सिरसाळा : डिग्रस पोहणेर, तेलसमुख आणि लगतच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे. नदीपात्रातून रात्रंदिवस अवैध वाळू

सिरसाळा : डिग्रस पोहणेर, तेलसमुख आणि लगतच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे. नदीपात्रातून रात्रंदिवस अवैध वाळू उपसा सुरू असून, यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकाराची माहिती असूनही महसूल आणि पोलीस प्रशासन ’मुग गिळून’ गप्प बसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या शांततेमागे नेमके काय ’अर्थपूर्ण’ गुपित दडलेले आहे, असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. पोहणेर आणि तेलसमुख येथील नदीपात्र हे वाळू माफियांचे नंदनवन ठरत आहे. रात्रीच्या अंधारात डंपर, ट्रॅक्टर आणि जेसीबीच्या सहाय्याने वाळूची चोरी केली जात आहे. परिसरातील रस्त्यांवरून सुसाट वेगाने धावणार्या वाळूच्या वाहनांमुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. धुळीचे साम्राज्य आणि अपघातांची भीती असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाहीये.शासकीय नियमांची पायमल्ली करत चाललेल्या या अवैध व्यवसायामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. एकीकडे सामान्य माणसाला घरासाठी वाळू मिळणे कठीण झाले असताना, दुसरीकडे वाळू माफिया मात्र प्रशासनाला हाताशी धरून मालामाल होत आहेत. स्थानिक पातळीवरील तलाठी, मंडळ अधिकारी आणि पोलीस चौकीपर्यंत या अवैध धंद्याची माहिती पोहोचूनही कारवाईचे ’शून्य’ सत्र सुरू आहे.
पोहणेर, तेलसमुख, डिग्रस भागातील या वाळू चोरीला लगाम घालण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष देण्याची गरज आहे. केवळ कागदोपत्री कारवाई न दाखवता प्रत्यक्ष जागेवर जाऊन माफियांच्या मुसक्या आवळल्या जातील का? की हे ’अर्थपूर्ण’ मौन असेच कायम राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS