Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर ताडोबातील ऐतिहासिक खांबांचा उलगडा; भोसलेकालीन वारसा असल्याचा प्रा. सुरेश चोपणे यांचा दावा

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रस्त्यांच्या कडेला दिसणारे उंच दगडी खांब हे इंग्रजकालीन नसून भोसलेकालीन असल्याचा ठोस दावा भूशास्त्र

लोणार सरोवर विकास कामाला वेग देण्याच्या सुचना विभागीय आयुक्त डॉ. श्‍वेता सिंगल यांनी केली पाहणी
देशभरात गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प; अनेक राज्यांमध्ये हॉटेल व्यवसाय सापडला संकटात
उडदावणे होणार आता मधाचे गाव !शासनाकडून निवड ; ४५ लाखांचा निधी मंजूर


चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रस्त्यांच्या कडेला दिसणारे उंच दगडी खांब हे इंग्रजकालीन नसून भोसलेकालीन असल्याचा ठोस दावा भूशास्त्र व पुरातत्त्व अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी केला आहे. दीर्घकालीन ऐतिहासिक आणि संरचनात्मक अभ्यासानंतर त्यांनी हा निष्कर्ष मांडला असून या खांबांच्या इतिहासाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
ताडोबा परिसरात आजही अनेक ठिकाणी रस्त्यालगत उभे असलेले हे खांब इतिहासाचे मूक साक्षीदार मानले जातात. काही खांबांचे वनविभागाने संवर्धन केले असले तरी बहुतेक खांब कालांतराने तुटले किंवा नष्ट झाले आहेत. उपलब्ध खांबांवरून त्यांच्या रचनेत आणि वापरात विशिष्ट वैशिष्ट्ये आढळून येतात. हे खांब प्रामुख्याने वाळूच्या दगडांपासून तयार करण्यात आले असून काही ठिकाणी विटांचाही वापर करण्यात आला आहे. खांबाच्या वरच्या भागात ‘यू’ आकाराचे दगड बसविण्यात आलेले दिसतात. हे दगड पुढील खांबाची दिशा दाखविण्यासाठी वापरले जात असावेत. तसेच काही प्रसंगी वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी दोरी किंवा घंटा बांधण्याचा उपयोगही या रचनेतून होत असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रा. चोपणे यांच्या मते, चंद्रपूर ते नागपूर या मार्गावर प्रवास सुलभ व्हावा यासाठी भोसले राजांनी हे खांब उभारले. चंद्रपूर, ताडोबा, चिमूर, उमरेड मार्गे नागपूर असा हा प्रवास होत असे. दाट जंगलातून मार्ग काढताना सुमारे 100 मीटर अंतरावर असे खांब उभारण्यात येत, ज्यामुळे प्रवाशांना दिशा ओळखणे सोपे जाई. या खांबांची उंची साधारण 15 फूट आणि पायथ्याचा व्यास सुमारे अडीच फूट असल्याचे सांगितले जाते. पूर्वी या मार्गावर शेकडो खांब अस्तित्वात होते.
इतिहासाच्या पार्श्‍वभूमीवर पाहता, भोसले राजवटीत नागपूर आणि चंद्रपूर यांच्यातील दळणवळणाला मोठे महत्त्व होते. व्यापार, प्रशासन आणि लष्करी हालचाली यासाठी सुरक्षित आणि ओळखण्यास सुलभ मार्गांची गरज होती. चंद्रपूर आणि परिसरात कापूस व कापड उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित झाला होता. हा व्यापार नागपूरकडे नेण्यासाठी व्यवस्थित मार्ग उभारणे आवश्यक होते. याच उद्देशातून या मार्गांवर दिशादर्शक खांब उभारण्यात आल्याचे संशोधनातून पुढे आले आहे.


खांबांबाबत विविध मते प्रचलित
सध्या ताडोबा परिसरात दगडी आणि विटांच्या मिळून काहीच खांब उरले आहेत. उमरेड परिसरातही अशाच प्रकारचा खांब सापडल्याची नोंद आहे. मात्र नागपूरकडील अनेक खांब कालांतराने पडले किंवा नष्ट झाले आहेत. या खांबांच्या उभारणीबाबत आतापर्यंत विविध मते प्रचलित होती. काही ठिकाणी हे खांब इंग्रजांनी बांधले असल्याचे, तर काही पर्यटन संदर्भांमध्ये गोंडकालीन असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र ब्रिटिश काळातील बांधकामांची नोंद सहसा अधिकृत अहवाल आणि गॅझेटियरमध्ये आढळते. ताडोबातील या खांबांचा असा कोणताही अधिकृत उल्लेख उपलब्ध नसल्याचे प्रा. चोपणे यांनी निदर्शनास आणले आहे. त्यामुळे हे खांब ब्रिटिशकालीन असल्याचा समज चुकीचा असल्याचे ते स्पष्ट करतात.

COMMENTS