राहाता : सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्र पडताळणी प्रक्रियेत राहाता तालुक्यात मोठा

राहाता : सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्र पडताळणी प्रक्रियेत राहाता तालुक्यात मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. संबंधित अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे पालकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सहा वर्षांवरील बालकांना नामांकित खाजगी शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित प्रवेश मिळावा, यासाठी शासनाकडून आरटीई अंतर्गत प्रक्रिया राबविली जाते. यासाठी पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येते. ही समिती निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून अंतिम निर्णय घेते. मात्र राहाता तालुक्यात ही प्रक्रिया सुरळीत पार पडताना दिसली नाही.
आरटीईमध्ये निवड झालेल्या पालकांना सकाळी १० वाजता पंचायत समिती शिक्षण विभाग व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राहाता येथे कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात आले होते. आपल्या पाल्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा या अपेक्षेने तालुक्यातील विविध भागांतून पालक सकाळी लवकरच उपस्थित झाले. मात्र ठिकाणांबाबत संभ्रम निर्माण झाल्याने काही पालकांना पंचायत समितीतून जिल्हा परिषद शाळेकडे पाठविण्यात आले.
जिल्हा परिषद शाळेतही संबंधित अधिकारी वेळेत उपस्थित नसल्याने पालकांना प्रतीक्षा करावी लागली. दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत एकही अधिकारी हजर नसल्याचे सांगण्यात आले. गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याची तक्रार पालकांनी केली. अखेर दुपारी साडेबारा वाजता एका शिक्षकाला पाठवून प्रक्रिया सुरू करण्यात आली; मात्र संबंधित शिक्षकांनाही संपूर्ण माहिती नसल्याने पालकांची गैरसोय झाली.
याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष गणेश जाधव यांनी संताप व्यक्त करत, “अशा भोंगळ कारभारामुळे पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कागदपत्र पडताळणीची अंतिम तारीख २० एप्रिल असून मध्ये सुट्ट्या असल्याने पालकांवर त्याचा परिणाम होणार आहे. ही व्यवस्था तातडीने सुरळीत न केल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा दिला.
दरम्यान, शिक्षण विभागात प्रभारी अधिकाऱ्यांवर कामकाज चालत असल्याने नियोजनात त्रुटी असल्याची चर्चा आहे. गटशिक्षणाधिकारी हे दुसऱ्या तालुक्यातील अधिकारी असून प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. त्याच दिवशी राज्यभर पॅट (मूल्यांकन चाचणी) परीक्षा सुरू असताना जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांना आरटीई पडताळणीसाठी पाठविण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षेवरही परिणाम झाल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पालक व मनसेकडून करण्यात येत आहे.
मूल्यांकन चाचणीमुळे उशीर
शिक्षणाधिकारी पावशे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मूल्यांकन चाचणी सुरू असल्यामुळे शिक्षकांना आरटीई कागदपत्र पडताळणीसाठी येण्यास उशीर झाला. मात्र उद्यापासून ही प्रक्रिया सुरळीतपणे सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS