नांदेड : नांदेडच्या शैक्षणिक क्षेत्रात विश्वासार्हतेचा आधारस्तंभ मानली जाणारी ‘नांदेड एज्युकेशन सोसायटी’ (नांएसो) सध्या एका अनपेक्षित वळणावर उभी

नांदेड : नांदेडच्या शैक्षणिक क्षेत्रात विश्वासार्हतेचा आधारस्तंभ मानली जाणारी ‘नांदेड एज्युकेशन सोसायटी’ (नांएसो) सध्या एका अनपेक्षित वळणावर उभी आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी अचानक राजीनामा दिल्याची माहिती समोर येताच शैक्षणिक वर्तुळात चर्चांचा जोर वाढला आहे. मात्र, या निर्णयामागील ठोस कारणे अद्यापही अधिकृतरीत्या स्पष्ट न झाल्याने या प्रकरणाला गूढतेची किनार लाभली आहे.
पीपल्स महाविद्यालयातील प्राचार्य पदाच्या भरती प्रक्रियेभोवती निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा दिला गेला असल्याची चर्चा रंगत आहे. या भरती प्रक्रियेत पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. काही घटकांकडून प्रक्रियेत विसंगती असल्याचे आरोपही झाले. यानंतर संस्थेच्या नेतृत्वाकडून कोणतीही ठोस भूमिका समोर न आल्याने वातावरण अधिकच धूसर बनले. या सगळ्या घटनाक्रमाच्या छायेत काब्दे यांच्या राजीनाम्याचा निर्णय समोर आल्याने अनेकांनी या दोन बाबींचा संबंध जोडण्यास सुरुवात केली आहे. तथापि, संस्थेच्या काही जवळच्या सूत्रांकडून वेगळीच बाजू पुढे येत आहे. डॉ. काब्दे यांच्या आरोग्याशी संबंधित अडचणींमुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा, असे सांगितले जात आहे. विशेषतः स्मरणशक्तीशी निगडित समस्या आणि वाढते वय यामुळे त्यांनी स्वतःहून जबाबदार्यांपासून दूर राहण्याचा मार्ग निवडला असावा, अशी शक्यता वर्तवली जाते. यापूर्वीही त्यांनी काही काळासाठी अध्यक्षपदाचा कार्यभार इतरांकडे दिल्याच्या घटना घडल्या होत्या.
या दोन परस्परविरोधी शक्यतांमुळे संपूर्ण प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. एकीकडे भरती प्रक्रियेतील वाद, तर दुसरीकडे आरोग्यविषयक कारणे-यामध्ये नेमका निर्णायक घटक कोणता, याबाबत स्पष्टता नाही. परिणामी, अधिकृत माहितीच्या अभावामुळे अफवा आणि तर्क-वितर्कांना खतपाणी मिळत आहे. या घटनेतील सर्वात ठळक बाब म्हणजे संस्थेच्या स्तरावरून आलेले मौन. कोणतीही स्पष्ट भूमिका न मांडल्यामुळे शैक्षणिक वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही शैक्षणिक संस्थांची मूलभूत तत्त्वे मानली जात असताना, या प्रकरणात त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे.
दरम्यान, 27 मार्च रोजी होणार्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत या राजीनाम्यावर औपचारिक निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीत केवळ राजीनामा स्वीकारायचा की पुढील नेतृत्वाची दिशा ठरवायची, याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘नांएसो’चा इतिहास पाहता नेतृत्वातील बदल ही अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते. स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ यांसारख्या दिग्गजांच्या परंपरेत डॉ. काब्दे यांनी दीर्घकाळ नेतृत्व केले आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून संस्थेच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. सध्या मात्र चित्र अस्पष्ट आहे. कारणांची निश्चितता नाही, अधिकृत भूमिका नाही आणि पुढील दिशा अद्याप ठरलेली नाही. या पार्श्वभूमीवर ‘नांएसो’समोरील आव्हान केवळ नेतृत्व बदलाचे नाही, तर संस्थेवरील विश्वास टिकवण्याचे आहे. आगामी काही दिवसांत या शांत घडामोडींच्या पडद्यामागील सत्य बाहेर येईल का, आणि संस्थेची पुढील वाटचाल कोणत्या दिशेने होईल, याकडे शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

COMMENTS