सातारा येथील ऑक्सीजन निर्मिती करणार्या के नॉयट्रोक्सीजन कंपनीला अतिरिक्त चार टन ऑक्सीजनचे उत्पादन करण्यासाठी तब्बल 260 केव्हीए क्षमतेचा वाढीव वीजभार विक्रमी 14 तासांमध्ये कार्यान्वित करण्याची कामगिरी महावितरणच्या सातारा येथील अभियंता व कर्मचार्यांनी केली आहे.
मुंबई / प्रतिनिधी : सातारा येथील ऑक्सीजन निर्मिती करणार्या के नॉयट्रोक्सीजन कंपनीला अतिरिक्त चार टन ऑक्सीजनचे उत्पादन करण्यासाठी तब्बल 260 केव्हीए क्षमतेचा वाढीव वीजभार विक्रमी 14 तासांमध्ये कार्यान्वित करण्याची कामगिरी महावितरणच्या सातारा येथील अभियंता व कर्मचार्यांनी केली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सध्या उद्रेक सुरु असल्याने वीज जोडणी असो की विजभार वाढ लवकरात लवकर करून देण्याच्या ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे राज्यभरातील यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे. त्याचाच परिणाम म्हणून विक्रमी वेळेत रोहित्र बदलणे, भूमिगत वायर टाकणे ही कामे करणार्या महावितरणचे आभार या कंपनीने एक पत्र पाठवून मानले आहेत.
कोरोनाविरुध्दच्या लढाईत महावितरण सदैव आघाडीवर आहे. कोरोनाविरुध्द लढताना जिथे जिथे महावितरणची गरज भासेल ती कामे प्राधान्याने करा, असे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी वेळोवेळी निर्देश दिले आहेत. या सूचनांचे पालन होतेय की नाही याचाही ते सतत आढावा घेत आहेत. परिणामी यासाठी महावितरणकडून आवश्यक असणारी कार्यवाही 8 ते 10 दिवसांच्या अपेक्षित कालावधीऐवजी केवळ 14 तासांच्या विक्रमी वेळेत करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, सातारा नवीन एमआयडीसीमध्ये के नॉयट्रोक्सीजन प्रा. लिमिटेड ही ऑक्सीजनची उत्पादन करणारी कंपनी महावितरणची उच्चदाब ग्राहक आहे. या कंपनीला 575 केव्हीए क्षमतेचा वीजभार मंजूर आहे. मात्र, सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाचा उद्रेक सुरु असल्याने विविध रुग्णालयांमध्ये जादा ऑक्सीजन पुरवठ्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. के नॉयट्रोक्सीजनकडून दररोज 600 ते 700 सिलिंडर ऑक्सीजनचा पुरवठा केला जातो. मात्र, अतिरिक्त चार टन ऑक्सीजनच्या उत्पादनासाठी या कंपनीला आणखी 260 केव्हीए क्षमतेचा वीजभार वाढविणे आवश्यक होते.
याबाबत स्थानिक प्रशासनाकडून माहिती मिळताच महावितरणचे सातारा मंडळचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, उपकार्यकारी अभियंता अविनाश खुपसे यांनी स्वतःहून के नॉयट्रोक्सीजन कंपनीकडून दि. 3 एप्रिलला वाढीव वीजभाराचा ऑनलाईन अर्ज, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, वीजयंत्रणेची तपासणी, मंजुरी आणि कोटेशन देण्याची कार्यवाही केवळ 8 तासांमध्ये पूर्ण केली. त्यानंतर के नॉयट्रोक्सीजन कंपनीकडून नाशिक येथील करंट व पॉवर (सीटी-पीटी) ट्रान्सफॉर्मर उत्पादन कंपनीला पुरवठा आदेश देण्यात आला. के नॉयट्रोक्सीजन कंपनीकडून कोटेशनचा भरणा व नाशिक येथून दोन्ही ट्रान्सफॉर्मरची सातारा येथील उपलब्धता दि. 9 एप्रिल रोजी सायंकाळी पूर्णत्वास गेली. विशेष म्हणजे वेळ वाचविण्यासाठी महावितरणकडून नाशिक येथील चाचणी अभियंत्यांकडूनच या सीटी-पीटी ट्रान्सफॉर्मरची नाशिक येथेच चाचणी घेण्यात आली.
त्यानंतर शनिवार, दि. 10 रोजी सार्वजनिक सुटीचा दिवस असूनही महावितरणच्या सातारा मंडळ, विभाग व चाचणी विभागातील अभियंत्यांनी स्वतः उपस्थित राहून के नॉयट्रोक्सीजन कंपनीच्या आवारातील तांत्रिक कामांसाठी सक्रीय सहकार्य केले. सीटी-पीटी ट्रान्सफॉर्मर बदलणे, नवीन भूमिगत वाहिनी टाकणे आदी कामे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंतच्या कालावधीत पूर्ण करण्यात आली आणि त्यानंतर लगेचच अतिरिक्त चार टन ऑक्सीजन निर्मितीसाठी तब्बल 260 केव्हीए क्षमतेचा वीजभार देखील कार्यान्वित करण्यात आला.
महावितरणच्या या कामगिरीबद्दल राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे. कोरोना संकटाच्या प्रतिकूल परिस्थितीत महावितरणकडून अशाच प्रकारची ग्राहकसेवा अपेक्षित आहे व त्याप्रमाणे ग्राहकसेवा देण्यात येत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले आहे. यासोबतच के नॉयट्रोक्सीजन कंपनीचे संचालक योगेंद्र चौधरी यांनीही सातार्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना पत्र पाठविले असून त्यात महावितरणच्या अभियंत्यांचे त्यांनी कौतुक केले आहे.
COMMENTS