किनवट : शहरातील थकबाकीदारांना आता ’सुगीचे दिवस’ संपल्याची जाणीव होऊ लागली आहे. ज्या नगर परिषदेच्या घरपट्टी, पाणीपट्टी आणि गाळे भाड्याकडे अनेक वर्

किनवट : शहरातील थकबाकीदारांना आता ’सुगीचे दिवस’ संपल्याची जाणीव होऊ लागली आहे. ज्या नगर परिषदेच्या घरपट्टी, पाणीपट्टी आणि गाळे भाड्याकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष केले जात होते, त्याच नगर परिषदेने आता ’क्शन मोड’ ऑन करत थकबाकीदारांच्या उरात धडकी भरवली आहे.
नगर परिषदेची तिजोरी भरण्यासाठी मुख्याधिकारी मुगाजी काकडे यांनी आता ’कडक शिस्त’ लावण्यास सुरुवात केली आहे. वारंवार विनंत्या करूनही ’आम्ही देतो, उद्या देतो’ म्हणणार्यांची आता खैर नाही. याची प्रचिती आज 24 मार्च रोजी दोन व्यावसायिक गाळे सील करून देण्यात आली. म्हणजे, आता ’नोटिस’ची भाषा संपली असून ’सीलबंद’ची भाषा सुरू झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही. मुख्याधिकारी मुगाजी काकडे यांनी थेट 30 मार्च 2026 ची डेडलाईन दिली आहे. म्हणजे, नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच जुन्या हिशोबाची ’पाई-पाई’ वसूल करण्याचा जणू त्यांनी विडाच उचलला आहे. ज्यांच्या गाळ्यांना आज कुलूप लागले, त्यांच्यासाठी हा ’सावधानतेचा इशारा’ आहे. ज्यांनी अद्यापही कर भरला नाही, त्यांना आता मालमत्ता जप्तीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. या धडक मोहिमेत कर विभाग प्रमुख घुले यांच्यासह संमुखराव, स्वानंद मामीलवाड, कैतवाड, राजु पिल्लेवार, परमेश्वर कचमोडे, अनिल माहूरकर आणि गंगाधर दोनपेलीवार यांसारख्या कर्मचार्यांच्या फौजेने शहरातील विविध भागांत ’राउंड’ सुरू केला आहे. आता कोणाच्या घराचे किंवा दुकानाचे टाळे उघडण्याऐवजी, नगर परिषद कोणाचे टाळे ’सील’ करते, याकडेच सार्यांचे लक्ष लागले आहे. थोडक्यात, कर थकवून मोकळे होणार्यांसाठी आता ’अच्छे दिन’ संपले असून, लवकर टॅक्स भरला तरच व्यवसाय आणि घराचे कुलूप सुरक्षित राहील, असा स्पष्ट संकेत या कारवाईतून मिळाला आहे!

COMMENTS