच्या नावाखाली आणखी काही जणांची फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे. आरोपी दाम्पत्याने जमा केलेली रक्कम नेमकी कुठे व कोणाकडे वळवली, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणामागे आणखी काही साथीदार किंवा मुख्य सूत्रधार असण्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही. सध्या जलद नफ्याच्या आशेने अनेक नागरिक विविध ऑनलाईन गुंतवणूक योजनांकडे आकर्षित होत आहेत. काही व्यक्ती किंवा कंपन्या अवास्तव परताव्याचे आमिष दाखवून लोकांकडून कोट्यवधी रुपये गोळा करतात. सुरुवातीला परतावा देऊन विश्वास निर्माण केला जातो, मात्र काही काळानंतर कंपनी किंवा संबंधित व्यक्ती गायब होतात आणि गुंतवणूकदारांचे पैसे अडकतात. त्यामुळे नागरिकांनी अशा योजनांमध्ये गुंतवणूक करताना अत्यंत सावध राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

COMMENTS